Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी बसचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू ,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

accident
, गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (21:51 IST)
नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पळसे टोलनाक्यापासून काही अंतरावरच हा अपघात घडला आहे. पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या बसचे ब्रेक फेल झाल्याने ही बस काही वाहनांवर आदळली. त्यानंतर काही क्षणातच या बसने पेट घेतला. या गंभीर आपघातात बसने काही दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे. तर, बसमधील 8 प्रवासी किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने, स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्वच प्रवासी बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पळसे टोल नाक्याजवळून दुपारी १२ वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची एम एच 14 बीटी 3635 ही विठाई बस पळशे चौफुलीच्या बस थांब्यावर थांबली. तेथे त्यातून काही प्रवासी उतरत होते, त्याचवेळी पाठीमागून दुसरी बस, जी पुणे राजगुरुनगर-नाशिक (एमएच. 07 सी 7081 ) असा प्रवास करत आली होती. या बसने बस थांब्यावर उभ्या असलेल्या विठाई बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी, या दोन्ही बसच्या मधोमध उभे असलेल्या ३ दुचाकीस्वार हे बसमध्ये दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, बसमध्ये अडकलेल्या दुचाकीला स्पार्किंग होऊन बसने पेट घेतला. तत्पूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला होता. या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बसकडे धाव घेतली. यावेळी, पुण्याहून आलेल्या बसमध्ये 43 प्रवासी होते, या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांना त्या बसच्या दरवाजा, खिडक्याच्या काच्या आणि मागील दरवाजा फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे, बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. तर तत्काळ काही जणांनी पोलिस, टोल नाका आणि अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. तातडीने अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविले.
 
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघातातील जखमींना तातडीने नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  
 
दरम्यान या अपघातात होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एकाचे नाव रवींद्र सोमनाथ विसे (30) तर दुसऱ्याचे नाव मदन दिनकर साबळे (39) असे असून ते बजाज पल्सर गाडी क्रमांक एमएच 15 सी जे 4874 वरून नाशिककडे येत होते.  हे दोघेही युवक नगर जिल्ह्यातील  अकोला तालुक्यातील समशेरुपुर येथील रहिवाशी असून ते नाशिकला लग्नासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आफ्रिकेत अडकलेल्या 16 भारतीय नाविकांची सुटका करण्यात सरकार गुंतले