Dharma Sangrah

Somwarchi Sadhi Kahani सोमवारची साधी कहाणी

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (15:04 IST)
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेंत वेळूचं बेट होतं. परत येऊं लागला, म्हणजे “मी येऊं? मी येऊं?” असा ध्वनि उठे. हा मागं पाही, तों तिथं कोणी नाहीं. त्या भीतीनं वाळूं लागला. तेव्हां गुरुजींनीं विचारलं, “खायला प्यायला वाण नाहीं. मग बाबा, असा रोड कां?” “खायला प्यायला वाण नाहीं हाल नाहीं, अपेष्टा नाहीं. स्नान करून येतेवेळेस मला कोणी ‘मी येऊं? मी येऊं? असं म्हणतं. मागं पाहतों तों कोणी नाहीं. ह्याची मला भिती वाटतें.” गुरुजी म्हणाले, “भिऊं नको, मागं कांहीं पाहूं नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊं दे.”मग शिष्यानं काय केलं.
 
रोजच्याप्रमाणं स्नानास गेला. पूजा करून येऊं लागला. “मी येऊं?” असा ध्वनि झाला. “ये ये” असा जवाब दिला. मागं कांहीं पाहिलं नाहीं. चालत्या पावलीं घरीं आला. गुरुजींनीं पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं.
 
त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणूं लागला, “माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको.” आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामधें पती आला. “अग अग, दार उघड.” पुढचं ताट पलंगाखालीं ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरांत आले. नित्य नेम करूं लागले.
 
पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशींही असंच झालं. असं चारी सोमवारीं झालं. सरता सोमवार आला. रात्रीं नवल झालं. दोघंजणं पलंगावर गेलीं. पलंगाखालीं उजेड दिसला. “हा उजेड कशाचा?” “ताटी भरल्या रत्नांचा.” “हीं रत्नें कुठून आणली?” मनांत भिऊन गेली. “माझ्या माहेरच्यांनीं दिलीं.” ” तुझं माहेर कुठं आहे?” “वेळूच्या बेटीं आहे.” “मला तिथं घेऊन चल.” पतीसह चालली. मनीं शंकराची प्रार्थना केली. “मला अर्धघटकेचं माहेर दे.” तों वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणि म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झालीं.
 
सासूसासर्‍यांचीं आज्ञा घेतली. घरीं परतलीं. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हां उभयतां परत गेलीं. घर नाहीं, दार नाहीं. शिपाई नाहींत, प्यादे नाहींत, दासी नाहींत. बटकी नाहींत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवर्‍यानं विचारलं, “इथलं घर काय झालं?” “जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगतें. चारी सोमवारीं हांक ऐकली. जेवतीं ताटं ढकलून दिलीं. रत्नानीं भरलीं. सोन्याची झालीं. तीं मल देवांनीं दिलीं. आपण विचारूं लागला तेव्हां भिऊन गेलें. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनीं तुमची खात्री केलीं. माझी इच्छा परिपूर्ण झाली.”
 
जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

शनिवारची आरती

श्री शनिदेव आरती Shri Shani Aarti

शनि देवाला तेल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि मंत्रांचे महत्त्व

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments