मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यामध्ये तब्बल तीन डुप्लिकेट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पोलिसांकडून तिसऱ्याचा शोध सुरू आहे.
म्हणून कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दाढी वाढवून केशभुषा आणि वेशभुषा करून त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तींमुळे अडचण निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. त्या व्यक्तींचे काही गुंडाबरोबर देखील फोटो प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो याकरिता त्यांचा शोध घेण्यात येत आहे. व्यक्ती मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करू शकतात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट व्यक्तींचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
हे आहेत तिघे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सारखे दिसणारे एकूण तीन डुप्लिकेट आहेत. त्यातील विजय माने व भीमराव माने यांची ओळख पटली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. अल्पावधीत नावरुपाला आलेले विजय नंदकुमार माने हे सध्या अडचणीत सापडले आहेत. पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याच्यासोबतची त्यांची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या वादाला सुरुवात झाली. तसेच याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने विजय माने यांच्या मदतीसाठी वकील असीम सरोदे धावून गेले आहेत.
डुप्लिकेटचे म्हणणे
विजय माने हे मुख्यमंत्री शिंदेंसारखे दिसतात. त्यमुळे सोशल मिडियावर ते कायम चर्चेत असतात. मुख्यंमत्र्यांसारखा पेहराव करुन काढलेला एक फोटो त्यांचा गेल्या काही दिवसापासून समोर येत आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यावर विजय माने म्हणाले की, मी स्वतः भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी आहे. मागण्यांबाबत पोलिसांना निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती होता मात्र, तो गुन्हेगार असल्याची मला कल्पना नव्हती. त्यावेळी कुणी माझा फोटो काढला आणि व्हायरल केला याची कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतिमा कधी मलिन होईल असे कार्य मी कधी केले नाही आणि करणारही नाही. कारण एकनाथ शिंदे माझ्यासाठी गुरुसमान आहेत. तरी काही जणांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी मुख्यमंत्र्यांची कधी बदनामी केलेली नाही, समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे.