Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ धन्य धन्य ते या जगती । स्वामीचरणी ज्यांची भक्ती । त्यांसी नाही पुनरावृत्ती । पद पावती कैवल्य ॥१॥ गताध्यायी कथा सुंदर । स्वामींनी निवेदिले स्वचरित्र । आणि बाबा दिगंबर । त्यांचे वृत्त निवेदिले ॥२॥ निर्विकार स्वामीमूर्ति । लोका चमत्कार दाविती । काही वर्षे करोनी वस्ती । मंगळवेढे सोडिले ॥३॥ मोहोळमाजी वास्तव्य करीता । आप्पा टोळ झाले भक्त । तेथीचे साकल्य वृत्त । अल्पमती केवी वर्णू ॥४॥ स्वामी चरित्राचे हे सार । म्हणून केला नाही विस्तार । वर्णिता कथा समग्र । ग्रंथ पसरे उदधीसम ॥५॥ सवे घेउनी स्वामींसी । टोळ जाती अक्कलकोटासी । अर्धमार्गावरुनी टोळांसी । मागे परतणे भाग पडे ॥६॥ टोळ आज्ञापिले सेवका । जोवरी आम्ही येउ का । तोवरी स्वामींसी सोडू नका । येथेच मुक्काम करावा ॥७॥ टोळ गेलिया परतोनी । स्वामी चालले उठोनी । बहुत वर्जिले सेवकांनी । परी नच मानिले त्या ॥८॥ तेथोनिया निघाले । अक्कलकोटाप्रती आले । ग्रामद्वारी बैसले । यतिराज स्वेच्छेने ॥९॥ तेथे एक अविंध होता । तो करी तयांची थट्टा । परी काही चमत्कार पाहता । महासिद्ध समजला ॥१०॥ पूर्वपुण्यास्तव निश्चिती । आले चोळप्पाचे गृहाप्रती । स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती । चोळप्पा करी आदर ॥११॥ चोळप्पाचे भाग्य उदेले । यतिराज गृहासी आले । जैसी कामधेनू आपण बळे । दरिद्रियाच्या घरी जाय ॥१२॥ पूर्वपुण्य होते गाठी । म्हणूनी घडल्या या गोष्टी । झाली स्वामीराज भेटी । परम भाग्य तयाचे ॥१३॥ धन्य धन्य तयाचे सदन । जे स्वामींचे वास्तव्यस्थान । सुरवरां जे दुर्लभ चरण । तयाच्या घरी लागले ॥१४॥ योगाभ्यासी योग साधिती । तडी तापडी मार्गी श्रमती । निराहार कितीक राहती । मौन धरिती किती एक ॥१५॥ एक चरणी उभे राहोन । सदा विलोकिती गगन । एक गिरीगव्हरी बैसोन । तपश्चर्या करिताती ॥१६॥ एक पंचाग्निसाधन करिती । एक पवनाते भक्षिती । कित्येक संन्यासी होती । संसार अवघा सांडोनी ॥१७॥ एक करिती किर्तन । एक मांडिती पूजन । एक करिती होमहवन । एक षट्कर्मे आचरिती ॥१८॥ एक लोका उपदेशिती । एक भजनामाजी नाचती । एक ब्राम्हण भोजन करिती । एक बांधिती देवालये ॥१९॥ परी जयाचे चरण । दुर्लभ सद्भक्तिवाचोन । केलियासी नाना साधन । भावाविण सर्व व्यर्थ ॥२०॥ योगयागादिक काही । चोळप्पाने केले नाही । परी भक्तिस्तव पाही । स्वामी आले सदनाते ॥२१॥ तयाची देखोनिया भक्ती । स्वामी तेथे भोजन करिती । तेव्हा चोळप्पाचे चित्ती । आनंद झाला बहुसाळ ॥२२॥ तैपासून तयाचे घरी । राहिले स्वामी अवतारी । दिवसेंदिवस चाकरी । चोळप्पा करी अधिकाधिक ॥२३॥ तेव्ही राज्यपदाधिकारी । मालोजीराजे गादीवरी । दक्ष असोनी कारभारी । परम ज्ञानी असती जे ॥२४॥ अक्कलकोटची प्रख्याती । तेव्हा काही विशेष नव्हती । परी तयांचे भाग्य निश्चिती । स्वामीचरणी उदेले ॥२५॥ तैपासून जगांत । त्या नगराचे नाव गाजत । अप्रसिद्ध ते प्रख्यात । कितीएक जाहले ॥२६॥ चोळप्पाचे गृहाप्रती । आले कोणी एक यती । लोका चमत्कार दाविती । गावात बात पसरली ॥२७॥ आपुली व्हावी प्रख्याती । ऐसे नाही जयांचे चित्ती । म्हणुनिया स्वामीराज यती । बहुधा न जाती फिरावया ॥२८॥ लोकांमाजी पसरली मात । नृपासी कळला वृत्तांत । की आपुलिया नगरात । यती विख्यात पातले ॥२९॥ राहती चोळप्पाचे घरी । दर्शना जाती नरनारी । असती केवळ अवतारी । लीला ज्यांची विचित्र ॥३०॥ वार्ता ऐसी ऐकोनी । राव बोलले काय वाणी । गावात यती येवोनी । फार दिवस जाहले ॥३१॥ परी आम्ही श्रुत पाही । आजवरी जाहले नाही । आता जावोनी लवलाही । भेटू तया यतिवर्या ॥३२॥ परी ते केवळ अंतर्ज्ञानी । ऐसी वार्ता ऐकली कानी । हे सत्य तरी येवोनी । आताच देती दर्शना ॥३३॥ रावमुखातून वाणी निघाली । तोचि यतिमूर्ती पुढे ठेली । सकल सभा चकित झाली । मति गुंगली रायाची ॥३४॥ सिंहासनाखाली उतरोन । राव घाली लोटांगण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद्गदित ॥३५॥ दृढ घातली मिठी चरणी । चरण धुतले नेत्राश्रूंनी । मग तया हस्तकी धरोनी । आसनावरी बैसविले ॥३६॥ खूण पटली अंतरी । स्वामी केवळ अवतारी । अभक्ती पळोनी गेली दूरी । चरणी भक्ती जडली तै ॥३७॥ सकळ सभा आनंदली । समस्ती पाऊले वंदिली । षोडशोपचारे पूजिली । स्वामीमूर्ती नृपराये ॥३८॥ निराकार आणि निर्गुण । भक्तांसाठी झाले सगुण । तयांच्या पादुका शिरी धरोन । विष्णू नाचे ब्रह्मानंदे ॥३९॥ इति श्रीस्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । प्रेमळ भक्त परिसोत । तृतीयोऽध्याय गोड हा ॥४०॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चवथा

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नृसिंहस्तोत्रम्

आरती गुरुवारची

दशावतारस्तोत्रम्

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

Saubhagya Panchami 2024 : आज मनापासून शिव - शंभूची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments