शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यापूर्वी शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला होता. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही उद्धव यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेवर आमची नजर असणार असल्याचे विधान केले होते. तसेच कर्जमाफी झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे मराठवाड्यातील दौऱ्यातही ठाकरे भाजपावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. ते एक दिवसाच्या आपल्या दौऱ्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात एकूण सात सभांना संबोधित करणार आहेत.