Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुशील कुमार: दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा खेळाडू वादात कसा अडकत गेला?

Webdunia
रविवार, 23 मे 2021 (10:28 IST)
ऋजुता लुकतुके
दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवलेला पैलवान सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पैलवान सागर राणाच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशील कुमार फरार होता.
 
काल रात्री दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांचा हा घटनाक्रम एखाद्या बातमी पेक्षा वेबसीरिज किंवा चित्रपटाचा थ्रिलर सिक्वेन्स म्हणून जास्त शोभेल. पण, यात वाईट हे आहे की, घटनेतला नायक किंवा खलनायक दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार हा आहे.
 
आणि त्याच्यावर खुनासारखा गंभीर आरोप आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअम जिथे सुशील कुमारचे सासरे सतपाल सिंग आपलं कुस्तीचं ट्रेनिंग सेंटर चालवतात, मुलांमध्ये आपला दरारा किंवा दहशत ठेवण्याचाही आरोप सुशीलवर होतोय.
 
काय आहे खुनाचं ताजं प्रकरण?
एक तर भारतात ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खूप कमी तयार झालेत. त्यात एका ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि पुढच्या ऑलिम्पिकमध्ये ते रौप्यात परिवर्तित करण्याची कामगिरी सुशील कुमारने केली. त्यामुळे फक्त कुस्तीच नाही तर भारतीय क्रीडा जगतात त्याच्याविषयी आदर दुणावला.
 
पण, सुशील कुमारच्या या यशाबरोबरच दिल्लीच्या कुस्ती वर्तुळात सत्ताही काही प्रमाणात त्याच्या हातात आली. वरिष्ठ क्रीडा अधिकारी म्हणून सुशील कुमार कार्यरत आहे. आणि ते कार्यालयही छत्रसालमध्येच आहे. या सत्तेचाच गैरवापर सुशील कुमारने केला असा आरोप आता होत आहे.
 
ज्या सागर राणाचा खून झाला तो पूर्वनियोजित होता असं म्हणण्याला वाव आहे अशी नोंद काल दिल्ली न्यायालयाने केली आहे. म्हणूनच सुशीलचा जामीन नाकारला गेला. बरं, खून हा मारहाणीतून झाला आहे. म्हणजे इतकी अमानुष मारहाण या तिघांना झाली.
छत्रसाल स्टेडिअमबाहेर मिळालेल्या काही सीसीटीव्ही आणि इतर फुटेजमध्ये सुशील कुमारच्या हातात हॉकी स्टिक सदृश एक काठी दिसत आहे. आणि तिने तो अधून मधून सागर राणाला मारताना दिसत आहे, असंही पोलिसांनी म्हटलंय.
 
शिवाय सुशील फरार झाला असला तरी त्याचा सहकारी प्रिन्स दलाल हा पोलिसांच्या अटकेत आहे. आणि त्याने जबानीत म्हटलंय की, "सुशीलला सागर आणि त्याच्या साथीदारांना धडा शिकवायचा होता. सुशीलचा अनादर केल्याबद्दल आणि त्याच्याबद्दल स्टेडिअममध्ये वाईट साईट बोलल्याबद्दल त्यांना अद्दल घडवायची होती."
 
थोडक्यात, वैयक्तिक वैमनस्यातून कायदा हातात घेण्यापर्यंत आणि युवा सहकाऱ्याला जीवानिशी मारण्यापर्यंत सुशील कुमारची मजल गेली. म्हणून हे प्रकरण गंभीर बनलंय.
 
पण, खूपच कमी बोलणारा, आपले वस्ताद सतपाल सिंग यांचा एकही शब्द खाली न पडू देणारा शागीर्द सुशील कुमार मैदानाबाहेर मारहाणीत का उतरला? वेगवेगळ्या वादात कसा अडकत गेला?
 
सुशील कुमार आणि कुस्तीशी संबंधित वाद
आधी म्हटल्याप्रमाणे कुस्तीतलं यश आणि यशाबरोबर मिळालेली क्रीडा अधिकाऱ्याची खुर्ची याची नशा सुशील कुमारला चढली का?
 
कारण, लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळवल्यानंतर सुशीलच्या नावाला वलय प्राप्त झालं खरं. पण, त्यामुळे तो राष्ट्रीय स्पर्धा, परदेशात खेळाडूंसाठी आयोजित केलेली प्रशिक्षण शिबीरं यासाठी स्वत:चं नाव गृहित धरत होता की काय अशी शंका येते अशी प्रकरणं पुढच्या काही वर्षांत घडली आहेत.
 
शिबिरं आणि स्पर्धांमध्ये आपली वर्णी लागावी म्हणून सुशील दडपशाही करत होता, असाही आरोप होतोय. महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक निवडीवरून झालेला वाद तुम्हाला आठवतच असेल.
 
नरसिंग यादव वि. सुशील कुमार
खरंतर दोन कुस्तीपटूंची लढाई मॅटवर नाहीतर कुस्तीच्या आखाड्यातच चांगली रंगते. पण, सुशीलने आखाडा सोडून नको तो मार्ग स्वीकारला.
 
नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकला जाता येऊ नये म्हणून सुशील कुमारच्या माणसांनी नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करून उत्तेजक चाचणीत त्याला फेल करवलं असा आरोप सुशील कुमारवर झाला. पाच वर्षांपूर्वी त्यावरून भरपूर वादळ झालं होतं.
2016च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा सुरू होत्या. आधीच्या 70 किलो वजनी गटातून सुशील आता 74 किलो गटात खेळायला लागला होता. या गटात त्याची स्पर्धा होती राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आशादायी वाटणाऱ्या महाराष्ट्राच्या नरसिंग यादवशी.
 
स्वत: सुशील काही वैयक्तिक कारणं आणि दुखापतींमुळे 2014पासून कुस्तीच्या आखाड्यापासून दूर होता. फारशा स्पर्धा तो खेळला नाही. पण, नरसिंग यादवने राष्ट्रीय विजेतेपदाबरोबरच 2015च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावून ऑलिम्पिक कोटा पटकावला.
 
पण, खेळाडूने जिंकलेला कोटा हा त्या खेळाच्या राष्ट्रीय संघटनेचा मानला जातो. म्हणजे भारताने एक जागा पटकावली असा त्याचा अर्थ धरला जातो, या जागी कुणाला खेळवायचं हे राष्ट्रीय संघटना ठरवू शकते, असा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा नियम आहे.
 
या नियमावर बोट ठेवून सुशील कुमारने रिओ ऑलिम्पिक कोट्यावर आपला हक्क सांगितला. आणि नरसिंग यादवबरोबर ऑलिम्पिक ट्रायल आयोजित करण्याचं आवाहन कुस्ती संघटनेला केलं.
 
सुशील कुमार ट्रायलच्या मागणीसाठी कोर्टातही गेला.
 
कोर्टात वाद-प्रतिवाद झाले तेव्हा कुस्ती संघटनेनं आपली बाजू मांडताना, सुशील कुमार राष्ट्रीय शिबिराला हजर राहिला नाही आणि स्वतंत्रपणे आपला आपला सराव करत राहिला. त्यामुळे सुशील किती फिट आहे आणि त्याची ऑलिम्पिक दृष्ट्या किती तयारी आहे याची चाचपणी राष्ट्रीय कोच जगमिंदर सिंग यांना करता आली नाही, अशी बाजू मांडली होती.
 
सुशील कुस्तीसाठी नाही तर अन्य काही आर्थिक लाभांसाठी सुशील ट्रायल मागत असल्याचं संघटनेनं तेव्हा कोर्टात म्हटलं होतं.
 
ही केस सुशील कोर्टात हरला. ट्रायलची मागणी मान्य झाली नाही. त्यापूर्वीच सुशीलने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने प्रतिस्पर्धी नरसिंग यादवच्या जेवणात अंमली पदार्थांची भेसळ केल्याचा आरोप तेव्हा झाला होता. कारण, नरसिंग यादव काही दिवसांतच उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. आणि त्याच्या ऑलिम्पिक वारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
 
नरसिंगच्या जेवणात भेसळ झाल्याचा आरोप तेव्हा मीडियातही झाला आणि वर सांगितलेल्या कोर्ट प्रकरणातही कुस्ती संघटनेनं या प्रकरणाचा उल्लेख करून सुशीलने अन्नात भेसळ घडवून आणल्याचा आरोप त्याच्यावर केला होता.
अखेर, रिओ ऑलिम्पिकमध्ये ना नरसिंग यादव जाऊ शकला, ना सुशील कुमार. पण, बेकायदेशीर मार्गाने नरसिंगचा ऑलिम्पिक मार्ग बंद केल्याचा आरोप मात्र सुशील कुमारवर झाला. आणि नरसिंग यादववर चार वर्षांची आंतरराष्ट्रीय बंदी येऊन त्याची कारकीर्दही घसरली.
 
ट्रायलनंतर प्रतिस्पर्धी खेळाडूशी हाणामारी
2018च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी खेळाडूंच्या ट्रायल्स सुरू होत्या. आणि सुशील कुमारची लढत त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रवीण राणाशी होती. सेमी फायनलची ही लढत सुशील जिंकला खरा. पण, त्या दरम्यान त्याचा प्रवीणशी वाद झाला.
 
आणि दोघांमध्ये झालेली हमरातुमरी क्षणार्धात त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचली. मॅट बाहेर समर्थक एकमेकांना भिडले. आणि दिल्ली पोलिसांना हस्तक्षेप करून एफआयआर नोंदवावा लागला.
मॅटबाहेर बळाचा वापर केल्याचं सुशील कुमार बाबतीतलं हे पहिलं प्रकरण होतं.
 
पण, तेव्हा प्रतिस्पर्धी प्रवीण राणाचा आरोप असा होता की, सुशीलने त्याला आपल्याविरोधात लढण्याची हिंमत दाखवल्याबद्दल दमदाटी आणि मारहाण केली.
 
म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर दमदाटी, मारहाण आणि दडपशाही केल्याचा आरोप सुशीलवर 2018 पासून होत आला आहे.
 
सुशीलने तेव्हा आपली बाजू मांडताना, लढती दरम्यान प्रवीणने आपल्याला चुकीच्या पद्धतीने मारल्याचा दावा केला होता.
 
राष्ट्रीय स्पर्धेत सुशीलचा वादग्रस्त कमबॅक
एकूणच राष्ट्रीय खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय शिबीर असो किंवा खेळाडूंची निवड यावर आपल्या गटाचं नियंत्रण सुशील कुमार ठेवत असल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे.
 
गेल्यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेतला त्याचा कमबॅक असाच गाजला होता.
 
2014 आणि मागोमाग 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने गोल्ड जिंकलं. पण, त्यानंतर दोन वर्षं तो राष्ट्रीय पटलावरून गायब होता.
2020च्या राष्ट्रीय स्पर्धेत तो अवतरला. त्याने स्पर्धाही जिंकली. पण, पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्यानंतर पुढच्या तीन फेऱ्यांमध्ये क्वार्टर फायनलपासून त्याला सरळ वॉकओव्हर मिळाला. म्हणजे पुढच्या तीनही मल्लांनी स्पर्धेतून माघार घेतली.
 
हे सुशील कुमारने घडवून आणले का, असा आरोप त्याच्यावर झाला.
 
आपली पूर्वपुण्याई आणि कुस्तीतील राजकारणावरचा वचक यामुळे स्पर्धांची निवड स्वत: करायची, आव्हानात्मक मोठ्या स्पर्धांमधून अचानक माघार घ्यायची (2014 नंतर तो एशियन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुढील हंगामाच्या तयारीचं कारण देऊन खेळला नाहीए. तर 2019च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 20वा आला) आणि तरीही ऑलिम्पिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर आपला हक्क सांगायचा ही सुशील कुमारची वागणूक न्याय्य आहे का, हाच प्रश्न आहे.
 
भारताच्या सर्वात यशस्वी ऑलिम्पिक खेळाडूची कारकीर्द निवृत्तीच्या काळात मात्र डागाळलेली आणि वादग्रस्त ठरते आहे, याचं दु:ख वाटतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: शनिवार 30 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

फडणवीस नाही तर हा भाजप नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार 'मोठा निर्णय'? एकनाथ शिंदे यांच्या अचानक सातारा दौऱ्याचे कारण आले समोर

Cyclone Fengal चा परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार, या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस नाही तर कोण? जाणून घ्या विलंबाचे खरे कारण

पुढील लेख
Show comments