Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा

Webdunia
श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥ अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य करिती । जाणोनी यती परब्रह्म ॥३॥ वेदांत आवडे तयासी । श्रवण करिती दिवसनिशी । शास्री हेरळीकरादिकांसी । वेतने देऊनि ठेविले ॥४॥ त्या समयी मुंबापुरी । विष्णुबुवा ब्रह्मचारी । प्राकृत भाषणे वेदांतावरी । करुनी लोका उपदेशिती ॥५॥ कैकांचे भ्रम दवडिले । परधर्मोपदेशका जिंकिले । कुमार्गवर्तियांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी ॥६॥ त्यांसी आणावे अक्कलकोटी । हेतु उपजला नृपापोटी । बहुत करोनी खटपटी । बुवांसी शेवटी आणिले ॥७॥ नृपा आवडे वेदांत । बुवा त्यात पारंगत । भाषणे श्रोतयांचे चित्त । आकर्षूनि घेती ते ॥८॥ रात्रंदिन नृपमंदिरी । वेदांतचर्चा ब्रह्मचारी । करिती तेणे अंतरी । नृपती बहु सुखावे ॥९॥ अमृतानुभवादि ग्रंथ । आणि ज्ञानेश्वरी विख्यात । कित्येक संस्कृत प्राकृत । वेदांत ग्रंथ होते जे ॥१०॥ त्यांचे करोनि विवरण । संतोषित केले सर्व जन । तया नगरी सन्मान । बहुत पावले ब्रह्मचारी ॥११॥ ख्याती वाढली लोकांत । स्तुति करिती जन समस्त । सदा चर्चा वेदांत । राजगृही होतसे ॥१२॥ जे भक्तजनांचे माहेर । प्रत्यक्ष दत्ताचा अवतार । ते समर्थ यतीश्वर । अक्कलकोटी नांदती ॥१३॥ एके दिवशी सहज स्थिती । ब्रह्मचारी दर्शना येती । श्रेष्ठ जन सांगाती । कित्येक होते तया वेळी ॥१४॥ पहावया यतीचे लक्षण । ब्रह्मचारी करिती भाषण । काही वेदांतविषय काढून । प्रश्न करिती स्वामींसी ॥१५॥ ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार । ऐसे ऐकोनि सत्वर । यतिराज हासले ॥१६॥ मुखे काही न बोलती । वारंवार हास्य करिती । पाहून ऐशी विचित्र वृत्ती । बुवा म्हणती काय मनी ॥१७॥ हा तो वेडा संन्यासी । भुरळ पडली लोकांसी । लागले व्यर्थ भक्तिसी । याने ढोंग माजविले ॥१८॥ तेथोनि निघाले ब्रह्मचारी । आले सत्वर बाहेरी । लोका बोलती हास्योत्तरी । तुम्ही व्यर्थ फसला हो ॥१९॥ परमेश्वररुप म्हणता यती । आणि करिता त्याची भक्ति । परी हा भ्रम तुम्हांप्रती । पडला असे सत्यची ॥२०॥ पाहोनि तुमचे अज्ञान । याचे वाढले ढोंग पूर्ण । वेदशास्रादिक ज्ञान । याते काही असेना ॥२१॥ ऐसे ब्रह्मचारी बोलोनी । पातले आपुल्या स्वस्थानी । विकल्प पातला मानी । स्वामींसी तुच्छ मानिती ॥२२॥ नित्यनियम सारोन । ब्रह्मचारी करिती शयन । जवळी पारशी दोघेजण । तेही निद्रिस्थ जाहले ॥२३॥ निद्रा लागली बुवांसी । लोटली काही निशी । एक स्वप्न तयांसी । चमत्कारिक पडलेसे ॥२४॥ आपुल्या अंगावरी वृश्चिक । एकाएकी चढले असंख्य । महाविषारी त्यातुनी एक । दंश आपणा करीतसे ॥२५॥ ऐसे पाहोनी ब्रह्मचारी । खडबडोनी उठले लौकरी । बोबडी पडली वैखरी । शब्द एक ना बोलवे ॥२६॥ जवळी होते जे पारशी । जागृती आली तयांसी । त्यांनी धरोनी बवांसी । सावध केले त्या वेळी ॥२७॥ हृदय धडाधडा उडू लागले । धर्मे शरीर झाले ओले । तेव्हा पारशांनी पुसले । काय झाले म्हणोनी ॥२८॥ मग स्वप्नीचा वृत्तांत । तयासी सांगती समस्त । म्हणती यात काय अर्थ । ऐसी स्वप्न कैक पडती ॥२९॥ असो दुसऱ्या दिवशी । बुवा आले स्वामींपाशी । पुसता मागील प्रश्नासी । खदखदा स्वामी हासले ॥३०॥ मग काय बोलती यतीश्वर । ब्रह्मपदी तदाकार । होण्याविषयी अंतर । तुझे जरी इच्छितसे ॥३१॥ तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी । काय म्हणोनी भ्यालासी । जरी वृथा भय मानितोसी । मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ॥३२॥ ब्रह्मपदी तदाकार होणे । हे नव्हे सोपे बोलणे । यासी लागती कष्ट करणे । फुकट हाता न येचि ॥३३॥ बुवांप्रती पटली खूण । धरिले तत्काळ स्वामीचरण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद़्गदित ॥३४॥ त्या समयापासोनी । भक्ती जडली स्वामीचरणी । अहंकार गेला पळोनी । ब्रह्मपदा योग्य झाले ॥३५॥ स्वामीचरित्र महासागर । त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर । त्याचा करोनिया हार । अर्पी शंकर-विष्णुकवी ॥३६॥ इति श्री स्वामी चरित्र महासागर । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥३७॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा

संबंधित माहिती

सकाळी उठल्याबरोबर रोज हे केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतील

गुढीपाडवा म्हणजे काय?

Hanuman Janmotsav 2024: यावर्षी हनुमान जन्मोत्सव कधी आहे? पूजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Chaitra Navratri 2024 Date कधी सुरू होणार चैत्र नवरात्र, शुभ मुहूर्त जाणून घ्या

गुढीपाडवा आरती Gudi Padwa Aarti

यवतमाळ-वाशिम : अर्ज भरण्याची वेळ निघून चालली, तरी महायुतीचा उमेदवार ठरेना

IPL 2024: धोनीने दिल्लीविरुद्ध केला आणखी एक विक्रम

सुप्रीम कोर्टाकडून रामदेव बाबांची खरडपट्टी, कोर्ट म्हणाले 'आता कारवाईला तयार राहा'

वर्धा लोकसभा : पुन्हा तडस की काळेंना मिळणार पसंती? पवारांच्या उमेदवारानं वाढवली रंगत

80 वर्षाच्या वराने 34 वर्षाच्या वधूसोबत केले लग्न

पुढील लेख
Show comments