Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियाच्या मिसाईल हल्ल्यानंतर 'अनाथांचं गाव' बनलीय युक्रेनमधील ही जागा

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (11:14 IST)
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उत्तर-पूर्व युक्रेनमधील ह्रोझा गावावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किशोरवयीन दिमाने त्याची आई, वडील आणि दोन्ही आजी-आजोबांना गमावलं.
 
“ही गोष्ट मी अद्याप पूर्णपणे पचवू शकलेलो नाही. आता आमच्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे," असं 16 वर्षीय या मुलाने मला सांगितलं.
 
लहान बहिणीबद्दल बोलताना दिमा अत्यंत भावनिक होतो. तो म्हणाला, "हे सर्व घडण्यापूर्वी मी जेव्हा तिला मिठी मारायचो, तेव्हा तिला ते आवडायचं नाही. आता मात्र तिला मला नेहमी मिठी मारायची असते.”
 
5 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्व युक्रेनच्या खारकीव प्रदेशातील ह्रोझा येथील एका कॅफेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात गावाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक-पंचमांश म्हणजे 59 लोकं मारली गेली.
 
युक्रेनियन सैन्यात स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी प्रत्येकाच्या कुटुंबातील किमान एक सदस्य कॅफेमध्ये उपस्थित होता.
 
मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेकजण कुणाचे तरी पालक होते आणि आता ह्रोझा हे अनाथांचं गाव म्हणून ओळखलं जातं.
 
24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने पूर्ण ताकदीनिशी हल्ल्याला सुरुवात केल्यापासून कॅफेवरील हल्ला हा युक्रेनियन नागरिकांसाठी सर्वात मोठा प्राणघातक हल्ला होता. रशियाने या हल्ल्याबाबत कधीही थेटपणे भाष्य केलं नाही, परंतु रशियन सैन्याने या भागातील लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
 
युक्रेनने ह्रोझामध्ये कोणतंही लष्करी तळ नसल्याचं म्हटलं आहे. या भागात लष्करी कर्मचारी किंवा इतर कोणतंही अधिकृत लष्करी तळ असल्याचे "संकेत नाहीत" असं सांगत संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात याचं समर्थन करण्यात आलंय.
 
ह्रोझा येथील हल्ला झालेल्या ठिकाणाची रशियन लष्कराला माहिती देण्यासंदर्भात युक्रेनच्या सुरक्षा सेवेला रशियाच्या बाजूला झुकलेल्या दोन माजी युक्रेनियन नागरिकांवर संशय आहे.
 
बीबीसी याची खातरजमा करू शकत नाही. मात्र, सीमारेषेवर राहणा-या काही युक्रेनियन लोकांनी रशियाला अशा प्रकारची माहिती पुरवल्याबद्दल त्यांना दोषी ठरविण्यात आल्याची काही उदाहरणं आहेत.
 
किशोरवयीन दिमा युद्धापूर्वी सामान्य जीवन जगायचा. तो त्याच्या पालकांसोबत राहत होता, मित्रांसोबत किंवा त्याच्या फोनवर वेळ घालवायचा आणि कधीकधी त्याच्या बहिणींसोबत भांडायचा.
 
दिमा आता गावाच्या बाहेरील स्मशानभूमीत त्याचे पालक आणि आजी-आजोबांच्या कबरीच्या समोर उभा राहून त्यावर ठेवलेल्या रंगीबेरंगी फुलांकडे एक टक पाहत असतो.
 
अद्याप त्यांची दगडाची थडगी बांधण्यात आलेली नाहीत. स्मितहास्य करणारे त्यांचे फोटो अजूनही लाकडी क्रॉसवर लावलेले आहेत.
 
इथे फार कमी लोक भेट देतात.
 
ह्रोझा रशियन सीमेच्या अगदी जवळ आहे आणि गावापासून सुमारे 30 किलोमीटर दूर असलेल्या कुप्यान्स्क शहराच्या आजूबाजूला जोरदार लढाई सुरू आहे.
 
युक्रेनचे राष्ट्रीय रंग असलेल्या निळ्या आणि पिवळ्या रंगांची फुलं कबरीवर उठून दिसतात. आजूबाजूला पसरलेली शांतता फक्त दूरच्या अंतरावरील स्फोटांच्या आवाजाने भंग पावते.
 
पालकांच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त आणि दुःखी झालेल्या दिमा आणि त्यांच्या बहिणीला आजी-आजोबांच्या आश्रयाला जावं लागलं.
 
“हल्ल्यामुळे असंख्य लोकं मारली गेली. गाव अचानक रिकामं झालं,” असं दिमाच्या 62 वर्षांच्या आजोबांनी मला सांगितलं.
 
“हे दुःख कधीच विसरता येणार नाही. आमच्या घरात चार शवपेट्या होत्या. काय घडलंय हे माझ्या बुद्धीला कळलं होतं, पण माझ्या मनाचा अजूनही त्यावर विश्वास बसत नाही.”
 
आपली मुलगी ओल्गा आणि तिचा नवरा अनातोली यांचा काढलेला शेवटचा फोटो त्यांनी मला दाखवताना ते म्हणाले, "त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचं घर छान होतं.”
 
अनातोली एकदा विनोदाने म्हणाला होता की तो जर ओल्गाच्या आधी वारला तर ती रडत न बसता पुन्हा लग्न करून मोकळी होईल, असं व्हॅलेरी यांनी सांगितलं.
 
"पण ओल्गा म्हणाली, 'नाही, प्रिय अनातोली, आपण दोघे एकाच दिवशी या जगाचा निरोप घेऊ.’ भविष्यात काय वाढून ठेवलंय हे तिला माहित होतं का,” व्हॅलेरी डोळे चोळत आणि अश्रू पुसत सांगत होते.
 
ऑक्टोबरमधील हल्ल्यानंतरच्या काळाला व्हॅलेरी "एक वेगवान भयपटाची" उपमा देतात.
 
त्यांनी आपल्या मुलीला शोधण्यासाठी धाव घेतली, परंतु ते वेळेवर पोहचू शकले नाहीत. ओल्गा मृत्यूशय्येवर असताना तिच्यासोबत एक महिला होती, ती म्हणाली मरताना तिचे शेवटचे शब्द होते : "मला जगायचं आहे."
 
व्हॅलेरी आणि त्यांची पत्नी लुबोव्ह यांनी दिमा, त्याची मोठी बहीण डॅरीना (17 वर्षे), आणि धाकटी बहीण नास्त्या (10 वर्षे) यांना दत्तक घेतलं.
 
"माझ्या नातवंडांना माझ्यासोबत इथेच राहावं लागणार आहे. मी हे कुटुंब तुटू देऊ शकत नाही," ते म्हणाले, जर यांनी त्यांना दत्तक घेतलं नसतं, तर या मुलांना अनाथाश्रमात जावं लागलं असतं, अशी भीती त्यांना वाटत होती.
 
नातवंडांची काळजी घेणं हे कधीच सोपं नसतं अशी प्रांजळ कबुली व्हॅलेरी देतात, परंतु या कठिण काळात ते एकमेकांसोबत आहेत.
 
"दिमा बागकामात मदत करतो आणि घरातील पाळीव डुकरांची काळजी घेतो," असं ते म्हणाले. “डॅरीना स्वयंपाक करायला शिकली आहे आणि नास्त्या अतिशय विचारी आणि दयाळू आहे."
 
या हल्ल्यात गावातील एकूण चौदा मुलांनी किमान एक पालक गमावलाय आणि यापैकी आठ मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईकांनी मुलांची जबाबदारी घ्यायचं ठरवलं जेणेकरून त्यांना अनाथाश्रमात पाठवावलं लागणार नाही.
 
झालेल्या घटनेमुळे अजूनही अनेक लोकं घाबरलेले आहेत. “ती अंत्ययात्रा मी कधीही विसरू शकणार नाही जेव्हा ही सर्व मुलं तिथे एकमेकांचा हात हातात घेऊन शांतपणे आणि एकटी उभी होती,” असं स्थानिक रहिवासी डायना नोसोवा यांनी मला सांगितलं. “ते दृश्य पाहून मला अतिशय वाईट वाटत होतं.”
 
हल्ल्यानंतर काही अनाथ मुलांनी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
 
त्यांच्यापैकी व्लाड (14 वर्षे) याने आई, आजोबा, काका आणि आठ वर्षांचा चुलत भाऊ या सर्वांना गमावल्यानंतर तो आपल्या काकूंसोबत पश्चिम युक्रेनमध्ये राहायला गेला.
 
"मला तुझी खूप आठवण येते," तो व्हिडिओ कॉलवर त्याची आजी व्हॅलेंटिनाला सांगत होता. "मलाही तुझी आठवण येते,” त्याची आजी त्याला उत्तर देते.
 
पती, मुलगी, मुलगा आणि एक नातू यासह तिच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांना या हल्ल्यात गमावल्यानंतरही 57 वर्षीय व्हॅलेंटिना यांनी ह्रोझामध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
 
आपलं संपूर्ण आयुष्य व्यतित केलेल्या गावात मी त्यांना फिरायला घेऊन गेले. आता गोष्टी वेगळ्या आहेत.
 
क्षेपणास्त्र पडलेल्या इमारतीच्या समोरून आम्ही वेगाने पुढे चालत जातो. त्या मला सांगतात, "ही अतिशय भयानक जागा आहे. "तुमची मुलं इथे जमिनीवर पडली होती हे पचवणं अतिशय अवघड आहे. त्यांचा मृत्यू इथेच झालाय.”
 
“मी जितक्या वेळा इथून जाते, तितकं मला त्याचं अधिक वाईट वाटतं. माझ्याजवळ कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. जवळजवळ सर्वजण मारले गेले."
 
दोन कुत्री आणि स्टीफन नावाची मांजर - या त्यांच्या पाळीव प्राण्यांकडून त्यांना दिलासा मिळतो असं व्हॅलेंटिना म्हणतात.
 
माझी प्राथमिकता आता माझा नातू व्लाड आहे, असं त्या सांगतात. त्याने चांगलं शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे. ती त्याला वारंवार व्हिडिओ कॉल करते आणि त्याच्यासाठी पैसे भरून अतिरिक्त आयटी क्लास लावला आहे.
 
व्लाडची सुरक्षितता त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते आणि तो आता खारकीवमध्ये राहत नाही याचा त्यांना आनंद आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारापासून त्याला आता थोडासा दिलासा मिळाला आहे.
 
रशियन सैन्याने आक्रमणाच्या सुरुवातीलाच ह्रोझासह हा संपूर्ण प्रदेश ताब्यात घेतला होता. युक्रेनने सप्टेंबर 2022 मध्ये मोठी कारवाई करत हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. परंतु युद्ध सुरू असताना या भागाला अजूनही रशियन ड्रोन हल्ले, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलं जातंय.
 
तिथे दिमाच्या घरी, त्याच्या मोठ्या बहिणीने त्यांच्या दिवंगत प्रियजनांचे फोटो भिंतीवर लावले आहेत.
 
ते आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचे आजोबा व्हॅलेरी याबाबत सकारात्मक आहेत: "सर्व ठीक आहे," असं ते म्हणतात.
 
कोणत्याही प्रकारे युद्धाचा शेवट होताना दिसत नाहीए आणि रशिया नजिकच्या कुप्यान्स्क शहरात अधिक सैन्य गोळा करताना दिसतंय, त्यामुळे हा जगण्याचा धाडसी विचार असू शकतो.
 
परंतु, इथे जे काही घडलं, त्यानंतरही व्हॅलेरी आयुष्य उत्साहाने जगण्याचा आग्रह धरतात.
 
"माझी नातवंडं बरी आहेत, ती हसतायत यातून मला समाधान मिळतं. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत तुम्ही आशावादी राहायला हवं,” असं ते म्हणतात.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments