Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय कुस्तीमध्ये जी 'दंगल' सुरू आहे, त्यावर महिला कुस्तीपटू गप्प का?

भारतीय कुस्तीमध्ये जी 'दंगल' सुरू आहे, त्यावर महिला कुस्तीपटू गप्प का?
, बुधवार, 27 डिसेंबर 2023 (17:02 IST)
भारतीय कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह आणि त्यांच्या कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्तीतून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाचं निलंबन केलं.
 
साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर पैलवान बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला, त्यापाठोपाठ पैलवान विनेश फोगाटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे.
 
कुस्ती जगतात सुरू असलेल्या या घडामोडींवर प्रत्येकजण बोलत आहे. काही बाजूने तर काही विरोधात आहेत. पण याचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या उदयोन्मुख महिला कुस्तीपटू या प्रश्नावर आपलं मौन सोडायला तयार नाहीत.
 
बीबीसीने शनिवारी (23 डिसेंबर) सकाळी 6 वाजता रोहतकमधील छोटू राम कुस्ती अकादमीला भेट दिली. तिथेच रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने आपल्या कुस्तीच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
 
इथे सुमारे 50 तरुणी सराव करताना दिसल्या. साक्षी मलिकने ऑलिम्पिक पदक जिंकण्यापूर्वी इथल्या सुविधा फार कमी होत्या. पण आज इथे फॉल्स सिलिंग, वातानुकूलित खोल्या, मॅट्स, वॉटर कुलर आहेत.
 
ही अकादमी आता अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. इथे साक्षी मलिकचे मोठे पोस्टर्स आहेत. कुस्ती हॉललाही साक्षी मलिकचं नाव देण्यात आलंय.
 
बृजभूषण यांच्या नावावर मौन
मनदीप सैनी मुलींना प्रशिक्षण देताना दिसतात, तर त्यांचे पालक थंडीपासून बचाव करण्यासाठी एका कोपऱ्यात उभे आहेत.
 
हरियाणातील आखाड्यांमध्ये मुलींच्या प्रशिक्षणादरम्यान मुलींचे पालक कुस्तीच्या मॅटच्या बाहेर बसलेले दिसतात. कारण मुलीने जरी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पदक आणलं तरी तिच्या संरक्षणासाठी घरचा पुरुष असणं महत्त्वाचं आहे असं त्यांचं मत आहे.
 
प्रशिक्षणादरम्यान आम्ही मुलींशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा प्रशिक्षक मनदीप आम्हाला म्हणाले की, कोणतीही मुलगी तुमच्याशी बोलणार नाही, तुमची इच्छा असल्यास तुम्ही प्रयत्न करू शकता.
 
आम्ही कारण विचारलं असता ते म्हणाले की, बजरंग, विनेश आणि साक्षी मलिक हे प्रसिद्ध कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत असताना काही मुलींनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना समज देण्यात आली.
 
"आपलं नाव पुढे यावं आणि प्रकरण पुढे जावं, असं कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला आपल्या करिअरची चिंता आहे," असं ते म्हणाले.
 
खूप प्रयत्नांनंतर एक मुलगी बोलायला तयार झाली. तिला फक्त साक्षीच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारले जावेत, कुस्ती संघटनेचे नवे अध्यक्ष किंवा माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्या विषयावर ती काही बोलणार नाही असं तिने स्पष्ट सांगितलं.
 
ही तरुण खेळाडू संकोचून सांगते की, "आम्हाला आता स्पर्धेत उतरायचं आहे आणि हीच माणसं आम्हाला भविष्यातही भेटणार आहेत."
 
दुसरी एक खेळाडू पुढे आली. तिने कुस्ती हॉलच्या भिंतींवर टांगलेल्या साक्षी मलिकच्या पोस्टरकडे बोट दाखवत सांगितलं की, "ती सर्वांची आदर्श आहे पण सर्व मुली असहाय्य आहेत. आम्हाला आमच्या पालकांनी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची सूचना केली आहे."
 
बीबीसीची टीम जुन्या बसस्थानकामागील महादेव आखाडा नावाच्या महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रात पोहोचली तेव्हा समोरचं मोठं गेट बंद होतं.
 
याठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने स्वत:ची ओळख प्रशिक्षक अशी करून दिली.
 
ते म्हणाले, "कोणतीही मुलगी बोलणार नाही. प्रशिक्षणाची वेळ संपली आहे. सर्वजण अकादमीतील त्यांच्या खोल्यांमध्ये आहेत. पण कोणीही माध्यमांशी बोलणार नाही."
 
आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले, "इथे साक्षी, विनेश आणि बजरंग बोलतायत तरी काही होत नाहीये. मग सामान्य कुटुंबातील या उदयोन्मुख खेळाडूंच्या बोलण्याने काही साध्य होईल का? असा सवाल त्यांनी केला."
 
आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, त्यांनी या तीनही मोठ्या नावाजलेल्या खेळाडूंना पाठिंबा दिला होता, पण त्यांना कोणीही साथ दिली नाही.
 
प्रशिक्षक म्हणतात, "बृजभूषणच्या नावाला सगळे घाबरतात. कोणीही पालक बोलणार नाही आणि या मुलीही बोलणार नाहीत.
 
"बोलणाऱ्या महिला खेळाडूंना स्पर्धेत लक्ष्य केलं जातं आणि त्यांना स्पर्धेत खेळू न देण्याचा किंवा त्यांना पराभूत म्हणून घोषित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो."
 
ते निराश होऊन म्हणाले, "या व्यवस्थेशी लढून लढून किती लढणार? सर्व मुली गरीब कुटुंबातून येतात. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत साक्षी, बजरंग आणि विनेश यांना आश्वासन दिलं होतं की, बृजभूषण शरण सिंग किंवा त्यांच्या जवळच्या कोणालाही कुस्ती संघटनेची जबाबदारी देणार नाही. यामुळे महिला कुस्तीला फायदा होईल असं वाटलं होतं."
 
करिअरची चिंता
या दोन आखाड्यांची जशी अवस्था होती, तसंच वातावरण सत्यवान कादयान आखाड्यात पाहायला मिळालं.
 
सत्यवान आखाडा साक्षी मलिकचे सासरे सत्यवान चालवतात. साक्षी मलिकने पदक जिंकल्यानंतर अनेक मुली इथे कुस्ती शिकण्यासाठी येऊ लागल्या
बीबीसीने ज्या मुलींशी बोलण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकीने आपला नकारच दर्शविला.
 
एक मुलगी म्हणाली, "साक्षी मलिकने निवृत्ती न घेता अजून खेळायला हवं होतं. मी अजून काही बोलले तर गदारोळ होईल."
 
पहिली मुलगी तिचं वाक्य पूर्ण करणार इतक्यात दुसरी मुलगी म्हणाली, "सोडा. आम्हाला बोलवायला लावू नका. चुकून तोंडून काही निघालं तर घरचे आम्हालाच ओरडतील."
 
आपल्या एका मुलीसोबत आखाड्यात आलेले संदीप कुमार म्हणाले की, इथे प्रत्येकाचं करिअर धोक्यात आहे.
 
ते म्हणाले, "इथे ती बोलेल, तिकडे बृजभूषणचे लोक ऐकतील आणि नंतर त्याचा हिशेब मागतील. सगळे शांत राहतील तेच योग्य आहे."
 
सत्यवान कादयान, साक्षी मलिकचे सासरे आहेत आणि स्वतः माजी राष्ट्रीय कुस्तीपटू आहेत. आपली व्यथा मांडताना ते म्हणतात, "स्वतः सरकार बृजभूषण विरोधात काहीही करू शकलेलं नाही, तिथे या मुलींचा काय दोष?"
 
ते पुढे म्हणाले, "प्रत्येकजण बोलायला घाबरतो. आई-वडील मोठ्या कष्टाने आपल्या मुलींना आखाड्यात पाठवतात, त्यांचा खर्च उचलतात. आणि अशात सगळं संपावं असं कोणाच्याही आई वडिलांना वाटत नाही. सरकारने महिलांचा वेगळा महासंघ स्थापन करून त्यात महिलांना स्वतः सहभागी होऊ द्यावं. जेणेकरून त्यांच्यात बसून त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडवता येतील."
 
अर्धवट घोषणा
साक्षी मलिकचं गाव मोखरा हे जाटबहुल गाव आहे. तेथील लोक हरियाणा सरकारवर नाराज आहेत कारण जेव्हा साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं तेव्हा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गावात कुस्तीला समर्पित मैदान बांधण्याची घोषणा केली होती. आज सहा वर्ष झाले तरी ती घोषणा अपूर्ण आहे.
 
स्थानिक व्यक्ती वेदपाल मलिक यांनी आपली ओळख साक्षी मलिकचे काका अशी करून दिली. ते म्हणाले की, त्यांच्या गावात कुस्तीची आवड आहे. मैदान न बनल्यामुळे खेळाडू अडचणीत आहेत.
 
वेदपाल म्हणतात, "सरकार म्हणतं की त्यांच्या वतीने पाच कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. पण केवळ दहा टक्केच काम पूर्ण झालं आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून गावकरी स्वतःचा पैसा खर्च करत आहेत."
 
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. बृजभूषण शरण सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवली असून, त्याचा तपास सुरू आहे
 
दरम्यान, कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंह विजयी झाल्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी आपलं वर्चस्व अबाधित असून ते कायम राहील असं सांगितलं होतं.
 
मात्र, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघटनेवर निलंबनाची कारवाई केल्यावर बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, आता आपला कुस्तीशी काहीही संबंध नाही.
 
साक्षी मलिकने अंडर-15 आणि अंडर-18 च्या गोंडा येथील नंदिनी नगरमध्ये होणाऱ्या चाचण्यांच्या घोषणेलाही विरोध केला होता. सध्या या चाचण्याही रद्द करण्यात आल्या आहेत. गोंडा हा भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा मतदारसंघ आहे.
 
भारतीय कुस्तीत डाव-पेचाचा खेळ अजूनही सुरूच आहे. या सगळ्यात पुढे जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून सराव करणाऱ्या मुली मात्र गप्प आहेत.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उलटं चालण्याचा शरीर आणि मेंदूला काय फायदा होतो? वाचा