माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ‘राज्यातल्या साखर उद्योगाच्या समस्या मांडण्यासाठी अमित शहांची भेट घेतली आहे. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यात आम्हाला काहीही इंटरेस्ट नाही. सरकार जेव्हा पडेल, तेव्हा काय करायचं त्याचा आम्ही निर्णय घेऊ’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं फडणवीस म्हणाले.
अमित शहांची भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी भाजपचं महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू झालं आहे का? यासंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीसांनी तो दावा फेटाळून लावला. ‘जोपर्यंत सरकार चाललंय तोपर्यंत चालेल, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी काय करायचं ते आम्ही बघू. चर्चा काहीही असू शकतात. ज्यांना करायच्या, ते करू शकतात. पण ऑपरेशन लोटसची काहीही तयारी नाही. ही कोणतीही राजकीय भेट नाही. आम्हाला सरकार पाडण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. कोरोनाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी यासंदर्भात आम्ही भेट घेतली आहे’, असं ते म्हणाले. कोरोना उपचारासाठी मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने अधिकची व्यवस्था उभी करा.