Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥ ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥ हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहते होते आनंदे ॥३॥ संपत्ती आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती । सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥ तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले । सद़्गुरुसेवेचे दिवस आले । मती पालटली तयांची ॥५॥ लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार । परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥ इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे । दुष्कर्माने दुःख भोगावे । सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥ बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत । सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्य वाटेना ॥८॥ जरी संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती । योग्य सद़्गुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥ हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान । तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥ पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती । पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥ तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार । मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥ सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगून सर्वत्रांसी । निघाले सद़्गुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥ मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत । जेथे चिदंबर दिक्षीत । महापुरुष जन्मले ॥१४॥ ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार । तयांचा महिमा अपार । वर्णू केवि अल्प मती ॥१५॥ स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दिक्षीतांची कथा । आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥ महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून । परी मार्गी लागल्या पुण्यस्थान । स्नानदान करिताती ॥१७॥ महायात्रा स्वामीचरित्र । ग्रेथ क्रमिता मी किंकर । मार्गी लागले अति पवित्र । चिदंबराचे पुण्यस्थान ॥१८॥ तयांचे घेउनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥ मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत । धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥ जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर । अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥ परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती । मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥ द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचे पूजन । सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥ तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन । मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥ ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी । वार्ता सांगता कांतेसी । तीही चित्ती तोषली ॥२५॥ तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन । जो साक्षात उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥ अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्र घडी मोडी । तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥ नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न । मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥ चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून । शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥ प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला । पाहोनी जनी-जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥ पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण । निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥ एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी । चिदंबर तया अवसरी । पुजेलागी आणिले ॥३२॥ मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान । यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥ प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता । चालू लागला हे पाहता । विस्मित झाले यजमान ॥३४॥ बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती । हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥ ऐशी लीला अपार । दाखविती चिदंबर । प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥ असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी । सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥ तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी । तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥ जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त । ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥ तेव्हा पुणे शहरामाजी । पेशवे होते रावबाजी । एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥ अन्यायाने राज्य करीत । दुसऱ्यांचे द्रव्य हरीत । यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥ तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन । म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥ रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत । म्हणती जे सांगतील दिक्षीत । ते अमान्य करवेना ॥४३॥ मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला । परी आपण आम्हांला । त्वरीत निरोप देईजे ॥४४॥ ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तये वेळी काय बोलती । आता पालटली तुझी मती । त्वरीत मागसी निरोप ॥४५॥ कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राज्यलक्ष्मी सर्व । वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥ सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले । ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मभरी ॥४७॥ एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी । तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥ यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी । तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥ लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी । ते दीक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥ महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त । मुरगोडी बाळाप्पा येत । पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥ तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ । भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥ अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता-वक्ता । करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥ पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान । तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥ भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली । सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥ मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती । शंकराची प्रेमळ प्रीती । दास विष्णुवरी असो ते ॥५६॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahashivratri 2025 Date: महाशिवरात्री कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

श्रीदत्तगुरू भक्तांची पंढरी श्रीक्षेत्र गाणगापूर

श्री दत्ताची आरती

वारकरी सम्प्रदायचे सत्पुरुष विष्णुबुवा जोग यांचे जीवन परिचय

नृसिंह सरस्वती माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments