Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईसच्चरित - अध्याय ४८

Webdunia
शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:18 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां हा अध्याय करितां सुरू । जया अत्यंत श्रवणादरू । ऐसा श्रोता लागला विचारूं । गुरु कीं सद्नुरु श्रीसाई ॥१॥
तयाचिया समाधाना । कथूं सद्नुरूच्या संक्षिप्त लक्षणा । जेणें श्रीसाईसमर्थचरणां । मिळतील खुणा सद्नुरूच्या ॥२॥
येयूनि प्राप्त वेदाध्ययन । अथवा साही शास्त्रांचें ज्ञान । जिंहीं करविलें वेदान्तनिरूपण । ज्ञाते न सद्नुरु म्हणती तया ॥३॥
कोणी एक वायु कोंडिती । तप्त मुद्रा धारण करिती । ब्रम्हानुवादें श्रोतयां रिझविती । ज्ञाते न सद्नुरू म्हणती तया ॥४॥
शिष्यां शास्त्रोक्त मंत्रही देती । जप करावया आज्ञा करिती । होईल केव्हां फलप्राप्ती । विश्वास न चित्तीं कोणाही ॥५॥
तत्त्वनिरूपण अति रसाळ । शब्दज्ञान अघळपघळ । स्वानुभवाचा मात्र दुष्काळ । शाब्दिक पोकळ तें ज्ञान ॥६॥
ऐकतेक्षणीं निरूपण नीट । उभय भोगांचा येईल वीट । परी अभुभवाची चवी चोखट । अनुभवी तोच प्रकटवी ॥७॥
असोनि संपूर्ण शब्दज्ञानी । पूर्णानुभवी अपरोक्षदानी ॥ त्याचाचि अधिकार शिष्यप्रबोधनीं । म्हणावें त्यालागोनि सद्नुरु ॥८॥
स्वयें ज्यातें अनुभव नाहीं । तो काय शिष्यातें देईल पाहीं । जया न अपरोक्ष अनुभव कांहीं । सद्नुरु कदाही न म्हणावा ॥९॥
शिष्यापासून घ्यावी सेवा ॥ स्वप्नींही न धरी ऐसिया भावा । उलट शिष्यार्थ निजदेह लागावा । इच्छी तो जाणा सद्नुरु ॥१०॥
शिष्य म्हणजे किंपदार्थ । गुरु काय तो श्रेष्ठांत श्रेष्ठ । ऐसिया अहंभावाविरहित । तोचि सद्नुरु हितकारी ॥११॥
शिष्य तोही पूर्णब्रम्हा । तयाठायींही पुत्रपेम । इच्छी न त्यापासाव योगक्षेम । सद्नुरु तो परम श्रेष्ठ जगीं ॥१२॥
परम शांतीचें जें निधान । विद्वत्तेचा न जेथें अभिमान । सान थोर समसमान । तेंच सद्नुरुस्थान जाणावें ॥१३॥
ऐसीं ही सर्वसाधारणें । सद्नुरूचीं संक्षिप्त लक्षणें । निवेदिलीं म्यां अनन्य - शरणें । श्रोतयांकारणें संकलित ॥१४॥
साईदर्शनें तुष्टले लोचन । तयां भाग्यवंतांलागून । मी काय याहूनि वर्णूं सकेन । सद्नुरुलक्षण हें सत्य ॥१५॥
जन्मोजन्मींचा पुण्यातिशय । गांठींस होता त्याचा संचय । तेणें हे आम्हांस लाधले पाय । या सद्नुरुराय साईंचे ॥१६॥
पूर्ण तारुण्यींही अपरिग्रह । निराधार ना वेस ना गृह । तमाखू चिलीम हा काय तो  संग्रह । मनोनिग्रह भयंकर ॥१७॥
वर्षें अष्टादश असतां वय । तेव्हांपासूनही पूर्ण मनोजय । सदा एकांतीं वसावें वसावें निर्भय । लावूनि लय स्वरूपीं ॥१८॥
पाहोनि भक्तांची आवडी शुद्ध । ‘भक्तपराधीन मी’ हें ब्रीद । भक्तवृंदा दावावया विशद । भक्तप्रेमास्पद वर्ते जो ॥१९॥
जय प्रब्रम्हा सनातना । जय दीनोद्धारा प्रसन्नवदना । जय चैतन्यघना भक्ताधीना । दे निजदर्शना निजभक्तां ॥२०॥
जयजया जी द्वंद्वातीता । जयजया जी अव्यक्तव्यक्ता । सर्वसाक्षी सर्वातीता । अकळ अभक्तां सकळिकां ॥२१॥
जय जय भवसंतापहरणा । जय जय भवगजविदारणा । जय जय आश्रितप्रेमपूर्णा । संकटनिरसना सद्नुरुराया ॥२२॥
तुज अव्यक्तीं समरसतां । आकार पावला निराकारता । परी तव भक्तकल्याणकारिता । देह ठेवितांही न सरे ॥२३॥
देहीं असतां जी जी कृति । तोच समरसतां अव्यक्तीं । तेच अनुभव आजही भोगिती । जे तव भक्तीं लागले ॥२४॥
त्वां मज पामरा निमित्त करुनी । निरसावया अविद्यारजनी । प्रकट केला निजचरित्रतरणी । जो भक्तोद्धरणीं समर्थ ॥२५॥
आस्तिक्यबुद्धि श्रद्धास्थिती । हीच भक्तांची ह्रदयपणती । प्रेमस्नेहें उजळिजे वाती । ज्ञानज्योती प्रकटेल ॥२६॥
प्रेमावीण शुष्क ज्ञान । तयाचें कोणा काय प्रयोजन । विनाप्रेम न समाधान । प्रेम अविच्छिन्न असावें ॥२७॥
काय वानूं प्रेममहिमान । तयापुढें तुच्छ आन । गांठीं नसल्या प्रेम गहन । श्रवण वाचन निष्फळ ॥२८॥
प्रेमापाशीं नांदे भक्ति । तेथेंच अवघी शांती विरक्ति । तेथेंच पाठीं तिष्ठे मुक्ति । निजसंपत्तीसमवेत ॥२९॥
प्रेम नुपजे भावावीण । भाव तेथें देव जाण । भावापोटीं प्रेम पूर्ण । भावचि कारण भवतरणा ॥३०॥
गंगोदकासम पवित्र । परम गोड साईचरित्र । तेणेंचि त्याचें सजविलें स्तोत्र । निमित्तमात्र हेमाड ॥३१॥
श्रवण करितां साईसच्चरित । श्रोते वक्ते नित्यपूत । पापपुण्याचा होई घाट । नित्यमुक्त दोघेही ॥३२॥
भाग्यें आगळे ऐकतां श्रोत्र । भाग्यें आगळें वक्तयाचें वक्त्र । धन्य हें श्रीसाईस्तोत्र । अतिपवित्र निजभक्तां ॥३३॥
होऊनियां शुद्धचित्त । सद्भावे जे परिसती चरित । तयांचे ते सकळ मनोरथ । होतील सुफलित सदैव ॥३४॥
परम भावार्थें आदरेंसीं । ऐकती या सच्चरितासी । निजपदभक्ति अनायासीं ।  लाभे तयांसी अविलंबें ॥३५॥
भक्तिभावें साईचरण । सेवितां करितां साईस्मरण । होईना यथेच्छ इंद्रियाचरण । सहज भवतरण रोकडें ॥३६॥
भक्तचातकां निजजीवन । ऐसें हें साईसच्चरितकथन । श्रोतां श्रवणापाठीं मनन । कीजे आयतन श्रीकृपेचें ॥३७॥
सर्वावस्थीं सावधना । होऊनि श्रोतीं केलिया श्रवण । सहज होय भवतरण । कर्मबंधन तुटोन ॥३८॥
असो मनीं म्हणतील श्रोते । केव्हां हो आरंभ होणार कथेतें । दवडितों त्यांचिया अस्वस्थतेतें । प्रस्तावनेतें करोनि ॥३९॥
पूर्वाध्यायीं झालें कथन । वैर हत्या आणि ऋण । हीं फेडावया पुनर्जन्म । येई निजकर्म भोगावया ॥४०॥
तयांस नाहीं पूर्वस्मरण । परी या संतां कदा न विस्मरण । करिती निजभक्त - संकटनिवारण । असेना जनन कोठेंही ॥४१॥
तैसीच आतां दुसरी कथा । देतां घेतां बसतउठतां । संतांपायीं विश्वास ठेवितां । पावती सफलता निजभक्त ॥४२॥
कर्मारंभ करूं जातां । आधीं हरिगुरुचरण स्मरतां । तेच निवारिती निजभक्तचिंता । कर्मीं निजदक्षता ठेविलिया ॥४३॥
कर्म मात्र मी करणार । समर्थ हरिगुरु फल देणार । ऐसा ज्याचा द्दढ निर्धार । बेडा पार तयाचा ॥४४॥
संत आरंभीं उग्र भासती । तरी त्यांपोटीं लाभेंवीण प्रीति । अल्प धीर पाहिजे चित्तीं । करितील अंतीं कल्याण ॥४५॥
शापताप - संसृतिमाया । सत्संगाची पडतां छाया । ठाय़ींचे ठायींच जातील विलया । म्हणोनि त्या पायां विनटावें ॥४६॥
सविनय आणि  अनुद्धत । होऊनि संतां शरणागत । प्रार्थावें त्यां निजगुजहित । देतील चित्त - स्वास्थ्यातें ॥४७॥
अल्पज्ञानाचिया अभिमानीं । संतवचनीं विकल्प मानी । होते त्या आधीं कैसी हानी । विश्वासें निदानीं कल्याण ॥४८॥
शुद्धमनें वा कपटें सर्वथा । खर्‍या संतांचे चरण धरितां । अंतीं पावे तो निर्मुक्तता । अगाध योग्यता संतांची ॥४९॥
ये अर्थीची बोधक कथा । श्रवण कीजे सावधानता । स्वानंदनिर्भर होईल श्रोता । तैसाचि वक्ता उल्लसित ॥५०॥
वकील अक्कलकोटनिवासी । सपटणेकर नाम जयांसी । परिसा तयांचे अनुभवासी । मन उल्लासित होईल ॥५१॥
वकीलीचा रात्रंदिवस । करीत असतां ते अभ्यास । भेटले विद्यार्थी शेवडे त्यांस । करीत विचारपूस परस्पर ॥५२॥
सहाध्यायीही इतर आले । तेथेंच खोलींत एकत्र बैसले । प्रश्न एकेकां पुसूं लागले । पहाया अभ्यासिलें पाडून ॥५३॥
पहावें कोठें कोणाचें चुकतें । कोणाचें उत्तर बरोबर येतें । करावें संशयनिवृत्तीतें । चित्तस्वस्थतेलागुनी ॥५४॥
शेवडे यांचीं चुकलीं उत्तरें । अंतीं म्हणाले विद्यार्थी सारे । कैसेनि यांची परीक्षा उतरे । अभ्यासिलें अपुरें सर्वचि ॥५५॥
केला जरी त्यांनीं उपहास । शेवडयांचा पूर्ण विश्वास । पुरा वा अपुरा अभ्यास । वेळीं मी पास होणार ॥५६॥
मी न जरी अभ्यास केला । माझा साईबाबा मजला । पास कराया आहे बैसला । करूं मी कशाला काळजी ॥५७॥
परिसतां ऐसिया बोलां । आश्चर्य वाटलें सपटणेकरांला । नेऊनि शेवडयांस एके बाजूला । पुसावयाला लागले ॥५८॥
अहो हे साईबाबा कोण । जयांचे एवढे वर्णितां गुण । जयांवर तुमचा विश्वास पूर्ण । वसतीचा ठाव कवण कीं ॥५९॥
मग त्या साईबाबांची महती । प्रत्युत्तरीं शेवडे कथिती । सवेंचि आत्मविश्वासस्थिती । तयांसी वदती प्रांजळपणें ॥६०॥
सुप्रसिद्ध नगर जिल्हा । त्यामाजील शिर्डी गांवाला । फकीर एक मशिदीं बैसला । असे बहु नांवाजला सत्पुरुष ॥६१॥
संत आहेत जागोजाग । परी तयांचे भेटीचा योग । गांठीस नसतां पुण्य अमोघ । प्रयत्नें हा सुयोग लाभेना ॥६२॥
विश्वास माझा पूर्ण त्यावर । करील तो जें तेंच होणार । वदेल वाचे तेंच घडणार । नाहीं तें चुकणार कल्पांतीं ॥६३॥
कितीही केल्या यंदा प्रयास । परीक्षेत मी होणार नापास । परी पुढील वर्षीं अप्रयास । होणार मी पास त्रिसत्य ॥६४॥
मज हें आहे त्यांचें आश्वासन । तयांवर माझा भरंवसा पूर्ण । होणें न त्यांचें अन्यथा वचन । गांठ मीं बांधून ठेविलीसे ॥६५॥
नवल काय ही तों होईल । होईल परीक्षा याच्याही पुढील । हास्यास्पद हे वाटले बोल । नि:संशय फोट सपटणेकरां ॥६६॥
विकल्पपूर्ण त्यांचें मन । त्यांना हें काय आवडे कथन । असो शेवडे गेले तेथून । परिसा तें वर्तमान पुढील ॥६७॥
पुढें कालें अनुभवांतीं । अन्वर्थ झाल्या शेवडयांच्या उक्ती । दोनीही परीक्षा पास होती । आश्चर्य चित्तीं सपटणेकरां ॥६८॥
पुढें जातां दहा सालें । सपटणेकर उद्विग्न झाले । दुर्दैव एकाएकीं ओढवलें । तंव ते पावले उदासता ॥६९॥
एकुलता एक मुलगा त्यांला । कंठरोगानें निधन पावला । सन एकूणीसशॆं तेरा सालाला । अत्यंत विटला संसारा ॥७०॥
आदिकरूनि पंढरपुर । गाणगापुरादि तीर्थें समग्र । झालीं परी न सुखावे अंतर । वाचिला नंतर वेदान्त ॥७१॥
ऐसा कांहीं काळ लोटतां । चित्तास कांहीं येते का शांतता । म्हणूनि मार्गप्रतीक्षा करितां । आठवला वृत्तांत शेवडयंचा ॥७२॥
शॆवडे यांचा निश्चय स्मरला । साइपदींचा विश्वास आठवला । आपणही जावें श्रीदर्शनाला । वाटलें मनाला तयांच्या ॥७३॥
संतदर्शानीं धरिला हेत । सन कोणीसशें तेरा सालांत । शिर्डीस जाण्याचा झाला बेत । निघाले समवेत बंधूच्या ॥७४॥
निमित्त शेवडे यांचें स्मरण । वंदावया आपुले चरण । साईच तयां करिती पाचारण । तें सावचित्त श्रवण करा ॥७५॥
पंडितराव कनिष्ठ सहोदर । तयां घेऊनियां बरोबर । संतदर्शना सपटणेकर । निघाले सपरिवार शिर्डीस ॥७६॥
असो ते दोघे तेथें आले । येतां श्रींच्या दर्शना निघाले । दुरूनि बाबांचें दर्शन झालें । अत्यंत धाले चित्तांत ॥७७॥
दुरूनि परी ती डोळेभेट । होतांच सत्वर गेले निकट । दोघेही जोडूनि करसंपुट । समोर तिष्ठत बाबांचे ॥७८॥
दोघेही ते अति विनीत । बाबांसन्मुख लोटांगणीं येत । श्रीफल साईचरणीं समर्पीत । शुद्धमावान्वित सप्रेम ॥७९॥
श्रीफल अर्पितां सपटणेकर । समर्थांचिया चरणांवर । “चल हट” शब्दें बाबा धिक्कार । करीत सपट्णेकर यांचा  ॥८०॥
सपटाणेकर चिंताग्रस्त । बाबा व्हावे कां संतप्त । मनीं म्हणती बाबांचे परिचित । पाहूनि त्यां इंगित पुसावें ॥८१॥
दर्शनें जे व्हावे प्रसन्न । तेच या शब्दें अत्यंत खिन्न । होऊनि सचिंत अधोवदन । बैसले सरकून माघारां ॥८२॥
आतां कोणापासीम जावें । कोणा भक्तालगीं पुसावें । काय बाबांच्या बोलांत असावें । मनोगत पुसावें कोणास ॥८३॥
ऐसा त्यांचा पाहूनि भाव । कोणी त्यांचिया समाधानास्तव । कथितां बाळा शिंप्याचें नांव । शोधिला ठाव तयाचा ॥८४॥
तयालागीं सपटणेकर । निवेदिते झाले वृत्तांत साग्र । म्हणाले बाबा माझा धिक्कार । करिती अत्युग्रवाचेनें ॥८५॥
तुम्ही तरी मजसवें यावें । दर्शन शांतपणें करवावें । कृपावलोकन बाबांचें व्हावें । कोपा न यावें आम्हांवरी ॥८६॥
असो हें बाळानें मान्य केलें । सपटणेकर निश्चिंत झाले । फोटो बाबांचे विकत आणविले । दर्शना निघाले बाबांच्या ॥८७॥
बाळा शिंपी होता संगतीं । फोटो घेऊनि आपुले हातीं । बाळा मग देऊनि बाबांप्रती । बाबांस विज्ञप्ति करिताहे ॥८८॥
काय हें देवा कसलें चित्र । पाहूनि बाबा देती उत्तर । हा फोटो आहे याचा यार । बोटानें सपटणेकर दावीत ॥८९॥
ऐसें बोलूनि बाबा हांसले । मंडळीसही हांसूं आलें । बाबा काय हो इंगित यांतलें । बाळानें पुसिलें बाबांस ॥९०॥
तात्काळ बाळा सपटणेकरां । म्हणे घ्या दर्शन करा त्वरा । मग ते करितां नमस्कारा “चल हट” उद्नारां परिसिलें ॥९१॥
तेंच पूर्वील “चल हट” । अजून माझी पुरवी पाठ । आतां काय करावी वाट । आश्चर्य उद्भट सपटणेकरां ॥९२॥
मग ते दोघे जोडूनि कर । तिष्ठत असतां बाबांसमोर । ‘निघूनि जा जेथूनि सत्वर’ । आज्ञा त्यां अखेर बाबांची ॥९३॥
वाक्य तुमचें स्वामीसमर्था । अनुश्ल्लंघ्य कोणाही सर्वथा । काय आम्हां पामरांची कथा । निघालों आतां येच घडी ॥९४॥
ऐकोनि आपण महाउदार । दर्शना आलों तों धिक्कार “चल हट” शब्दें आमुचा सत्कार । काय हा चमत्कार कळेना ॥९५॥
तेव्हां असावें कृपावलोकन । द्यावें आम्हां आशीर्वचन । व्हावें सत्वर पुनर्दर्शन । ऐसें आश्वासन मागितलें ॥९६॥
ऐसा कोण आहे ज्ञानी । जाणेल काय बाबांचे मनीं । परंतु झालेली आज्ञा मानुनी । गेले स्वस्थानीं माघारां ॥९७॥
ऐसें हें त्यांचें प्रथम दर्शन । तेणें ते दोघे अति उद्विग्न । गेले आपुले गांवा परतोन । यत्किंचित विलंब न करितां ॥९८॥
पुढें आणीक वर्ष गेलें । तरीही न मन स्थिर झालें । पुनश्च गाणगापुर केलें । चित्त भडकलें अधिकचि ॥९९॥
विश्रांत्यर्थ सपटणेकर । गेले माढेगांवीं नंतर । काशीक्षेत्रीं जाण्याचा विचार । केला कीं अखेर तयांनीं ॥१००॥
आतां काशीस निघावयास । उरले अवघे दोनच दिवस । झाला द्दष्टान्त निजकांतेस । राहिला प्रवास काशीचा ॥१०१॥
द्दष्टान्ताचा चमत्कार । कैसा त्याचा अभिनव प्रकार । कथितों व्हावें श्रवणतत्पर । लीलाचरित्र साईंचें ॥१०२॥
झोंपेंत असतां शेजेवर । स्वप्नसृष्टी डोळ्यांसमोर । बाई घेऊनियां घागर । जाई विहिरीवर लक्कडशाचे ॥१०३॥
तेथें एका निंबातळी । डोईस जो फडका गुंडाळी । ऐसा एक फकीर ते वेळीं । म्हणे मजजवळी पातला ॥१०४॥
“कां व्यर्थ श्रमसी बाळ” । फकीर उद्नारला स्वरें कोमळ । “भरूनि देतों तुझी ही सकळ । घागर निर्मळ उदकेंसीं” ॥१०५॥
वाटली भीति फकीराची । घेऊनि घागर रिकामीचि । वाट माघारा धरिली घराची । सवें मागेंमागेंचि फकीर ॥१०६॥
ऐसियेपरि पाहूनि स्वप्न । जागा झालें उघडले नयन । परिसूनि कांतास्वप्ननिवेदन । नेमिलें गमन शिर्डीचें ॥१०७॥
तेच मुहूर्तीं दोघें निघालीं । उदईक शिर्डीग्रामा पातलीं । येतांच मशिदीमाजीं गेलीं । बाबा ते कलीं लेंडीवर ॥१०८॥
बाबा परत येईपर्यंत । बैसतीं झालीं दोघेंही तेथ । बाबांची मार्गप्रतीक्षा करीत । बाबा तंव इतुक्यांत पातले ॥१०९॥
मूर्ति जी देखिली द्दष्टान्तांत । तीच ती पाहूनि नकशिखान्त । बाई जाहली विस्मयान्वित । मग ती न्याहाळीतचि राहिली ॥११०॥
होता बाबांचें पादक्षालन । बाई गेली घ्यावया दर्शन । करोनि साईपदाभिवंदन । बैसली अवलोकन करीतचि ॥१११॥
पाहोनि तियेची विनीतता । उल्लास साईनाथांचे चित्ता । बाबांनीं हळूच आरंभिली कथा । बाईची व्यथानिवारक ॥११२॥
तेव्हां नित्यक्रमानुसार । बाबा आपुलीच व्यथा सविस्तर । निवेदूं लागले प्रेमपुर:सर । तत्रस्थ एक्या तिसर्‍यास ॥११३॥
पाहूं जातां बाईची कथा । बाईस सांगावयाची असतां । तिच्यासमक्ष तिसर्‍यास कथितां । परिसिली अतिसावधानता बाईनें ॥११४॥
“माझे हात पोट कंबर । बहुत दिवस दुखे अनिवार । औषधें करितां झालों बेजार । होईना परिहार व्यथेचा ॥११५॥
कंटाळलों मीं औषधें खातां । गुण म्हणून येईना तत्त्वतां । परी मज आश्चर्य वाटे आतां । गेली कीं व्यथा एकाएकीं” ॥११६॥
ऐसी ही कथा तिजिया कथितां । बाईचा नामनिर्देशही न करितां । तियेचीच ही वार्ता सर्वथा । संबंध हा होता तियेचा ॥११७॥
पुढें मासादोंमासांअंतीं । बाबांनीं आपुली जी वर्णिली होई । त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ति । झाली तंव प्रतीति पटली तिला ॥११८॥
पूर्ण झाली बाईची कामना । तंव सपटणेकर घेती दर्शना । त्यांची पूर्वील “चल हट” संभावना । बाबांनीं पुन्हां केलीच ॥११९॥
न कळे काय माझी चूक । धिक्कारिती मज बाबा अचूक । नमस्कारितां उत्तर एक । मजला ठराविक तयांचें ॥१२०॥
काय कीं माझें पूर्वार्जित । मजवरीच कां रागेजत । इतरांपाशीं माझियादेखत । वर्तत अत्यंत प्रेमानें ॥१२१॥
पाहूं जातां सांजसकाळीं । बाबांपाशीं अवघी मंडळी । आनंदें अनुभवीत नित्य दिवाळी । माझेच कपाळीं ‘चल हट्’ ॥१२२॥
कांहीं माझें कर्म विकोपा । गेलें पावलों धर्मविलोपा । आश्रय झालों अनंत पापा । तेणेंच ही अवकृपा मजवरी ॥१२३॥
आरंभीं मी बाबांविषयीं । होतों कुतर्की तैसाच संशयी । तेणेंच वाटलें ऐसिया उपायीं । बाबाच मज ठायीं पाडीत ॥१२४॥
म्हणूनि केला निजनिर्धार । अनुग्रह बाबांचा होयतोंवर । तेथेंच वृत्ति ठेवूनि स्थिर । रहावें सुस्थिर मानसें ॥१२५॥
त्रिविधतापें तापलेला । वरी साईंच्या दर्शना भुकेला । ऐसा कोण विन्मुख गेला । जो न निवाला अंतरीं ॥१२६॥
तरी ते दिवसीं अति उद्विग्न । गोड न लागे अन्नपान । गोड न लागे गमनागमन । उन्निद्रनयन शेजेवर ॥१२७॥
जवळ नाहीं कोणी अवांतर । बाबाच एकले असती गादीवर । साधूनियां ऐसा अवसर । धरावे चरण बाबांचे ॥१२८॥
करीत निश्चय सपटणेकर । फळासि आला त्यांचा निर्धार । होऊनियां सद्नदितांतर । धरीत चरण बाबांचे ॥१२९॥
पायांवरी ठेवितां शिर । बाबा तयावर ठेवीत निजकर । पादसंवाहन करीत सपटणेकर । आली एक बाई धनगर तों ॥१३०॥
बाई येतांच तेथवर । रगडूं बैसली बाबांची कंबर । बाबा नित्यक्रमानुसार । वार्ता तिजबरोबर करितात ॥१३१॥
वार्तेचा त्या चमत्कार । लक्षपूर्वक सपटणेकर । ऐकतां ती त्याचीच समग्र । अक्षरें अक्षर आढळली ॥१३२॥
जरी होकार धनगरी देत । सपटणेकर आश्चर्यभरित । आपुलेंच वृत्त वैसले ऐकत । तेणें ते चकित अंतरीं ॥१३३॥
गोष्ट ती एका वाणियाची । परी वस्तुत: होती त्यांची । त्यांतरी त्यांचे मयत मुलाची । वार्ता मृत्यूची निघाली ॥१३४॥
कोणी अत्यंत परिचित । नातेवाईक सांगे वृत्त । जन्मापासूनि मरणापर्यंत । तैसें तें साद्यंत कथियेलें ॥१३५॥
बाईलागीं सांगती कथा । तिचा न कथेशीं संबंध तत्त्वतां । ती तों  पितापुत्रांची वार्ता । विषय सर्वथा दोघांचा ॥१३६॥
असो ऐसी निजकथा । साईमुखें सपटणेकर ऐकतां । परम विस्मय जाहला चित्ता । बाणली आदरता साईपदीं ॥१३७॥
वाटलें तयां मोठें कौतुक । बाबांला ही कैशी ठाऊक । परी जैसा करतलामलक । तेवीं हें सकळिक बाबांना ॥१३८॥
ब्रम्हास्वरूप स्वयें आपण । तयाचें विश्व कुटुंब जाण । किंबहुना विश्वचि नटला पूर्ण । तीच ही खूण साईची ॥१३९॥
एकात्मतेचा विस्तार । तोच कीं साईचा अवतार । तयास कैंचें आपपर । स्वयें सविस्तर जगरूप ॥१४०॥
विनटला जो परमपुरुषा । तया कैंची द्वैतभाषा । द्रष्टा दर्शन अथवा द्दश्या । नातळे आकाशा जणूं लेप ॥१४१॥
बाबा महान अंतर्ज्ञानी । ऐसें येतांच तयांचे मनीं । बाना काय तयांलागुनी । वदले तें सज्जनीं परिसिजे ॥१४२॥
वोट दावुनि तयांसमोर । बाबा साश्चर्य काढिती उद्नार । “मारिलें म्हणे मीं याचें पोर । आरोप मजवर हा ठेवी ॥१४३॥
मी लोमांचीं पोरें मारितों । हा कां मशिदीस येऊनि रडतो । बरें मी आतां ऐसें करितों । पोटासी आणितों पुत्र त्याचा ॥१४४॥
जैसा मेलेला रामदास । दिला माघारा त्या बाईस । तैसाच पुनश्च त्याचिये मुलास । आणितों मी पोटास त्याचिया” ॥१४५॥
ऐसें ऐकूनि सपटणेकर । तिष्ठत लावूनि बाबांकडे नजर । ठेवूनि त्यांच्या मस्तकीं कर । बाबा त्यां धीर देतात ॥१४६॥
म्हणती “हे पाय पुरातन फार । जाहली तुझी काळजी दूर । पूर्ण भरंवसा ठेव मजवर । कृतार्थ लवकर होसील” ॥१४७॥
करीत असतां पादसंवाहन । परिसतां बाबांचें मधुरवचन । सपटणेकर सद्नदितनयन । पदाभिवंदन करीत ॥१४८॥
आले अष्टभाव दाटून । नयनीं आनंदाश्रुजीवन । तेणें बाबांचें पादक्षालन । प्रेमें प्रक्षालन मग केलें ॥१४९॥
पुन्हां बाबांनीं मस्तकीं हात । ठेवूनि म्हणाले बैसावें स्वस्थ । तेव्हां सपटणेकर बिर्‍हाडीं परत । आले आनंदित मानसें ॥१०५॥
नैवेद्याची केली तयारी । देऊनियां निजयुवतीकरीं । पूजा आरती जाहलियावरी । ताट तें सारित बाबांपुढें ॥१५१॥
मग प्रोक्षूनियां पात्रास । करोनि सविधि नेत्रस्पर्श । प्राणापानव्यानादिकांस । अर्पोनि मग बाबांस समर्पिला ॥१५२॥
मग अनुसरूनि नित्यक्रमास । बाबांस होतां हस्तस्पर्श । स्वीकारितां नैवेद्यास । वाटला हर्ष सपटणेकरां ॥१५३॥
मग तत्रस्थ इत्र भक्त । होते बाबांचे पायां पडत । शिरले सपटणेकर त्या गर्दींत । पुनश्च नमस्कारीत त्वरेनें ॥१५४॥
असो ऐसिया त्या घाईंत । मस्तका मस्तका मस्तक आथडत । बाबा तेव्हां सपट्णेकरांप्रत । कैसे अनुवादत संथपणें ॥१५५॥
अरे कशाला वारंवार । नमस्कारावर नमस्कार । पुरे तो केला एकवार । आदरसत्कारपूर्वक ॥१५६॥
असो ते रात्रीं होती चावडी । सपटणेकर अति आवडी । प्रेमें निघाले पालखीअघाडीं । आनंदपरवडी दंडधारी ॥१५७॥
असो ही चावडीमिरवणूक । श्रोतयां पूर्वींच आहे ठाऊक । तरी पुनरुक्ति आवश्यक । विस्तारकारक वर्जियेली ॥१५८॥
असो पुढें ते रात्रीला । ही बाबांची अगाध लीला । बाबा दिसले सपटणेकरांला । जणूं पांडुरंगालाच पाहतों ॥१५९॥
असो पुढें मागतां आज्ञा । जेवूनि जावें झाली अनुज्ञा । न करितां यत्किंचित अवज्ञा । निघाले मग दर्शना ॥१६०॥
इतुक्यांत मग त्यांचिये मना । एकाएकीं उठली कल्पना । बाबा आतां मागतां दक्षिणा । ती मी पुरविणार कैसेनी ॥१६१॥
पैसे गांठीस होते ते सरले । गाडीभाडयाचे पुरतेच उरले । “दक्षिणा दे” जर वदले । उत्तर ठरविलें मनानें ॥१६२॥
मागावयाचे आधींच द्यावा । रुपया एक हातीटं ठेवावा । पुन्हां मागतां आणखी अर्पावा । नाहीं म्हणावा तयापुढें ॥१६३॥
अग्निरथाचे भाडयासाठीं । आवश्यक तेचि ठेविले गांठीं । ऐसें बाबांस सांगावें स्पष्टोक्तीं । ठरवोनि भेटीस ते गेले ॥१६४॥
पूर्वील कृतनिश्चयानुसार । रुपया एक ठेवितां हातावर । आणिक एकचि मागितला त्यावर । देतां ते भरपूर अनुवादले ॥१६५॥
म्हणाले “हा घे एक नारळ । स्वस्त्रियेच्या ओटींत घाल । आणिक मग तूं जाईं खुशाल । सोडूनि तळमळ जीवाची” ॥१६६॥
पुढें जातां महिने बारा । पुत्र आला त्याचिये उदरा । घेऊनि आठां मासांचिया लेंकुरा । आलीं तीं माघारा दर्शना ॥१६७॥
मुलगा घातला बाबांचे चरणीं । काय संतांची नवल करणी । मग तीं दोघें जोडूनि पाणी । करिती विनवणी ती परिसा ॥१६८॥
या उपकारा साईनाथा । केवीं उतराई व्हावें आतां । आम्हां कांहींच कळेना सर्वथा । ठेवितों माथा चरणांवर ॥१६९॥
हीन दीन आम्ही पामर । कृपा असावी अनाथांबर । आतां येथूनि पुढें निरंतर । चरणीं तव थार असावा ॥१७०॥
जागृतीमाजीं तैसेंच स्वप्नीं । नाना तरंग उठती मनीं । उसंत नाहीं दिवसरजनीं । तरी तव भजनीं लावीं आम्हां ॥१७१॥
असो तो मुलगा पुरलीधर । आणीक दोन भास्कर दिनकर । यांचियासमवेत सपटणेकर । प्रसन्नांतर जाहले ॥१७२॥
मग ते सवें घेऊनि भार्या । करूनि वंदन साई सदया । साधूनि चंचल मनाचे स्थैर्या । होऊनि कृतकार्या परतले ॥१७३॥
कथा संगावी संकलित । होता मनीं आरंभीं हेत । परी बदविता साईनाथ । तेणें हा ग्रंथ विस्तारला ॥१७४॥
तयासी हा हेमाड शरण । पुढील कथेचें अनुसंधान । तात्पर्यार्थ दिग्दर्शन । श्रोतयांलागून करीतसे ॥१७५॥
कथा ती याहूनि बहु गोड । चमत्काराची जया आवड । ऐसिया एका भक्ताचें कोड । पुरविलें नितोड साईंनीं ॥१७६॥
लोक वर्णितां साईंचे गुण । दोषदर्शी देखे अवगुण । स्वयें न स्वार्थपरमार्थपरायण । दोषैकदर्शन हेतु मनीं ॥१७७॥
असतील साईबाबा संत । तरी ते मज देतील प्रचीत । मजला अनुभव आलियाविरहित । मी त्यां यत्किंचित मानींना ॥१७८॥
केवळ परीक्षा पहावयास । गेलियाचीही इच्छा पुरत । हीच कथा पुढील अध्यायांत । श्रवण करोत सच्छ्रोते ॥१७९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । साशंकभक्तानुग्रहकरणं नाम अष्टचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
ALSO READ: साईसच्चरित - अध्याय ४९

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रीविष्णुमहिम्नस्तोत्रम्

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

आरती सोमवारची

रविवारी करा आरती सूर्याची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments