Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरावा

Webdunia
॥ श्री गणेशाय नमः ॥ मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर । तेथे येऊनी स्वामीसुत । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥ षड्विकार जिंकिले । संसार त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥ स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संस्मृती । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥ स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहूनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥ संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हासताती तयाते ॥५॥ परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥ स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥ मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥ पुत्रवात्सल्यकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥ गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकियले धरणी । बहुत आक्रोश मांडिला ॥१०॥ निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरून । धरिले सत्वर प्रेमाने ॥११॥ तुझ्या उदरी जन्मास आलो । सद़्गुरुपायी विनटलो । जन्ममरणाते चुकलो । मुक्त झालो सहजची ॥१२॥ धन्य धन्य तू गे जननी । मजलागी प्रसवोनी । मान्य जालीस त्रिभुवनी । काय धन्यता वर्णावी ॥१३॥ अशा प्रकारे स्वामीसुत । मातेचे समाधान करीत । मधुर शब्दे समजावीत । परमार्थ गोष्टी सांगोनी ॥१४॥ परी त्याच्या या गोष्टी । तियेसी गोड न लागती । म्हणे याची भ्रष्ट मती । खचित असे जाहली ॥१५॥ यासी पिशाच्चबाधा झाली । किंवा करणी केली । याची सोय पाहिजे पाहिली । पंचाक्षरी आणोनी ॥१६॥ त्या समयी प्रख्यात थोर । यशवंतराव भोसेकर । जयांसी देव मामलेदार । सर्व लोक बोलती ॥१७॥ तयांची घेवोन भेटी । विचारावी काही युक्ती । ते जरी कृपा करिती । तरी होय आरोग्य ॥१८॥ ऐसा विचार करोनी पोटी । दर्शना आल्या उठाउठी । सांगितल्या सुताच्या गोष्टी । मुळापासोन सर्वहि ॥१९॥ होवोनिया दीनवदन । करिती विनंती कर जोडोन । म्हणती सर्वज्ञ आपण । उपाय यासी सांगावा ॥२०॥ ऐकोनिया देव मामलेदार । हांसोनी देती उत्तर । त्यासी पिशाच्च लागले थोर । माझेनी दूर नोहेची ॥२१॥ ऐसे उत्तर ऐकोनि । दुःखित झाली अंतःकरणी । मग ते स्वामीसुताची जननी । अक्कलकोटी येतसे ॥२२॥ म्हणे ज्याने वेड लाविले । त्याचीच धरावी पाऊले । येणे उपाये आपुले । कार्य सत्य होईल ॥२३॥ असो इकडे स्वामीसुत । मुंबईमाजी वास्तव्य करीत । हिंदू पारसी स्वामीभक्त । त्यांच्या उपदेशे जहाले ॥२४॥ मठ होता कामाठीपुऱ्यात । तेथे जागा नव्हती प्रशस्त । मग दिली कांदेवाडीत । जागा एक भक्तिणीने ॥२५॥ निःस्सीम जे स्वामीभक्त । आनंदे भजनी नाचत । कुटील जन त्याते हासत । ढोंग अवघे म्हणती हे ॥२६॥ परी निंदा आणि स्तुती । दोन्ही समान जे मानिती । श्रीचरणांवीण आसक्ति । अन्य विषयावरी नसे ॥२७॥ जन निंदा करिताती । अनेक प्रकारे दूषण देती । परी शांत चित्ते त्यांप्रती । उपदेशिती स्वामीसुत ॥२८॥ जे अहंकारे बुडाले । सत्य पथाचरण चुकले । नित्य कार्याते विसरले । मोहे पडले भवजाली ॥२९॥ ऐसे जे का मूढ जन । ते भक्ता देती दूषण । परी तेणे अंतःकरण । दुःखित नोहे तयांचे ॥३०॥ तारा नामे त्यांची कांता । तीही त्रास देती स्वामीसुता । परी तयांच्या चित्ता । दुःख खेद नसेची ॥३१॥ प्रथम मुंबई शहरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस । स्वामी जयंती केलीसे ॥३२॥ कोणे एक समयासी । नगरकर नाना रेखी । सहज आले मुंबईसी । त्यांनी ऐकिले वर्तमान ॥३३॥ या नगरात सांप्रत । स्वामीसुत स्वामीभक्त । गोसावी होऊनी राहात । महाज्ञानी असती ते ॥३४॥ एकवार पहावे तयांसी । इच्छा झाली नानांसी । मग कोणे एके समयासी । मठामाजी पातले ॥३५॥ पाहूनी स्वामीसुताप्रती । आनंदले नाना चित्ती । प्रेमानंदे चरण वंदिती । स्तवन करिती तयांचे ॥३६॥ स्वामीसुते तयासी । लावियले स्वामीभक्तीसी । धन्य झाले नाना रेखी । रंगले भजनी समर्थांच्या ॥३७॥ ऐसे कित्येक सज्जन । स्वामीसुते शिष्य करोन । वाढविले महात्म्य पूर्ण । श्रीसमर्थ भक्तीचे ॥३८॥ पुढे रेखीबुवांनी । स्वामींची पत्रिका करोनी । ती अर्पावया श्रीचरणी । अक्कलकोटी पातले ॥३९॥ पत्रिका श्रीचरणी अर्पिली । स्वामीमूर्ती आनंदली । समर्थे त्यांसी आज्ञा केली । नगारा वाजवा म्हणोनी ॥४०॥ नगारा वाजविता रेखी । हसू आले समर्थांसी । पाहोनिया स्वभक्तासी । परमानंद जाहला ॥४१॥ अक्कलकोटी स्वामीसुत । श्रीसन्निध भजन करीत । कीर्तनी आनंदे नाचत । लोकलज्जा सोडोनी ॥४२॥ लोकापवादाचे मानी भय । तो भक्ती करील काय । प्रेमानंद चित्ती न होय । भजनी मन लागेना ॥४३॥ त्रिविध जन नानारीती । निंदा स्तुती करिताती । खेदानंद मानिता चित्ती । चित्तवृत्ति द्विधा होय ॥४४॥ असो अक्कलकोट नगरांत । शके सतराशे त्र्याण्णवात । प्रथम स्वामी जयंती करीत । स्वामीसुत आनंदे ॥४५॥ छेली खेडे ग्रामात । प्रथम स्वामी प्रगट होत । विजयसिंह नामे भक्त । गोट्या खेळत त्यांसवे ॥४६॥ ऐसे स्वामीसुताचे मत । परी दिसे आधाररहित । सत्यासत्य जाणती समर्थ । आपण तेथे अज्ञानी ॥४७॥ स्वामीसुत दिवसेंदिवस । स्वामीभक्ती करी विशेष । जन लाविले भजनास । कीर्तिध्वज उभारीला ॥४८॥ मनामाजी धरुनी कामना । कोणी येताचि दर्शना । त्यासी समर्थ करिती आज्ञा । सुताकडे जावयाची ॥४९॥ स्वामीसुतहि त्यांप्रती । मनांतील खूण सांगती । ऐकोनी जन चकित होती । वर्णिती ख्याती सुताची ॥५०॥ एकदा सहज स्वामीसुत । अक्कलकोटी दर्शना येत । तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे ॥५१॥ राणीचिये आज्ञेवाचोनि । दर्शन नोहे कोणालागोनी । ऐसे वर्तमान ऐकोनी । खिन्न मनी स्वामीसुत ॥५२॥ स्वामीदर्शन घेतल्याविण । तो न सेवी उदकान्न । ऐसे दिवस झाले तीन । निराहार राहिला ॥५३॥ मग वाड्यासमोर जावोन । आरंभिले प्रेमळ भजन । जे करुणरसे भरले पूर्ण । ऐकिले आतून राणीने ॥५४॥ हा समर्थांचा निःस्सीम भक्त । समर्थ दर्शनाची धरीत । दृढ इच्छा अंतरी ॥५५॥ सेवकांसी म्हणे सत्वरी । तुम्ही जाऊनी या अवसारी । त्या साधूते मंदिरी । प्रार्थोनिया आणावे ॥५६॥ ऐसी राणीची आज्ञा होता । सेवक धावले तत्त्वता । प्रार्थूनिया स्वामीसुता । मंदिरामाजी आणिले ॥५७॥ पाहोनिया समर्थांसी । उल्हास सुताचे मानसी । धावोनिया वेगेसी । मिळी चरणी घातली ॥५८॥ सद़्गदित अंतःकरणी । चरण क्षालिले नयनाश्रूंनी । देहभान गेले विसरोनी । स्वामीपदी सुखावला ॥५९॥ बाळ चुकले मातेसी । ते भेटले बहुत दिवसी । मग तयांच्या आनंदासी । पारावार नसेची ॥६०॥ निजसुताते पाहोनी । आनंदले समर्थ मनी । कर पिरविला मुखावरूनी । हस्ती धरुनी उठविले ॥६१॥ अक्कलकोटी त्या अवसरी । बहुत होते सेवेकरी । परी समर्थांची प्रीती खरी । स्वामीसुतावरी होती ॥६२॥ त्यांत होते जे दुर्जन । ते सुताचा उत्कर्ष पाहोन । दूषित होय त्यांचे मन । द्वेष पूर्ण करिताती ॥६३॥ काही उपाय करोन । फिरवोन समर्थांचे मन । स्वामीसुतावरचे प्रेम । कमी करु पाहताती ॥६४॥ स्वामीसुत रात्रंदिन । समर्थांपुढे करिती भजन । पायी खडावा घालोन । प्रेमरंगे नाचती ॥६५॥ एके दिवशी श्री समर्थ । बैसले असता आनंदात । स्वामीसुत भजन करीत । पायी खडावा घालोन ॥६६॥ ऐशी वेळ साधोनी । समर्थां सांगितले दुर्जनी । स्वामीसुताची हे करणी । योग्य नसे सर्वथा ॥६७॥ बैसला असता आपण । पायी खडावा घालोन । हा नाचतो काय म्हणून । आपुला अपमान करावया ॥६८॥ परकी आणि निजसुत । समान लेखिती जे सत्य । जे सर्वांसी अलिप्त । श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते ॥६९॥ आता खडावा काढोनी । मग नाचावे त्वा भजनी । ऐशी आज्ञा सुतालागोनी । केली समर्थे त्या वेळी ॥७०॥ तोच उठले कित्येकजण । खडावा घेतल्या काढोन । स्वामीसुताचा अपमान । केला ऐशा प्रकारे ॥७१॥ पाहोनिया ऐशी परी । खिन्न झाला सुत अंतरी । काळजात बोचली सुरी । अपमान दुःखे दुखावला ॥७२॥ मरणाहुनी परम कठीण । दुःख देतसे अपमा । उतरले सुताचे वदन । निस्तेज झाले सत्वर ॥७३॥ त्यांत होते जे वैरी । ते आनंदले अंतरी । म्हणती मोडली खोड बरी । अभिमान उतरला ॥७४॥ असो मग स्वामीसुत । ते स्थळ सोडोनी त्वरित । नगराबाहेर येत । मार्ग धरीत मुंबईचा ॥७५॥ अपमान दुःखे दुखावला । अंतरी बहु खिन्न झाला । परतोनी नाही आला । जन्मभरी अक्कलकोटी ॥७६॥ स्वाभिमानी जो नर । त्याचे दुखविता अंतर । ते दुःख जन्मभर । त्याच्या मनी जाचतसे ॥७७॥ त्या दुःखे उत्तरोत्तर । क्षीण झाला स्वामीकुमार । दुःख करी दिवसरात्र । चैन नसे क्षणभरी ॥७८॥ तोची रोग लागला । शेवटी आजारी पडला । ऐसा समाचार समजला । अक्कलकोटी समर्थांते ॥७९॥ स्वामीसुताची जननी । राहातसे त्या स्थानी । तिने हे वर्तमान ऐकोनी । विनवीले समर्थाते ॥८०॥ म्हणे कृपा करोनिया । सुताते आणावे या ठाया । कृपादृष्टी पाहोनिया । आरोग्य तया करावे ॥८१॥ मग समर्थे त्या अवसरी । मुंबईस पाठविले सेवेकरी । म्हणती सुताते सत्वरी । मजसन्निध आणावे ॥८२॥ परी सुत त्या सांगाती । आला नाही अक्कलकोटी । अपमान दुःख त्याचे पोटी । रात्रंदिन सलतसे ॥८३॥ सेवेकरी परतोनी आले । समर्थांते वृत्त कथिले । आणखी दुसरे पाठविले । त्यांची गती तीच झाली ॥८४॥ मग सांगती समर्थ । त्यासी घालोनी पेटीत । घेवोनि यावे त्वरित । कोणी तरी जावोनी ॥८५॥ तथापि स्वामीसुत पाही । अक्कलकोटी आला नाही । दिवसेंदिवस देही । क्षीण होत चालला ॥८६॥ शेवटी बोलले समर्थ । आता जरी न ये सत्य । तरी तोफ भरुनी यथार्थ । ठेविली ती उडवू की ॥८७॥ याचा अर्थ स्पष्ट होता । तो समजला स्वामीसुता । परी तो न आला अक्कलकोटा । जीवितपर्वा न केला ॥८८॥ आजार वाढला विशेष । श्रावण शुद्ध प्रतिपदेस । केला असे कैलासवास । सर्व लोक हळहळती ॥८९॥ त्या समयी मुंबईत । तयांचे जे शिष्य होत । त्यांसी झाले दुःख अमित । शोकसागरी बुडाले ॥९०॥ अक्कलकोटी त्या दिनी । समर्थ करिती विचित्र करणी । बैसले स्नान करोनी । परी गंध न लाविती ॥९१॥ भोजनाते न उठती । धरणीवर अंग टाकिती । कोणासंगे न बोलती । रुदन करिती क्षणोक्षणी ॥९२॥ इतुक्यामाजी सत्वर । मुंबईहूनी आली तार । श्रुत झाला समाचार । स्वामीसुत गत झाला ॥९३॥ उदासिनता त्या दिवशी । आली सर्व नगरासी । चैन न पडे काकूबाईंसी । पुसती समर्था क्षणोक्षणी ॥९४॥ मग काकूबाईने सत्वर । जवळी केले मुंबापूर । तेथे समजला समाचार । परत्र पावला आत्मज ॥९५॥ निजपुत्रमरणवार्ता । ऐकुनी करिती आकांता । तो दुःखद समय वर्णिता । दुःख अंतरी होतसे ॥९६॥ असो मग काकूबाई । अक्कलकोटी लवलाही । परतोनी आल्या पाही । बोलल्या काय समर्थांते ॥९७॥ सुत आपुला भक्त असोन । अकाली पावला का मरण । मग स्मरती जे हे चरण । त्यांचे तारण होय कैसे ॥९८॥ समर्थ बोलले तियेसी । उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी । संधी सापडली काळासी । ओढूनी बळेची मग नेला ॥९९॥ पुत्रशोके करोन । दुःख करी रात्रंदिन । समर्थ तियेचे समाधान । परोपरी करिताती ॥१००॥ नरजन्मा येऊनी सत्य । भक्ती केली एकनिष्ठ । केले जन्माचे सार्थक । परमपदा पावले ॥१०१॥ उच्च नीच भगवंती । नसे काही निश्चिती । ज्याची असेल जैसी भक्ती । श्रेष्ठ कनिष्ठ तेणेचि ॥१०२॥ धन्य धन्य स्वामीकुमार । उतरला भवोदधि दुस्तर । ख्याती झाली सर्वत्र । कीर्ति अमर राहिली ॥१०३॥ स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न एके अवसरी । पुसती सेवेकरी समर्थांते ॥१०४॥ ते कथा रसाळ अत्यंत । वर्णिले पुढील अध्यायात । श्रोते होऊनी सावधचित्त । अवधान द्यावे कथेसि ॥१०५॥ जयजय श्रीभक्तपालका । जयजयाजी परम मंगला । विष्णू शंकराची विमला । कीर्ति पसरो सर्वत्र ॥१०६॥ इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । भाविक परिसोत । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥१०७॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments