Marathi Biodata Maker

पिठोरी (दर्श) अमावस्या

Webdunia
श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण?' असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.


 
ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.
 
नैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात.
पुढे वाचा कहाणी पिठोरीची......

आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !
 
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेलासुध्दा असंच झालं. तेव्हा मामंजीं माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो ! असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे ? असं म्हणून रडू लागली.
 
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथ तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्‍यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.
 
त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.
 
ती आपल्या गावांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
सर्व पहा

नवीन

Holi 2026 Essay in Marathi होळी निबंध मराठी

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

गजानन महाराजांच्या २१ मौल्यवान शिकवणी: आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी 'लाईफ लेसन्स'

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments