पणजी :काही महिन्यांपूर्वी देशभरात गुरांना लागण झालेल्या प्राणघातक लम्पी (ढेकूळ) त्वचा रोगाच्या भीतीमुळे गोवा सरकारने शेजारील राज्यातून गुरांच्या आयातीवर घातलेली बंदी आता अंशतः उठविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना पत्रही सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गुरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रसार वाढू लागल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि. 23 सप्टेंबरपासून राज्यात गुरांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यानच्या काळात गोव्यातही धारबांदोडा तालुक्यात सुमारे 14 गुरांना लम्पीची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे बंदीचा कालावधी वाढतच गेला होता. परिणामी राज्यातील एकमेव असलेला उसगाव येथील गोवा कत्तलखानाही सुमारे दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आता देशात तसेच राज्यातही परिस्थिती सुधारत असल्याने राज्य सरकारने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही बंदी अंशतः असेल व केवळ उसगाव येथील कत्तलखान्यापूरतीच मर्यादित असेल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
गोव्यात शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या विविध भागांमधून गुरांची आयात करण्यात येते. पूर्ण बंदी उठेपर्यंत यावरही मर्यादा येणार असून ठराविक राज्यातूनच गुरे आणता येणार आहेत. तसेच ही गुरे संबंधित निर्धारित मार्गानेच आणावी लागणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन खात्यातील सुत्रांकडून देण्यात आली.
मांस विक्रेत्यांची मागणी
या बंदीमुळे राज्यातील मांस विक्रेत्यांना नुकसानी सहन करावी लागत असल्याने मांस विक्रेते संघटनेने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे मांस प्रकल्पामध्ये कत्तलीसाठी गुरे आणण्यावरील बंदी उठविण्याची विनंती त्यांनी केली होती. अन्यथा भर पर्यटन हंगामात राज्याला मांसाचा तुटवडा भासणार असल्याचे म्हटले होते.
गोव्याला हवे रोज 20 टन मांस
या संघटनेच्या प्रतिनिधींच्या माहितीनुसार राज्यात रोज सुमारे 20 टन गोमांसाची मागणी असते. सणासुदी आणि पर्यटन हंगामात ती मागणी वाढत असते. त्यामुळे शेजारील राज्यांतून गुरे आयात करण्यात येतात.
Edited by : Ratnadeep Ranshoor