शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. त्यांच्यावतीने शिवसेना नेते दिवाकर रावते हा दौरा करणार आहेत.
उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रात्री अचानक रद्द झाला. मुंबईत पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
महापुरामुळे सांगली, कोल्हापूरातील अनेक गावे उद्धवस्त झाली असून, अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. महापूरावेळी आणि महापूर ओसरल्यानंतर अनेक सत्ताधारी नेत्यांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या भागात जाणे टाळले होते.
आज उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते. सकाळी 11 वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी आणि आसपासच्या पूरग्रस्त भागाची पाहणी ते करणार होते.