राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह कोणाचे? हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
दरम्यान, या सुनावणीबाबत शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांचा कोणी काका-मामा राजकारणात नव्हता. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष काढला आहे. यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्यांनी कष्ट केले, पक्ष मोठा केला.
या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण आहे? तर, तो चेहरा म्हणजे शरद पवार, हे कोणीही नाकारू शकत नाही. आता त्यांचा पक्ष ओरबाडू पाहत आहेत. त्यासाठी काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले. निवडणूक आयोगाची नोटीस त्यांनी पाठवली, आम्ही अशी नोटीस पाठवली नाही. त्यामुळे पहिला वार त्यांनी केला, आम्ही केला नाही.
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे झाल्यानंतर निवडणूक आयोगासमोर आपल्या पक्षाबाबत चर्चा होती. शरद पवार स्वतः तिथे हजर होते. 83 वर्षांचे शरद पवार यासाठीच मुंबईवरून दिल्लीला गेले. स्वतः ज्या बाळाला जन्म दिला, त्या बाळासाठी शरद पवार तिथे जाऊन बसले. परंतु, ज्यांना पक्ष हवा आहे, ते लोक तिथे नव्हते. त्यांच्यापैकी कोणीच तिथे आलं नव्हतं. कोणीतरी वकील आला होता. कोण होता तो वकील ते मी बघणार आहे आणि मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण तो वकील काय म्हणाला? तो शरद पवार असा उल्लेख त्याने केला.
सुप्रिया सुळे या वकिलाला उद्देशून म्हणाल्या, शरद पवारांना तो शरद पवार म्हणणारा तू कोण आहेस? आता वकिली कर, तुझा करेक्ट कार्यक्रम आज ना उद्या नाही केला, तर शरद पवाराची मुलगी नाव नाय लावणार, लक्षात ठेव.
Edited By - Ratnadeep Ranshoor