भारतीय संघाने गुरुवारी (16 नोव्हेंबर) फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत विजयाने सुरुवात केली. कुवेत सिटीतील जाबेर अल-अहमद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्यांनी कुवेतचा 1-0 ने पराभव केला. पूर्वार्धात सामना 0-0 असा बरोबरीत होता. यानंतर टीम इंडियाने उत्तरार्धात चमकदार कामगिरी करत कुवेतवर सतत दबाव कायम ठेवला. मनवीर सिंगने 75व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्यात एकही गोल झाला नाही.
या सामन्यातील विजयासह भारताने तीन गुण मिळवले आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कतारनेही अफगाणिस्तानला हरवून तीन गुण मिळवले आहेत. चांगल्या गोल फरकाच्या आधारे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. गुरुवारी झालेल्या अन्य गटात कतारने अफगाणिस्तानचा 8-1 असा पराभव केला.
भारत आणि कुवेत यांच्यातील हा सहावा सामना होता. भारताने दुसऱ्यांदा पराभव केला आहे. कुवेतनेही दोनदा विजय मिळवला असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारत 21 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर कतार विरुद्ध विश्वचषक 2026 पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत आपला दुसरा सामना खेळेल. टीम इंडियासाठी हा सामना खूपच कठीण असेल.
या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरू येथील श्री कांतेराव स्टेडियमवर झालेल्या SAFF चॅम्पियनशिपमध्ये भारताचा कुवेतशी दोनदा सामना झाला होता. दोन्ही सामने 1-1 असे बरोबरीत होते. भारताने अंतिम फेरीत कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.