अशी झाली मुक्त विद्यापीठात पहिली ऑनलाईन पीएचडी परीक्षा

बुधवार, 27 मे 2020 (07:29 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पीएच. डी. शिक्षणक्रमाची ऑनलाईन मौखिक परीक्षेचे (ऑनलाईन व्हायवा) महाराष्ट्रात प्रथमताच यशस्वीरीत्या आयोजित करून आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतुन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पीएच. डी. मौखिक परीक्षा (व्हायवा) आयोजित करणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. सदर सादरीकरण युजीसी ने ‘कोविड – १९’ च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून आयोजित करण्यात आला या जागतिक संकट काळातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार्यरत राहणाऱ्या विद्यापीठाचे या निमित्ताने सर्वत्र कौतुक केले जात आहे.
 
विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे काल सकाळी या ऑनलाईन पीएच. डी. मौखिक परीक्षेचे (ऑनलाईन व्हायवा) आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या साथीमुळे टाळेबंदीच्या काळात राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थाही बंद आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या टाळेबंदीवर मार्ग शोधत ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन सुरू ठेवले आहे. वेब रेडिओ, तसेच ऑनलाईन व्हिडीओ लर्निंग सुविधा सातत्याने सुरू आहे. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या मुक्त विद्यापीठाने आपल्या या उपक्रमात खंड पडू न देता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पीएच. डी. ची मौखिक परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनात सचिव पदी कार्यरत असलेले श्री अतुल पाटने हे  विद्यार्थी होते. ‘लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्व – महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानात संदर्भात विशेष अभ्यास’ असा पीएचडी चा विषय होता. जवळपास दोन तास हा ऑनलाईन पीएच. डी. मौखिक परीक्षा सुरू होती.
 
अतुल पाटणे यांनी पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन द्वारे १२५ स्लाईडस च्या साहाय्याने मुंबईवरून त्यांच्या विषयाचे सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षकांनी व उपस्थित तज्ज्ञांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेत. विद्यापीठाच्या कॉन्फरन्स रूममध्ये कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, मानव विद्या शाखेचे संचालक प्रा.उमेश राजदेरकर, विद्यापीठातील डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार, डॉ. नागार्जून वाडेकर व डॉ. प्रकाश बर्वे उपस्थित होते. या परीक्षेचे परीक्षक डॉ. श्रीमती शोभा कारेकर पुण्यावरून, डॉ. बालाजी कत्तूरवार नांदेडवरून उपस्थित होते. सदर परीक्षा खुली असल्यामुळे त्यात चंदीगड  येथून IAS अधिकारी नीलकंठ आव्हाड, मुंबई येथील सहआयुक्त श्रीमती अर्चना कुळकर्णी, अकोल्यावरून शिक्षणतज्ञ प्रा संजय  खडक्कर, नागपूर येथून डॉ. संजय इंगोले, मुंबई येथून डॉ. नाखले, नांदेड येथून डॉ. मोहन व विद्यार्थी मिळून एकूण ३५ जण उपस्थित होते. आयोजनाची तांत्रिक बाजू कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी व चंद्रकांत पवार यांनी सांभाळली.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ११ जून ला महाराष्ट्रात पाऊस येईल, हवामान खात्याचा अंदाज