गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी एमपीएससी परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, तेव्हा मी सांगितलं होतं, यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत, आताची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु ही तारीख ८ दिवसांच्या कालावधीतील असेल, येत्या आठवडाभरात ही परिक्षा होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आपल्याशी साधारण रविवारी संवाद साधतो, आता हा संवाद काही जणांना आवडतो काहींना आवडत नाही पण मी मात्र माझं कर्तव्य या माध्यमातून करत आलो आहे आणि करत राहणार. राज्यात वातावरण निर्माण केलंय त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे, एमपीएससीच्या परीक्षांबाबत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी या परीक्षांची तारीख जाहिर झाली होती आणि नंतर ती पुढे ढकलण्यात आली, तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं, यापुढे ही तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच विद्यार्थी अनेक दिवस अनेक महिने परिश्रम सतत अभ्यास करतात त्यांच्या भावनेशी सहमत आहे. १४ तारखेची परीक्षा पुढे केलेली आहे ती महिना-दोन महिने, तीन महिन्यासाठी नाही तर केवळ काही दिवसांसाठी करण्यात आली आहे. मी स्वतः मुख्य सचिवांना आणि एमपीएससी च्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ झालेला आहे तो लवकर संपवा आणि तारीख उद्यापर्यंत जाहीर करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.