गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण यालाही गाता गळा आहे. वयाच्या विशीतच त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. झी टिव्हीवरील संगीतविषयक एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तो करीत आहे. अतिशय आत्मविश्वासाने सूत्रसंचालन करणार्या आदित्यला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. आदित्य नारायणची ही खास मुलाखत.
लहानपणापासूनच तुझा संगीताकडे कल होता का? अर्थातच, मी माझे बालपण संगीतमय वातावरणात गेले. त्यामुळे संगीत हेच माझे पहिले प्रेम होते. माझ्या मित्रांपैकी कोणाला ड्रॉइंग तर कोणाला खेळ आवडायचे, मला मात्र संगीत आवडायचे. मी आजही शास्त्रीय संगीत शिकत आहे. रोज रियाजही करतो. खरे तर मी स्वत:ला एकाच क्षेत्रात मर्यादित ठेवू इच्छित नाही. मला गाणे लिहायला, संगीत द्यायला व गाणे गायलाही आवडेल. मी अभिनय, दिग्दर्शन व प्रेक्षकांचे मनोरंजन करणार्या सर्व गोष्टी आवडीने करेन. ज्या क्षेत्रात जाईल तिथे सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल. कुटूंबासोबत बसून पाहिले जाईल असेच काम मी करेल. गुणवत्तेला नेहमीच प्रथम दर्जा देईल.
सूत्रसंचालन करण्यास काही तयारी केली होती का? मी अमिताभ बच्चन, शेखर सुमन, अन्नू कपूर यांनी केलेल्या सूत्रसंचालनाचे बारकावे लक्षात घेतले. त्याची मला फार मदत झाली.
गाणे गाणे व सूत्रसंचालन करणे यात काय सोपे वाटले? जगात कुठलीही गोष्ट करणे सोपी नाही. कोणत्याही क्षेत्रात मेहनत करावीच लागते.
Praveen Barnale
WD
एसएमएसने संगीतातील विजेता कलावंत निवडणे न्याय्य आहे का? प्रेक्षकांना जो आवडतो ते त्यालाच निवडतात. परीक्षक दहा उत्कृष्ट कलाकार निवडून देतात. त्यातून एकाला निवडणे प्रेक्षकांचे काम आहे. विजेता कलाकार प्रतिभावंत असेलच असे नाही. असा कलाकार काही वेळेस पहिल्याच फेरीत बाद होऊ शकतो. शेवटी प्रेक्षकांना जे आवडते तेच विकले जाते. सगळे प्रेक्षकांच्या मर्जीवरच अवलंबून असते. शेवटी प्रेक्षकच तर आमचे मायबाप असतात.
वडिलांचे तुझ्या जीवनातील स्थान काय? माझे वडिल माझ्यासाठी सर्वस्व आहेत. ते एक व्यक्ती म्हणून चांगले असून माझे गुरू आहेत. माझे संस्कार त्यांचीच देन आहे. त्यांच्याशिवाय मी शून्य आहे.
त्यांनी गायलेल्या गाण्यांपैकी तुझे आवडते गाणे कोणते? हे सांगणे कठीण आहे. 'लगान' व 'वीर जारा' या चित्रपटातील त्यांनी गायलेले सर्व गाणी आवडतात.
चित्रपटात अभिनयाचा विचार आहे का? बरेच प्रस्ताव आहेत. अभिनयाची मला आवडही आहे. दोन-तीन निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच मी अभिनय करतानाही दिसेल.
तुझा पहिला अल्बम केव्हा येईल? 6 ऑगस्ट 2008 ला मी 21 वर्षांचा होतोय. त्याच दिवशी माझा अल्बम यावा ही इच्छा आहे.
फारच कमी वेळेत तू लोकप्रिय झालास. आता हे सेलिब्रेटीपण कसे सांभाळतोस? प्रेक्षकांना मी आवडतो, हे बघताना मला छान वाटते. पण मी याला जास्त महत्त्व देत नाही. अजून मला खुप दूरचा पल्ला गाठायचा आहे. लोकप्रियतेची हवा डोक्यात न घालता मी माझे पाय जमिनीवरच राहतील हा प्रयत्न करतो.