Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा

Webdunia
॥ श्री गणेशाय नमः ॥ भवकानन वैश्वानरा । अज्ञानतमच्छेदका भास्करा । पूर्णसाक्षी परात्परा । भक्ता खरा सदय तू ॥१॥ गंगाजळ जैसे निर्मळ । तैसे तुझे मन कोमल । तुजसी स्तवितां प्रेमळ । सत्वर त्याते पावसी ॥२॥ विशेष गंगाजळाहून । आपुले असे महिमान । पाप ताप आणि दैन्य । तुमच्या स्मरणे निवारती ॥३॥ स्वामीचरित्र कराया श्रवण । श्रोते बैसले सावधान । प्रसंगाहूनि प्रसंग पूर्ण । रसभरित पुढे पुढे ॥४॥ ज्यांचे सबळ पूर्वपुण्य । तया झाले स्वामीदर्शन । ऐसे चोळप्पा आदीकरून । भाग्यवंत सेवेकरी ॥५॥ अक्कलकोट नगरात । एक तपापर्यंत । स्वामीराज वास करीत । भक्त बहुत जाहले ॥६॥ वार्ता पसरली चहूकडे । कोणासी पडता साकडे । धाव घेती स्वामींकडे । राजेरजवाडे थोर थोर ॥७॥ म्हणती भोसल्यांचे भाग्य परम । स्वामीरत्न लाभले उत्तम । नृपतीही भक्त निःस्सीम । स्वामीचरणी चित्त त्यांचे ॥८॥ तेव्ही किती एक नृपती । स्वामीदर्शन घेऊ इच्छिती । आणि आपुल्या नगराप्रती । आणू म्हणती तयांसी ॥९॥ बडोद्यामाजी त्या अवसरी । मल्हारराव राज्याधिकारी । एकदा तयांचे अंतरी । विचार ऐसा पातला ॥१०॥ अक्कलकोटाहुनी स्वामींसी । आणावे आपुल्या नगरासी । मग कोणे एके दिवशी । विचार ऐसा पातला ॥११॥ दिवाण आणि सरदार । मानकरी तैसे थोर थोर । बैसले असता समग्र । बोले नृपवर तयांप्रती ॥१२॥ कोणी जाऊनी अक्कलकोटासी । येथे आणील स्वामींसी । तरी आम्ही तयासी । इनाम देऊ बहुत ॥१३॥ त्याचा राखू सन्मान । लागेल तितुके देऊ धन । ही वटपुरी वैकुंठभवन । वसता स्वामी होईल ॥१४॥ कार्य जाणुनी कठीण । कोणी न बोलती वचन । कोणा एका लागून । गोष्ट मान्य करवेना ॥१५॥ तेव्हा तात्यासाहेब सरदार । होता योग्य आणि चतुर । तो बोलता झाला उत्तर । नृपालागी परियेसा ॥१६॥ आपुली जरी इच्छा ऐसी । स्वामींते आणावे वटपुरीसी । तरी मी आणीन तयांसी । निश्चय मानसी असो द्या ॥१७॥ ऐसे ऐकोनी उत्तर । संतोषला तो नृपवर । तैसी सभाही समग्र । आनंदित जाहली ॥१८॥ संजिवनी विद्या साधण्याकरिता । शुक्राजवळी कच जाता । दैवी सन्मानिला होता । बहुत आनंदे करोनी ॥१९॥ नृपतीसह सकळ जने । त्यापरी तात्यांसी सन्माने । गौरवोनि मधुर वचने । यशस्वी म्हणती तया ॥२०॥ बहुत धन देत नृपती । सेवक दिधले सांगाती । जावया अक्कलकोटाप्रती । आज्ञा दिधली तात्याते ॥२१॥ तात्यासाहेब निघाले । सत्वर अक्कलकोटी आले । नगर पाहुनी संतोषले । जे केवळ वैकुंठ ॥२२॥ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती । आनंदीत झाले चित्ती । तेथील जनांची पाहुनी भक्ती । धन्य म्हणती तयाते ॥२३॥ अक्कलकोटीचे नृपती । स्वामीचरणी त्यांची भक्ती । राजघराण्यातील युवती । त्याही करिती स्वामीसेवा ॥२४॥ आणि सर्व नागरिक । तेही झाले स्वामीसेवक । त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक । सेवेकरी निःस्सीम ॥२५॥ ऐसे पाहुनी तात्यांसी । विचार पडला मानसी । या नगरातुनी स्वामीसी । कैसे नेऊ आपण ॥२६॥ अक्कलकोटीचे सकल जन । स्वामीभक्त झाले पूर्ण । स्वामींचेही मन रमोन । गेले ऐसे ह्या ठाया ॥२७॥ प्रयत्नांती परमेश्वर । प्रयत्ने कार्य होय सत्वर । लढवोनी युक्ति थोर । कार्य आपण साधावे ॥२८॥ ऐसा मनी विचार करोनी । कार्य आरंभिले तात्यांनी । संतुष्ट रहावे सेवकजनी । ऐसे सदा करिताती ॥२९॥ करोनी नाना पक्वान्ने । करिती ब्राह्मणभोजने । दिधली बहुसाल दाने । याचक धने तृप्त केले ॥३०॥ स्वामीचिया पूजेप्रती । नाना द्रव्ये समर्पिती । जेणे सेवेकरी संतुष्ट होती । ऐसे करिती सर्वदा ॥३१॥ प्रसन्न व्हावे भक्तवत्सले । कार्य साधावे आपुले । म्हणोनी नाना उपाय केले । द्रव्य वेचिले तात्यांनी ॥३२॥ ऐशीयाने काही न झाले । केले तितुके व्यर्थे गेले । तात्या मनी खिन्न झाले । विचार पडला तयांसी ॥३३॥ मग लढविली एक युक्ती । एकांती गाठूनी चोळप्पाप्रती । त्याजलागी विनंती करिती । बुद्धीवाद सांगती त्या ॥३४॥ जरी तुम्ही समर्थांसी । घेऊनी याल बडोद्यासी । मग मल्हारराव आदरेसी । इनाम देतील तुम्हाते ॥३५॥ मान राहील दरबारी । आणि देतील जहागिरी । ऐसे नानाप्रकारी । चोळप्पाते सांगितले ॥३६॥ द्रव्येण सर्वे वशः । चोळप्पासी लागली आशा । तयाच्या अंतरी भरवसा । जहागिरीचा बहुसाल ॥३७॥ मग कोणे एके दिवशी । करीत असता स्वामीसेवेसी । यतिराज तया समयासी । आनंदवृत्ती बैसले ॥३८॥ चोळप्पाने कर जोडोनी । विनंती केली मधुर वचनी । कृपाळू होऊनी समर्थांनी । बडोद्याप्रती चलावे ॥३९॥ तेणे माझे कल्याण । मिळेल मला बहुत धन । आपुलाही योग्य सन्मान । तेथे जाता होईल ॥४०॥ ऐसे ऐकोनिया वचन । समर्थांनी हास्य करोन । उत्तर चोळप्पालागोन । काय दिले सत्वर ॥४१॥ रावमल्हार नृपती । त्याच्या अंतरी नाही भक्ती । मग आम्ही बडोद्याप्रती । काय म्हणोनी चलावे ॥४२॥ पुढले अध्यायी सुंदर कथा । पावन होय श्रोता वक्ता । श्रीस्वामीराज वदविता । निमित्त विष्णूदास असे ॥४३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । पंचमोध्याय गोड हा ॥४४॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा

संबंधित माहिती

सकाळी उठल्याबरोबर रोज हे केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतील

गुढीपाडवा म्हणजे काय?

Hanuman Janmotsav 2024: यावर्षी हनुमान जन्मोत्सव कधी आहे? पूजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Chaitra Navratri 2024 Date कधी सुरू होणार चैत्र नवरात्र, शुभ मुहूर्त जाणून घ्या

गुढीपाडवा आरती Gudi Padwa Aarti

यवतमाळ-वाशिम : अर्ज भरण्याची वेळ निघून चालली, तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

IPL 2024: धोनीने दिल्लीविरुद्ध केला आणखी एक विक्रम

सुप्रीम कोर्टाकडून रामदेव बाबांची खरडपट्टी, कोर्ट म्हणाले 'आता कारवाईला तयार राहा'

वर्धा लोकसभा : पुन्हा तडस की काळेंना मिळणार पसंती? पवारांच्या उमेदवारानं वाढवली रंगत

80 वर्षाच्या वराने 34 वर्षाच्या वधूसोबत केले लग्न

पुढील लेख
Show comments