Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांना शरद पवारांच्या आशीर्वादाची गरज का वाटतेय?

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (08:48 IST)
तारीख 2 जुलै … अजित पवार देवगिरी बंगल्यावरून काही आमदारांसह थेट राजभवनात पोहोचले. अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर बोलताना शरद पवार हेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पण शरद पवार यांनी मात्र मी भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट केलं. मग दोन्ही गटाकडून आमदार जुळवाजुळव सुरू झाली. कोणासोबत किती आमदार स्पष्ट होत नव्हतं.
 
वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवार यांनी बोलावल्या बैठकीत अजित पवार गटावर टीका केली गेली. तर अजित पवार गटाच्या बैठकीत तुम्ही थांबणार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित करत शरद पवारांनी निवृत्त होऊन आशीर्वाद द्यावा असं बोललं गेलं.
 
प्रफुल्ल पटेल यांनी तर, मी पुस्तक लिहिलं तर महाराष्ट्रात खळबळ उडेल असं म्हणत शरद पवारांना थेट आव्हान दिलं. शरद पवारांनीही राज्याचा दौरा जाहीर केला. नाशिकची सभाही झाली पण काका- पुतण्यांचा संघर्ष यानंतर हळूहळू मावळताना दिसू लागला. अजित पवारांना शरद पवार यांच्या आशिर्वादाची गरज वाटू लागली. याची काय कारणं आहेत? नेमकं आतापर्यंत या दोघांमध्ये काय काय घडलं? याबाबतचा हा आढावा…
 
आतापर्यंत कितीवेळा जाहीर आणि गुप्त भेटी?
14 जुलैला भाजपसोबत सत्तेत सामिल झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी अजित पवार हे सिल्व्हर ओकवर गेल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पावसाळी अधिवेशनाच्या आधी 16 जुलैला अजित पवार यांनी नवनिर्वाचित मंत्री आणि त्यांच्या गटातील काही आमदारांसोबत शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटरच्या कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो असं प्रफुल्ल पटेलांनी त्यावेळी स्पष्ट केलं. त्यावेळी ते म्हणाले, “पक्ष एकसंघ राहावा अशी विनंती आम्ही शरद पवारांना केली. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.”
 
लगेच दुसऱ्या दिवशी 17 जुलैला पुन्हा अजित पवार काही आमदारांसह वाय. बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. त्या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरींनी आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याची री ओढली. शरद पवारांनी तुम्हाला आशीर्वाद दिला का? या प्रश्नावर ते म्हणाले, “वडिलांकडे गेल्यावर ते आशीर्वाद देत नसतात का?”
 
12 अॉगस्ट ला पुण्यात उद्योगपती चोरडीया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. ही भेट लपूनछपून झाली असली तरी दोन्ही नेते एकमेकांना भेटले असल्याचं त्यांनी स्वीकारलं. उद्योगपती चोरडिया यांनी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं त्यानिमित्ताने आम्ही भेटलो. ही कौटुंबिक भेट असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जयंत पाटील यांच्या भावाला आलेल्या ईडी समन्सनंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट घडली. या भेटीदरम्यान अजित पवार, शरद पवार यांच्यासह जयंत पाटीलही उपस्थित होते.
 
शरद पवारांची सोबत अजित पवारांना गरजेची?
“शरद पवार हे महायुतीमध्ये सामिल झाले तरच अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येईल अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली आहे. त्यामुळे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी अजित पवार वारंवार त्यांना भेटत आहेत.
 
“विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या गुप्तभेटीनंतर हे वक्तव्य केलं. अधिवेशन काळात शरद पवार यांच्या भेटीनंतरही विधिमंडळाच्या परिसरात ही चर्चा नेत्यांमध्ये होती. या चर्चेत किती तथ्य आहे ?
 
वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “अनेक राजकीय नेत्यांशी बोलल्यानंतर या चर्चेत तथ्य आहे असं वाटतं. शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चेहरा आहेत. अजित पवार यांना मानणारा गट असला तरी तुलनेने कमी आहे. अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर एक सर्व्हे झाला होता. या सर्व्हेमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने 17% मतदार असल्याचं दिसून आलं. त्यापैकी 12.5% मतदार हे शरद पवार यांच्या बाजूने दिसून आले तर 5% मतदार हे अजित पवार गटासोबत असल्याचं दिसलं.
 
त्यामुळे भाजपला शरद पवार हे आपल्यासोबत हवे आहेत अशी माहिती आहे. यासाठी अजित पवार हे शरद पवार यांची सतत मनधरणी करताना दिसतायेत. अजित पवार गटातील महत्वाच्या नेत्यांच्या बालेकिल्यात सभा घेऊन शरद पवार भाजपसोबत ज्यायला तयार नाहीत हे दिसून येत आहे.”
 
बीड या धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्यात शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी ‘साहेब तुमचा पाठिंबा पाहीजे..! आणि कामाच्या माणसांना आशिर्वाद द्या…’ असे होर्डिंग्ज बीडमध्ये लावण्यात आले होते.
 
‘जे लोक साहेबांना कामाच्या माणसांना आशीर्वाद द्या म्हणतायेत. ते पवार साहेबांना घरी बसवायला निघाले होते अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्याचबरोबर जे गेले त्यांना साहेबांचा आशीर्वाद पाहीजे हे ऐकून समाधान वाटलं असं जयंत पाटील म्हणाले.
 
ज्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली त्याचा परिणाम मतांवर नकारात्मक होऊ नये याच्या प्रयत्नात भाजप आहे. अनेक नेते हे अजित पवार गटासोबत गेले असले तरी मतदार विभागला जाईल का? याबाबत अजूनही शंका आहे.
 
शिवसेना फोडल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या पक्षाचं महत्व कमी करण्यात भाजपला यश आलं असलं भावनिकदृष्ट्या ते मतदारांमध्ये रूजवणं अद्याप भाजपला शक्य झालं नाही. त्यासाठी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला महायुतीत हवी असावी का?
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “एकनाथ शिंदे गट फोडल्यामुळे जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळली आहे, ती शरद पवारांना मिळू नये यासाठी अजित पवार त्यांना स्वतः सोबत घेण्याचा प्रयत्न करत असावेत किंवा शरद पवारांचा विरोध बोथट करून संभ्रम निर्माण करण्याचाही प्रयत्न या भेटींमधून किंवा माध्यामांमध्ये बोलून केला जात असावा.”
 
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडताना तो त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला पक्ष होता. ते हयात नसाताना त्यांच्या विचारांशी प्रतारणा केली असा प्रचार करत पक्ष फोडला. बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि फोटो हे दोन्ही पक्षांकडून वापरलं जातं. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला.
 
या वयात त्यांच्याकडून पक्ष हिरावून घेतलं हे शरद पवारांनी मतदारांमध्ये रुजवल्यास अजित पवार गटाला मोठा फटका बसी शकतो. त्याचबरोबर शरद पवार यांनी माझा फोटो वापरला तर कोर्टात जाणार असं सुनावलं आहे. शरद पवारांचं नाव न वापरता मतं मागितली तर त्याचा परिणाम विविध सर्व्हेमधून समोर येत आहे. कदाचित यासाठी भाजप नेतृत्वाला शरद पवारांसोबत पूर्ण राष्ट्रवादी महायुतीत गरजेची वाटत असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
 



Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments