Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शुद्ध, सात्विक, पवित्र श्रावण

Webdunia
हिंदू पंचागाप्रमाणे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात देव निद्रिस्त असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बर्‍यावाईट घटनांचा परिणाम मानवावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे छत्र अखंड रहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप जाप्य, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह, पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यामुळेच या चार महिन्यात तो जास्तीत जास्त सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो.

या चार महिन्यांपैकी दुसरा येणारा श्रावण हा तर अत्यंत पवित्र महिना मानण्यात येतो. गटारी आमावस्येला मनाचा मलिनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा असतो आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार, प्रदोष हे सर्व पर्वकाल ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

सोमवारी काय वहाल?
पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसर्‍याला तितीळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची वृत्ती आहे, त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या पुजारी, गुरव इत्यादींच्या चरितार्थाचेही साधन होते म्हणून यात मानवताही आहे.

उपासाचा शास्त्रीय अर्थ
याच काळात जास्तीत जास्त उपास असल्याचे कारण देवाच्या सा‍निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. पण कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जाठराग्नी प्रदिप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघ‍न किंवा अल्प सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरीनामाकडे त्याचा जप करण्याचे काम करू लागते हे काय कमी आहे?

  WD
श्रावणातील मंगळागौर
जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे सा‍हजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विसावा मिळतो व तिही आपल्या मैत्रिणींसमवेत नटूनथटून देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते.

मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.

मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात फेर धरतात व मनातल्या भावना गीतांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्‍या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी (वय वाढली तरी) ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात ते गौर जागवणं ते नागपंचमीचे वडाच्या पांख्यांवर घेतलेले उंच उंच झोके, रात्री हातला काढलेली मेंदी अन् त्या प्रत्येकाबरोबर लहानपणीच्या, तरुणपणीच्या सुखद आठवणी.


श्रावणातील स ण
WD
नारळी पौर्णिमेचा नारळी भात, नागपंचमीची दिंड, शुक्रवारच्या पुरणाच्या आरतीतले पुरण, पोळ्याची पुरणपोळी कडबोळी गोकुळाष्टमीचा गोपाळकाला हे विशिष्ट पदार्थ त्याची चव कायम आपल्याला आठवतेच. राखीपौर्णिमेला प्रत्येक जण आपल्या भावा बहिणीची आतुरतेने वाट बघतो. प्रत्यक्ष नाही तरी पोस्टाने तरी राखी यावी असे पूर्वी कायम वाटायचे. बहिणींना उद्या आपला दादुटल्या आपल्याला काय देणार याची उत्सुकता तर भावांना आपली राखी कशी असेल याची. आदल्या दिवशीच उधाणलेल्या दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून आपला कोळीबांधव त्याला शांत व्हायला सांगतो. अन् दुसर्‍याच दिवशी असणार्‍या राखी पौर्णिमेच्या विचारानी बहीण नसणारा छोटा भाऊ, कोण मला ओवाळिल ह्या काळजीत चुर होतो.

WD
सर्वांचा आवडता कृष्ण याचा जन्म (कृष्णाष्टमी) याच काळातला. त्याच्या जन्माष्टमीनिमित्त चालणारा उत्सव, त्याच्या रुपात नटेलेली बाळं, अन् जागोजागी बांधल्या जाणार्‍या दहीहंड्या त्या हंड्यांची कपची मिळवण्याची धडपड, काल्याचा प्रसाद हे एक ना अनेक विचार, आठवणी मनात अशा दाटून येतात.

या महिन्याच्या शेवटी येणारा पोळा हा सण तर सर्वात मोठा आहे. आपल्याला पिक देणार्‍या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करतो ते श्रावणातील फूलपत्री उपास अन् सणांनी. पण प्राणीमात्रांची कृतज्ञता म्हणून नागपंचमीखेरीज आपण आपल्या नित्यजीवनातील सहकारी असलेल्या सर्जा-राजाच्या उपकाराची जाण पोळा या सणाच्या दिवशी व्यक्त करतो. त्या दिवशी त्याला सजवतो, गरम पाण्याने न्हाऊ घालतो. झुल गोंडे आरसे लावतो. शिंगात कडबोळी अन् त्याला कडबूचा घास भरवतो. (कर्नाटकात बेंदूर साजरा करतात तेव्हा पुरणपोळीपेक्षा पुरणाच्या कडबूचाच मान असतो त्या दिवशी.) त्याला ओवाळतो त्याची पूजा करतो.

सृष्टीला पडलेली श्रावणभूल
श्रावणातील धात्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुलं, कोवळे अंकूर याच काळात तयार होतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी ही फुले तर या ऋतु भरपूर येतातच. पण ठिकठिकाणी सायली अन् गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात. ऋतुचक्र या पुस्तकात दुर्गाताईंनी याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्या म्हणतात. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच पण उघडे बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरुन बसतात. असा हा कुसुमाग्रजांनी वर्णिलेला 'हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण'. त्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे अगदी तुम्हाला अन् धरतीलाही.

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

Show comments