Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये समाज जोडण्याची शक्ती - ना. श्री. सुधीर मुनगंटीवार

sudhir munguttiwar
चंद्रपूर , सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (07:44 IST)
इंग्रजांनी जाती-धर्मांमध्ये फूट निर्माण केली. आज इंग्रज या देशात नाहीत, मात्र जाती-धर्मांमधील भेद कायम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार या भेदातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतात. कारण त्यांच्या प्रत्येक शब्दात समाज जोडण्याची शक्ती आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवार) केले.
 
महेश भवन येथे गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय मेळाव्याचे उद्घाटन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. किशोर जोरगेवार, राहुल पावडे भाजपा महानगरचे अध्यक्ष, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी प्रमोद कडू, सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, सचिव गोपाल कडू ,आशिष देवतळे भाजयुमो प्रदेश सचिव, प्रेमलाल पारधी, डॉ. प्रेरणा कोलते, रुपलाल कावडे, बंडोपंत बोडेकर, अंकुश आगलावे, अनिल फुलझेले, प्रभाकर भोयर, आयोजक पुरुषोत्तम सहारे, विजय चीताडे, उमेश आष्टनकर, अमीन शेख, शीलाताई चव्हाण, मायाताई उईके, धनराज कोवे व पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका,गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘वाईटाचा नायनाट करण्यासाठी प्रत्येक युगात आध्यात्मिक पिढी जन्माला येत असते. आज मुलगा आईच्या, पती-पत्नी एकमेकांच्या जीवावर उठले असताना गुरुदेव सेवा मंडळाकडे बघितल्यावर सज्जन वृत्ती जीवंत असल्याचा विश्वास बसतो. आपल्या डोक्यावर असलेली भगवी टोपी त्याची साक्ष देते. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. हा भगवा दुष्ट वृत्तींशी सामना करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या विचारात असल्याची साक्ष देतो. जीवन शेणासारखे नाही तर सोन्यासारखे जगण्याची प्रेरणा राष्ट्रसंतांचे विचार देतात.’ मन स्वच्छ करण्यासाठी आध्यात्मिक विचारच उपयोगी असल्याचेही ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
 
‘प्रत्येकाच्या मनात अमर्याद इच्छा असतात. पण या इच्छांना आनंदाच्या चौकटीत बांधायचे असेल तर राष्ट्रसंतांच्या आध्यात्मिक विचारांचा आधार घ्यावा लागेल. पैशाने भौतिक सुविधा प्राप्त करता येतील, पण आनंद आणि समाधान प्राप्त करायचे असेल तर ग्रामगीता हाती घ्यावी लागेल. राष्ट्रसंत हे केवळ आध्यात्मिक संत नव्हते, त्यांनी आध्यात्मासोबत विचारांची कृतीशिलता दिली. भजनातून, ग्रामगीतेतून जगण्याचे सहज सोपे तंत्र दिले,’ याचाही ना . मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.  
 
‘तीर्थक्षेत्र अ’चा दर्जा अन् चित्रपट
मोझरीला ‘तीर्थक्षेत्र अ’चा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी मी प्रशासकीय पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीला होकार मिळाला आहे. प्रक्रिया सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी पूर्ण होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. त्याचवेळी राष्ट्रसंतांच्या जीवनावरील सुंदर चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ग्रामगीता कर्तव्याची भावना शिकविते
आज समाजात प्रत्येकाला आपले अधिकार माहिती आहेत. पण इतरांच्या अधिकारांची चिंता नाही. अशावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता कर्तव्याची भावना शिकवते. कारण इतरांनी कसे वागावे हे आपल्या नियंत्रणात नसले तरीही आपण कसे वागावे, हे ग्रामगीता शिकवते, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Aditya L1: आदित्य L-1 ने यशस्वीरित्या कक्षा बदलली, इस्रोने दिली माहिती