Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेनिस जगतावर अधिराज्य करणारी सेरेना विल्यम्स आपण निवृत्त होणार आहोत असे सुचवले आहे

Webdunia
बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (12:45 IST)
युएस ओपन नंतर या खेळापासून दूर जाण्याचा मी निर्णय घेत आहे. मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही, पण इतर महत्त्वपूर्ण गोष्टींना वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असे तिने व्होग या नियतकालिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
 
सेरेना विल्यम्सचे वय 40 वर्षं आहे आणि तिने आतापर्यंत 23 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
 
तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे पण ती म्हणते आणखी काही आठवडे व्यावसायिक टेनिस खेळाचा क्षण न् क्षण मी जगणार आहे.
 
सेरेना विल्यम ही जिवंतपणीच एक दंतकथा बनली आहे. तिचा प्रवास जाणून घ्या.
 
टेनिस चॅम्पियन सेरेना विल्यम्स तिची शेवटची ग्रँडस्लॅम मॅच खेळली तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर होती हे फारसं माहिती नव्हतं.
 
आधीची ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून ती नंबर वन पदावर पोहोचली होती. म्हणजे बाळंतपणासाठी तिने रजा घेतली तेव्हा ती अव्वल होती.
 
विशेष म्हणजे ऑलिम्पिया या गोड मुलीला जन्म दिल्यानंतर दहा महिन्यात ती पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम फायनल खेळायला सिद्ध झाली होती.
 
बाळंतपणाची रजा, पुनरागमन आणि पुन्हा विजयाकडे
बाळंतपणाच्या सक्तीच्या रजेनंतर सेरेना फक्त चार स्पर्धांमध्ये खेळली आहे. आताही विम्बल्डन विजेतेपदासाठी तिला लाखो रसिकांची पसंती आहे.
 
विम्बल्डन ट्रॉफीवर आठव्यांदा तिचं नाव कोरलं जावं अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.
 
''आई झाल्यावर विम्बल्डनची फायनल खेळणं हे खूप भन्नाट आहे,'' 'बीबीसी स्पोर्ट'ला दिलेल्या मुलाखतीत सेरेना म्हणाली.
 
''हे सोपं नव्हतं. सगळ्यांनाच माहीत आहे मला बाळंतपणात किती अडचणी आल्या. सिझेरियननंतर पहिल्याच आठवड्यात माझ्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर आणखी किती झाल्या मी मोजणंही सोडून दिलं. मला घराबाहेरच्या पोस्टबॉक्सपर्यंतही चालता येत नव्हतं.''
 
सेरेनाला पल्मनरी एम्बॉलिझमचा त्रास झाला. यात तिच्या फुप्फुसात रक्ताच्या गाठी तयार झाल्या. त्यामुळे येत असलेल्या खोकल्यामुळे पोटाला घातलेले टाके सतत उसवत होते. मग तिच्यावर एका मागोमाग एक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
 
बाळंतपणानंतर एक आठवडा हॉस्पिटलमध्ये आणि पुढचे सहा आठवडे घरात ती झोपूनच होती.
 
कठीण बाळंतपण, कठीण पुनरागमन
पण हार मानेल ती सेरेना कसली? 36व्या वर्षी दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि टेनिसवर तसंच आयुष्यावर असलेलं प्रेम याच्या जोरावर ती पुन्हा उभी राहिली.
 
सप्टेंबरमध्ये तिच्या मुलीचा जन्म झाला आणि डिसेंबरमध्ये ही बाई कोर्टवर परतली. तिच्या कोचचाही सुरुवातीला यावर विश्वास बसत नव्हता.
 
बाळंतपणानंतर 3 महिन्यांत तिने केलेलं पुनरागमन ही एक वेगळी प्रेरणादायी कथा आहे.
 
डिसेंबरनंतर टेनिस कोर्टवर तिनं घालवलेला काळ आणि केलेली प्रगती ही एक यशोगाथा.
 
पुनरागमनानंतरच्या तिच्या प्रवासाला आणखी एक किनार आहे ती विमेन्स टेनिस असोसिएशनच्या अवघड रँकिंग नियमांची.
 
सेरेनामुळे हे नियम सध्या चर्चेत आणि खरं सांगायचं तर वादात आहेत. बाळंतपणानंतर परतलेल्या महिला टेनिसपटूंसाठी ते 'निष्ठूर' आहेत, असं अनेकांचं म्हणणं आहे.
 
जेव्हा एप्रिल 2017मध्ये सेरेनानं बाळंतपणासाठी रजा घेतली तेव्हा ती महिला क्रमवारीत अव्वल होती. पण, ताज्या आकडेवारीनुसार तिचं रँकिंग आहे 181.
 
अधिकृतपणे तिनं पुनरागमन केलं तेव्हा तर ती 451व्या स्थानावर होती.
 
ही घसरण अर्थातच टेनिसपासून दूर राहिल्यामुळे झाली.
 
बाळंतपणाची रजा म्हणजे शून्यातून सुरुवात?
सेरेनाला या घसरणीचा फटका बसला तो पुढच्या स्पर्धांमध्ये. कारण, स्पर्धेत मिळणारं सिडिंग (मानांकन) या रँकिंगवर अवलंबून असतं. सिडिंग कमी असलेल्या खेळाडूला तळाचा ड्रॉ मिळतो. याचा सरळ अर्थ असा की, अगदी सुरुवातीच्या मॅच खूप वरचं रँकिंग असलेल्या खेळाडूंविरुद्ध खेळाव्या लागतात.
 
विमेन्स टेनिस असोसिएशननं रँकिंगचे नवे नियम गेल्यावर्षीपासून लागू केले आहेत. त्यानुसार, दुखापतीमुळे खूप काळ खेळाडूला स्पर्धेपासून दूर राहावं लागलं तर त्याला खास रँकिंग दिलं जातं ज्यामुळे खेळाडूच्या आधीच्या रँकिंगला सुरक्षा कवच मिळतं. या खास रँकिंगच्या आधारावर पुनरागमनाच्या वर्षभरात WTA टूअरवरच्या कुठल्याही आठ स्पर्धा खेळाडूला खेळता येतात. यात दोन ग्रँडस्लॅम स्पर्धाही खेळता येतात.
 
खेळण्याची ही सुविधा मिळते. पण, हे खास रँकिंग खेळाडू सिडिंग मिळवून देत नाही. स्पर्धेत खेळायला मिळालं तरी खेळाडू अनसिडेड असता. मग सुरुवातीलाच तुम्हाला वरच्या खेळाडूंशी दोन हात करावे लागतात. याला कठीण ड्रॉ म्हणतात.
 
आता सेरेनाच्या बाळंतपणानंतर या रँकिंग आणि सिडिंग व्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुखापत आणि बाळंतपणासाठी वेगळे नियम असावेत का? आणि जसं खास रँकिंग असतं तसं खास सिडिंगही असावं का, यावर आता वाद सुरू झाला आहे.
 
नियमांनुसार, खेळाडूचं रँकिंग कॅलेंडर वर्षांत त्याने किती मॅच आणि स्पर्धा जिंकल्या यावर अवलंबून असतं.
 
स्पर्धांसाठीचा ड्रॉ आणि सिडिंग यावर रँकिंगचा थेट प्रभाव पडतो.
 
बाळंतपणानंतर खेळाडूंवर अन्याय होतोय का?
महिला खेळाडूसाठी बाळंतपणानंतर परतणं हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक असतं. नेमकी हीच गोष्ट महिला टेनिस फेडरेशनने नजरेआड केली असा आरोप होतो आहे.
 
सेरेनाही पहिल्या तीन स्पर्धा पहिल्या काही फेऱ्यांमध्येच हरली. विम्बल्डनमध्ये चित्र पालटलं आहे. एकतर विम्बल्डनचं सिडिंग रँकिंगवर पूर्णत: अवलंबून नाही. ग्रासकोर्टवरच्या कामगिरीवर ते अवलंबून असतं. त्यामुळे सेरेनाला इथे 25वं सिडिंग मिळालं. आता फायनलमध्ये धडक देऊन सेरेनानं आपला मुद्दा तडफदारपणे मांडला आहे. स्पर्धेच्या सिडिंग पद्धतीचा पुनर्विचार व्हावा का?
 
यापूर्वी किम क्लाईस्टर्स आणि व्हिक्टोरिया अझारेंका यासारख्या खेळाडूंनी यापूर्वी आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं आहे. पण, त्यावेळी सिडिंगची इतकी चर्चा झाली नाही. आता काळ बदलतो आहे. सिडिंग नियमांचा पुनर्विचार व्हावा ही मागणी जोर धरते आहे.
 
बदल होईल का?
सेरेना विल्यम्सची यशोगाथा प्रेरणादायी आहे यात वादच नाही. जिद्द आणि महत्वाकांक्षा यांना तोड नाही. पुन्हा खेळण्याच्या आणि त्यातही अव्वल राहण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे टेनिस वर्तुळात आणि बाहेरही तिला पाठिंबा मिळतो आहे.
 
सध्याची नंबर वन खेळाडू सिमोन हालेप, माजी नंबर वन मारिया शारापोवा दोघींनी उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. माजी विम्बल्डन चॅम्पियन जॉन मॅकेन्रो याने विम्बल्डन आयोजकांना खास विनंती केली की सेरेनाला पहिल्या 32 खेळाडूंत स्थान द्यावं. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रंप यांनीही सेरेनाची बाजू घेताना महिला टेनिसपटूंना आई होण्याची किंमत मोजावी लागू नये असं म्हटलं आहे.
 
अशा परिस्थितीत सध्याची सिडिंग प्रणाली खरंच बदलेल का? महिला टेनिस संघटने अर्थात WTAवर तसं दडपण नक्कीच आहे. लवकरच पुनर्विचार होईलही. काही खेळाडूंच्या मते जर बदल झाले तर ते नि:पक्ष असावेत. काही ठरावीक खेळाडूंना त्याचा लाभ मिळू नये. तर काहींच्या मते दुखापत आणि बाळंतपणाची रजा यामध्ये फरक केला जावा.
 
पुनर्विचार करायचा झाला तर त्यासाठी खेळाडूंची एकवाक्यता घडवून आणणं हिताचं ठरेल. संघटनेकडे त्यासाठी पुरेसा वेळही आहे. कारण, नवीन टेनिस वर्षं जानेवारीपासून सुरू होईल.
 
सध्या आपली बातमी जिच्यापासून सुरू झाली ती म्हणते त्याप्रमाणे, ''लढत राहा, कितीही संघर्ष करावा लागला तरी हार मानू नका.''

संबंधित माहिती

मनीष सिसोदिया यांना उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला

Covid 19: सिंगापूरमध्ये कहर केल्यावर आता KP1 आणि KP2 प्रकारांच्या संसर्गाचा भारतात शिरकाव

पुणे प्रकरणातील तिन्ही आरोपींना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

पुढील लेख
Show comments