Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेवंत रेड्डी आणि KCR या दोघांनाही हरवणारे कटीपल्ली वेंकटरमणा रेड्डी कोण आहेत?

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (15:16 IST)
Kattipalli Venkataramana Reddy Facebook
तेलंगणाच्या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या पराभवाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा कमारेड्डी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाचीही झाली.
 
कामारेड्डीमध्ये भाजपच्या कट्टीपल्ली वेंकटरमणा रेड्डी यांनी तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव आणि संभाव्य मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेसच्या रेवंत रेड्डी अशा दोन तुल्यबळ उमेदवारांचा पराभव केला आहे.
 
तेलंगणामधला भाजपचा जोर कमी झाला असला तरी दोन पक्षांच्या दोन प्रमुख नेत्यांना हरवणाऱ्या कट्टीपल्ली रेड्डी यांची चर्चा मात्र होत आहे.
 
त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा 6,741 मतांनी पराभव केला. त्यामुळे 40 वर्षांमध्ये कधीही पराभवाचं तोंड न बघितलेल्या केसीआर यांचा पराभव करणारे 'केव्हीआर' नेमके कोण आहेत याबद्दल मात्र देशभर उत्सुकता आहे.
 
1983 मध्ये अनंतूला मदन मोहन रेड्डी यांनी सिद्दीपेट मतदारसंघाच्या निवडणुकीत केसीआर यांचा शेवटचा पराभव केला होता. त्यामुळे मदन मोहन रेड्डी हे केसीआर यांचा पराभव करणारे आजपर्यंतचे एकमेव राजकीय नेते ठरले होते.
 
चाळीस वर्षांपूर्वीदेखील केसीआर यांनी अतिशय निसटता पराभव स्वीकारला होता.
 
मदन मोहन रेड्डी यांनी 887 मतांनी केसीआर यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे केसीआर यांनी लढवलेली ती पहिलीच निवडणूक होती.
पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या केसीआर यांनी त्यानंतर मात्र कधीच तसं होऊ दिलं नाही. सलग 13 वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी केला.
 
केसीआर यांची चाळीस वर्षांची ही विजयी घोडदौड रोखण्याची किमया केलीय वेंकटरमणा रेड्डी यांनी.
 
केसीआर यांच्यासोबत काँग्रेसचे बडे नेते रेवंत रेड्डी हेदेखील कमरेड्डीतून त्यांचं नशीब अजमावून बघत होते पण त्यांनाही वेंकटरमणा रेड्डी यांनी पराभवाची धूळ चाखायला लावली आहे.
 
कामारेड्डीच्या लोकांनी बाहेरून आलेल्या मातब्बर उमेदवारांना डावलून स्थानिक वेंकटरमणा रेड्डी यांना विजयी केलंय.
 
कोण आहेत वेंकटरमणा रेड्डी?
वेंकटरमणा रेड्डी यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
 
2004 मध्ये त्यांनी निझामाबाद जिल्ह्यात एक पंचायत समिती सदस्य म्हणूनही काम केलं आहे. त्यावेळी वायएस राजशेखर रेड्डी ते संयुक्त आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते.
 
त्यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि काहीकाळ जिल्हा परिषद अध्यक्षही राहिले. त्यांचे वडील पेड्डा राजा रेड्डी हेही कमरेड्डी पंचायत समितीचे पंचवीस वर्षं सभापती राहिले आहेत.
 
वेंकटरमणा रेड्डी यांनी त्यांच्या वडिलांच्या नवे एक ट्रस्ट स्थापन केला आणि अनेक लोकोपयोगी कामे केली. वायएसआर यांच्या मृत्यूनंतर स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांशी मतभेद झाल्याने ते नाराज राहिले.
2018 विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
 
त्यावेळी बिआरएसचे गंपा गोवर्धन हे आमदार म्हणून निवडून आले आणि वेंकटरमणा रेड्डी यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.
 
काँग्रेसच्या मोहम्मद शब्बीर अली यांनी गंपा गोवर्धन यांना त्या निवडणुकीत आव्हान दिलं होतं.
 
कामारेड्डी टाउन ड्राफ्ट मास्टर प्लॅनच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात व्यंकटरमण रेड्डी आघाडीवर होते.
 
या प्लॅननुसार कमरेड्डीतल्या आठ गावांमधली तब्बल 2 हजार एकर जमीन वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी अधिग्रहित केली जाणार होती. पण स्थानिक शेतकऱ्यांनी या प्लॅनला विरोध केल्यामुळे निवडणुकीच्या आधी तो रद्द करण्यात आला.
 
2018 मध्ये भाजपात सामील झाल्यानंतर वेंकटरमणा रेड्डी यांनी महिलांच्या प्रश्नावरही काम केलं. त्यांनी तरुणांना राजकारणाचं प्रशिक्षण देण्यासाठी 'नवयुगा भेरी कार्यक्रमा'सारखे कार्यक्रम राबवले.
 
कोरोनाकाळात बाहेरून आलेल्या मजुरांसाठी त्यांनी शिबिरं चालवली, त्या शिबिरांमध्ये रुग्णांना जेवण, हॉस्पिटल बेड आणि ऑक्सिजनची सुविधा देण्यात आलेली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीबीमुक्त भारत योजनेची अंमलबजावणी करण्यातही वेंकटरमणा रेड्डी आघाडीवर होते.
 
त्याअंतर्गत टीबीच्या रुग्णांना दर सहा महिन्यांनी पोषण किटचं वाटप केलं गेलं. रेड्डी यांनी असे अनेक उपक्रम राबवले.
 
स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा मुद्दा फायद्याचा ठरला का?
तेलंगणाच्या निवडणुकीत भाजपने तर जाहीरनामा प्रकाशित केलाच होता पण कमरेड्डीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेंकटरमणा रेड्डी यांनी स्वतः देखील एक जाहीरनामा बनवला होता.
 
केसीआर आणि रेवंत रेड्डी या दोघांसाठीही कामारेड्डी हा निव्वळ एक पर्याय होता. कारण दोन्ही प्रमुख नेत्यांचे मूळ मतदारसंघ वेगवेगळे आहेत.
 
केसीआर यांनी गजवेल मतदारसंघातही निवडणूक लढवली होती आणि रेवंत रेड्डी यांनीही त्यांचा गड समजल्या जाणाऱ्या कोडांगल मतदारसंघावर त्यांची भिस्त ठेवलेली होती.
 
यामुळेच मूळ कामारेड्डीचे रहिवासी असलेल्या वेंकटरमणा रेड्डी यांच्यासाठी हा मुद्दा फायद्याचा ठरला. पण ते स्वतः मात्र ही गोष्ट कबूल करत नाहीत. त्यांच्या प्रचारात त्यांनी या मुद्द्याचा कधीही वापर केला नसल्याचं ते म्हणतात.
 
वेंकटरमणा रेड्डी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात ते व्यावसायिक असल्याची माहिती दिलीय. कामारेड्डीमध्ये ते एक खाजगी शाळाही चालवतात.
 
'कामारेड्डीच्या मतदारांना हा विजय समर्पित, आयुष्यभर त्यांचे ऋणी राहीन'
वेंकटरमणा रेड्डी यांच्या नावाची सध्या देशभर चर्चा होत आहे.
 
तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा दोघांचा पराभव केलेला हा उमेदवार कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.
 
वेंकटरमणा रेड्डी यांनी त्यांचा हा विजय कामारेड्डीच्या मतदारांना समर्पित केलाय.
 
विजयानंतर पक्षाचा प्रचार केलेल्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे त्यांनी आभार मानले. ते हेही म्हणाले की या विजयामुळे आता कामारेड्डीच्या लोकांचे ते आयुष्यभर ऋणी असणार आहेत.
 
ते म्हणाले की दारू किंवा पैश्यांचं वाटप न करताही त्यांना लोकांनी मतदान केलं आणि देशभर अशाच निवडणुका व्हाव्यात असं त्यांना वाटत.
 
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "केसीआर आणि रेवंत रेड्डी या दोघांनाही त्यांनी एखाद्या सामान्य प्रतिस्पर्ध्यासारखं बघितलं. राजकारणात अनेक महान नेते येतात आणि जातात आणि हे दोघेही त्याला अपवाद नाहीयेत."
 
त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता ते गरिबांसाठी घरं बांधणार आहेत. कामारेड्डीच्या सामान्य लोकांसाठी ते आमदार म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
 
सरकार कुणाचंही आलं तरी प्रत्येक मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळतो आणि त्या निधीचा वापर कमारेड्डीच्या लोकांसाठी करणार असल्याचंही ते म्हणाले.
 
वेंकटरमणा रेड्डी यांच्या विजयाबाबत प्रतिक्रिया देताना भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली.
 
त्यात ते म्हणाले की, "केसीआर आणि रेवंत रेड्डी यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव करणारा हा नेता. आता तेलंगणा लोकसभेतही भाजप मोठा विजय मिळवेल आणि पुढच्या विधानसभेत सहज सत्ता मिळवेल असा विश्वास वाटतो."
 
Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

छोट्या कारणावरून पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर स्वतःचे जीवन संपविले

LIVE: विधानसभा निवडणुकांचे निकाल पूर्णपणे एनडीएच्या बाजूने असणार-चिराग पासवान

झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार-चिराग पासवानचा दावा

भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, चकमकीत 10 नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments