नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेलेला एक ३० वर्षीय तरुण अकोल्यातील पूर्णा नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोन दिवस उलटल्यानंतरही अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.
आपत्कालीन विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून त्या तरुणाचा शोध घेत आहे. दशक्रिया विधीच्या वेळी दादू प्रकाश सुरडकर हा तरुण आंघोळीसाठी नदीत उतरला होता. तेवढ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तरुण सर्व नातेवाईकांच्या डोळ्यासमोर वाहून गेला. त्यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्नही केले मात्र पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.
अकोट तालुक्यातील ग्राम करतवाडी रेल्वे येथे राहणारे काही लोक गुरुवारी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर गेले होते. तेव्हा ही धक्कादायक घटना घडली.
गेल्या दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत अल्यामुळं नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. अशात दादूला वाढलेल्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आला नाही. आणि नदीत अंघोळीसाठी गेला असताना तो प्रवाहात वाहून गेला.
नदीकाठी असलेल्या लोकांनी त्याचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ शोधल्यावरही जेव्हा तो सापडला नाही तेव्हा या घटनेची माहिती दहीहंडा पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि आपत्कालीन विभागाच्या पथकाला बोलावून शोध कार्यास सुरुवात केली. तरी दोन दिवसांपासून त्या तरुणाचा शोध लागला नाही.
फोटो: प्रतीकात्मक