कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोनाविरोधी लसी घेणार नाही यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्यावर प्रतिक्रिया देत त्यांची समजूत काढणार असल्याचे म्हटले आहे. बारामतीत मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, इंदुरीकर महाराज त्यांच्या स्टाईलने समाज प्रबोधन आणि जनजागृती करतात. त्यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्जी जमते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधनपर कार्यक्रम बंद होते. यामुळे समाजातील लोकांशी त्यांचा जास्त संपर्क आला नाही. यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली नसावी. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. मात्र महाराजांचा आध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. यामुळे वैज्ञानिक बाजूने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यात आत्तापर्यंत ७ कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. तर ३ कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. महाराष्ट्राच्या टार्गेटमधील ७३ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण झाला आहे. मात्र जर केंद्र आणि राज्याच्या आकडेवारीमध्ये फरक जाणवत असला तरी जुळवणी करण्याचे काम सुरु असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.