Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोजागिरी पौर्णिमा : चंद्र स्त्री आहे, की पुरुष? वेगवेगळ्या संस्कृतीत चंद्राविषयी काय समज-गैरसमज आहेत?

Webdunia
रविवार, 9 ऑक्टोबर 2022 (13:41 IST)
चंद्र. हा नुसता शब्दही उच्चारला, तरी किती वेगवेगळ्या आठवणी, किती वेगवेगळ्या भावना उंचबळून येतात ना?
कुणासाठी तो गोष्टीतला चांदोमामा आहे, कुणाला त्याच्यात प्रियकराचा किंवा प्रेयसीचा चेहरा दिसतो, तर कुणाला माणसाच्या अंतराळयात्रेतला पहिला टप्पा आठवतो. भरती आणि ओहोटीशीही चंद्राला जोडलं गेलं आहे.
जगातल्या प्रत्येकच ठिकाणच्या धर्म, संस्कृती आणि सभ्यतेत चंद्राविषयीचे समज, गैरसमज, आख्यायिका प्रचलित असल्याचं दिसून येतं.
 
भारतासह चीन, दक्षिण पूर्व आशियातील बहुसंख्य देश, इस्लामिक देश आणि इस्रायलमध्येही कालगणनेसाठी चंद्राचा आधार घेतला जातो.
 
काही ठिकाणी पूर्णपणे चंद्रावर आधारीत कालगणना (ल्युनर कॅलेंडर) तर काही ठिकाणी सूर्य-चंद्र या दोघांवर आधारीत कालगणना (ल्युनिसोलर कॅलेंडर) वापरलं जातं.
 
हिंदूंनी नवग्रहांमध्ये 'सोम' म्हणून चंद्राला स्थान दिलंय, चाँद-तारा हे इस्लामचं प्रतीक बनलं आहे आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र भगवान गौतम बुद्धांच्या जीवनप्रवासातल्या अनेक टप्प्यांचा साक्षीदार आहे.
 
तर याउलट अनेक युरोपियन देशांतील कथांमध्ये चंद्राला अंधार आणि दुष्ट शक्तींशीही जोडलेला आहे. लोककथांमध्ये ड्रॅक्युला, व्हँपायर अशा निशाचर पात्रांचा चंद्राशी काही ना काही संबंध आलेला दिसतो.
 
चंद्राविषयीच्या कथा कहाण्या वाचताना जाणवणारी एक लक्षवेधक गोष्ट म्हणजे काही देशांत चंद्राला पुरुष नाही, तर स्त्रीरुपात दाखवलं जातं.
 
गौतम बुद्धांच्या प्रवासाचा साक्षीदार
बौद्ध धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या साक्षीनं घडल्या आहेत.
 
गौतम बुद्धांच्या आयुष्यातील तीन महत्त्वाचे टप्पे मराठी कालगणनेनुसार वैशाख पौर्णिमेला आले. याच दिवशी राजकुमार सिद्धार्थ म्हणून गौतम बुद्धांचा लुंबिनी इथे जन्म झाला, काही वर्षांनी त्यांना बोधगया इथे ज्ञानप्राप्ती झाली तो दिवसही वैशाख पौर्णिमेचा होता आणि 80 वर्षांच्या वयात वैशाख पौर्णिमेलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालं.
 
आषाढातली पौर्णिमा ही धम्म दिवस किंवा धम्म चक्र दिवस म्हणून साजरी केली जाते, कारण त्या दिवशी गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिल्यांदा उपदेश दिला होता. तर शरद ऋतूची पौर्णिमा हा बौद्ध भिख्खूंचा 'वर्षावास' संपण्याचा काळ मानली जाते.
 
नक्षत्रांचा पती
हिंदू मान्यतेनुसार आकाश 27 भागांत विभागलं आहे, आणि त्या प्रत्येक भागाचं प्रतिनिधित्व एक नक्षत्र करतं. चंद्राला या सत्तावीस नक्षत्रांचा स्वामी मानलं जातं.
 
पुराणांतल्या आख्यायिकेनुसार ही नक्षत्रं म्हणजे दक्ष प्रजापतीच्या कन्या होत्या आणि त्यांचं चंद्राशी लग्न लावून देण्यात आलं होतं. पण चंद्रानं त्यातल्या एकाच पत्नीवर म्हणजे रोहिणीवर सगळं लक्ष केंद्रीत केलं. साहजिकच बाकीच्या 26 जणींनी वडिलांकडे तक्रार केली.
 
कथेनुसार पुढे दक्षाला एवढा राग आला की त्यानं चंद्राला शाप दिला - चंद्राला क्षयरोग झाला, तो हळूहळून नष्ट होऊ लागला. मग चंद्रानं क्षमायाचना केल्यावर दक्षानं त्याला उःशाप दिला, त्यामुळे चंद्र पंधरा दिवस कमी कमी होत जातो आणि अमावस्येला नाहिसा होतो, त्यानंतर पुढचे पंधरा दिवस म्हणजे पौर्णिमेपर्यंत तो वाढत जातो. चंद्राच्या या वेगवेगळ्या रुपांना 'चंद्रकला' म्हणून ओळखलं जातं.
अर्थात ही केवळ आख्यायिका आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तर सूर्याचा प्रकाश त्याच्या पृष्ठभागावरून परावर्तीत होतो. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचं स्थान बदलत जातं, तशा त्याच्या वेगवेगळ्या कला आपल्याला दिसतात.
 
चंद्राला हिंदू मान्यतेनुसार 'सोम' या नावानंही ओळखलं जातं आणि सोमरस या पेयाचाही तो निर्माता मानला जातो.
 
आणखी एक हिंदू आख्यायिकेनुसार चंद्र आणि तारा एकमेकांच्या प्रेमात पडले. इथे तारा ही बृहस्पती अर्थात गुरू ग्रहाची पत्नी मानली जाते आणि चंद्र हा गुरूचा शिष्य. पण त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले आणि बुध ग्रह हा त्यांचं अनौरस अपत्य आहे असं ही कहाणी सांगते. काही पुराणाकथांनुसार बुध स्त्री आणि पुरुष दोन्हीचं रूप घेऊ शकतो.
 
स्त्री रुपातला चंद्र
भारतीय संस्कृतीत बुध ग्रहालाचा नाही, तर चंद्रालाही काहीवेळा स्त्रीत्वाशी जोडल्याचं दिसून येतं. म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीची तुलना कवी चंद्राशी करताना दिसतात. कधी चंद्राचा संबंध प्रेम आणि भावनाप्रधानतेशी, चंचलतेशी जोडला जातो.
 
काही ठिकाणी स्त्रियांच्या मासिक पाळीशी चंद्राचा संबंध आहे असा गैरसमज दिसून येतो. याचं कारण चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 28 दिवस लागतात आणि साधारण तेवढ्याच अंतरानं महिलांना मासिक पाळी येते. अर्थातच यात काही तथ्य नाही.
 
पण अनेक संस्कृतींमध्ये चंद्राला स्त्रीरुपात दर्शवलं जातं. चीनचंच उदाहरण घ्या ना.
चीनच्या ताओ धर्मात यिन आणि यांग या दोन तत्त्वांचा चंद्राशी आणि सूर्याशी संबंध जोडलेला आहे. इथे चंद्र स्त्रीरूपात आणि सूर्य पुरुषरुपात आहे असं मानलं जातं.
 
यिन आणि यांगप्रमाणेच चंद्र आणि सूर्य हे दोघंही एकमेकांच्या विरोधात आणि तरीही एकमेकांना पूरक आहेत अशी धारणा आहे.
 
चीनमध्ये चँग-हो ही अप्सरेसारखी देवताही चंद्राचं प्रतीक मानली जाते. ती चंद्र नाही, तर चंद्रावरची बंदीवासी आहे.
 
चँगनं आपल्या पतीसाठीचं अमृत स्वतःच प्राशन केलं आणि तेव्हापासून ती चंद्राच्या राजवाड्यात पोहोचली. मग तिच्यासाठी तिचा पती शरद ऋतूमध्ये पूर्ण चंद्रासमोर अन्न अर्पण करू लागला, अशी काहीशी तिची कहाणी आहे.
 
चीननं आपल्या चांद्रमोहिमेला याच चँगचं नाव दिलं आहे. भारतानं चांद्रयान हे नाव दिलं ना, अगदी तसंच.
 
चँग आणि चांद्रयान प्रमाणेच आर्टेमिस या नासाच्या मोहिमेचं नावही एका चांद्रदेवतेवरून घेतलं आहे.
आर्टेमिस ही ग्रीकांच्या मान्यतेनुसार चंद्राची देवता आणि अपोलो या सूर्याच्या देवतेची जुळी बहीण मानली जाते. तिचा संबंध शिकार, निसर्ग, जंगल, यांच्याशीही आहे.
 
ग्रीकांनी चंद्रासाठी सेलेन आणि सूर्यासाठी हेलियोस अशी नावंही वापरली आहेत. इथेही सेलेन ही स्त्रीरूपात आहे.
 
रोमन संस्कृतीत चंद्र म्हणजेच लुना ही देवता आहे असं मानलं गेलं. ही लुना स्त्रीरुपात दाखवली जाते, तर सूर्य सॉल हा पुरुषरुपात दाखवला जातो.
 
चंद्राच्या बदलतल्या कलांचा संबंध रोमनांनी चंचलतेशी आणि स्वभावातल्या बदलांशी जोडला. त्यातूनच लुनाटिक्स हा शब्द प्रचलित झाला. विक्षिप्त वागणाऱ्या व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो. रोमन काळात डायना ही देवताही चंद्राची देवता म्हणून ओळखली जायची.
मेक्सिकोतल्या अ‍ॅझटेक संस्कृतीत कोयोलशाकी ही चंद्राची स्त्रीरुपातली देवी मानली जाते. पण जपान आणि इजिप्तच्या संस्कृतीत मात्र भारताप्रमाणे पुरुषरुपातील चंद्र देवता दिसून येते.
 
चीन इजिप्तमध्ये याह हा चंद्राचा देव, खोन्शू हा अमावस्येचा चंद्र आणि थॉट हा पौर्णिमेचा चंद्र आहे अशी मान्यता होती.
 
जपानच्या शिंटोधर्मातला त्सुकियोमी हा देव म्हणजे चंद्राचं प्रतीक. अमातेरासू ही स्त्रीरूपातली सूर्यदेवता त्याची बहीण आहे तर समुद्र आणि वादळांचा देव सुझानो हा या दोघांचा भाऊ आहे. या भावंडांमधल्या भांडणाची गोष्ट प्रसिद्ध आहे.
 
आख्यायिकेनुसार त्सुकियोमीवर चिडूनच अमातेरासूनं त्याचं तोंडही पहणार नाही असं ठरवलं. या भांडणामुळेच हे दोघं एकाच वेळी उगवत नाहीत, एकमेकांचं तोंड पाहात नाहीत, असा समज आहे.
Published By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments