Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनेक परदेशी अभ्यासकांना कशी पडली विठोबाची आणि वारीची भुरळ?

Webdunia
रविवार, 14 जुलै 2024 (11:00 IST)
- डॉ. श्रीरंग गायकवाड
प्रेम, बंधुभाव, करुणा हीच मूल्ये चिरंतन आहेत. द्वेष, वैरभाव, विसरून आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे, हे सत्य विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या लक्षात आले आहे.
 
त्यामुळे संतांचे शांती-प्रेमाचे विचार सांगणाऱ्या पंढरीच्या वारीविषयी जगभरात कुतूहल आहे. विविध देशांमधील अभ्यासकांनी महाराष्ट्रातील या वारी परंपरेचा आणि संतविचारांचा अभ्यास केला आहे.
 
न्यूयॉर्कमधील वॉल्डेन उपनगरात एक शांतीमंदिर आहे. तिथे अमेरिकन गृहस्थ नाला विल्किन्सन यांनी तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले.
 
ते प्रचंड प्रभावित झाले. त्यानंतर ते तुकोबांच्या अभंगांचा अनुवाद करू लागले. एवढेच नाही तर, ते या अभंगांचे निरूपणही करू लागले. त्यामुळेच तेथील लोक आता त्यांना ‘तुकाराम’ आणि त्यांच्या पत्नीला ‘आवली’, असे संबोधतात.
 
देश, प्रांत, भाषेच्या मर्यादा ओलांडून संत तुकाराम महाराजांची कविता जगभरातील लोकांना कशी भावते आहे, त्याचे हे एक उदाहरण.
 
1889मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकोबांच्या गाथेतील 35 निवडक अभंगांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर, 25हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून त्यांनी सरकारतर्फे संपूर्ण गाथा प्रकाशित केली.
 
त्यानंतर तुकाराम महाराजांचे वैश्विक विचार जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, लिथोनेनियन, एस्प्रांतो, सर्बियन आदी विदेशी भाषांमध्ये शब्दबद्ध झाले.
 
जर्मन साहित्यिक लोथार लुत्से यांना जर्मन तत्त्वज्ञ नित्शे आणि संत तुकाराम यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड साम्य आढळले. त्यांनी तुकोबांच्या अभंगांचा जर्मन भाषेत भावानुवाद केला.
 
या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविले. एल्सा क्रॉस या प्रसिद्ध लेखिकेनेदेखील तुकारामांच्या अभंगांचा स्पॅनिश भाषेत अनुवाद केला.
 
साठच्या दशकात वारकरी संतविचारांचा, श्रीविठ्ठलाचा शोध घेणारे फ्रेंच अभ्यासक म्हणजे, डॉ. जी. ए. दलरी.
 
फ्रान्समध्ये ख्रिश्चन मिशनरी असलेल्या डॉ. दलरी अर्थात गाय अल्बर्ट दलरी यांचे मन महायुद्धामुळे घडलेल्या मानवी संहारामुळे उद्विग्न झाले होते. ते शांतता आणि प्रेमाचा संदेश सांगणाऱ्या विचारधारेच्या शोधात होते.
 
यातूनच भारतातील हजारो वर्षांच्या अध्यात्मिक परंपरेचा अभ्यास करण्यासाठी ते पुण्यात दाखल झाले. वारकरी संप्रदायातील प्राचार्य सोनोपंतमामा दांडेकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. मराठी संतांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांनी मामांकडून चार वर्षे मराठी भाषा शिकून घेतली. त्यांनी तुकोबांच्या 101 अभंगांचे फ्रेंचमध्ये भाषांतर केले.
 
संत तुकारामांच्या या फ्रेंच अभंगांचे फ्रान्सच्या रेडिओवरही प्रसारण झाले.
 
1951 मध्ये ते मामासाहेबांसोबतच पंढरपूरच्या पायी वारीला गेले. 1943 ते 1973पर्यंत डॉ. दलरी भारतात वास्तव्याला होते. यादरम्यान त्यांनी सहा वर्षे वारकरी संप्रदाय, क्षेत्र पंढरपूर, विठ्ठलदेवता यांचा अभ्यास करून ‘कल्ट ऑफ विठोबा’ नावाचा ग्रंथ तयार केला.
 
विठ्ठलाप्रमाणे 'कटिवर कर' ठेवलेल्या मूर्ती महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील अनेक गावांत आढळतात. शिळांवर कोरलेल्या या मूर्ती धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ घडविलेल्या असतात. त्यांना वीरगळ असे म्हणतात.
 
श्री विठ्ठल म्हणजे अशाच एखाद्या वीरापैकी असावा, असावा असे मत डॉ. दलरी यांनी या ग्रंथात मांडले. ही मांडणी अनेकांना मान्य झाली नाही. मात्र तरीही पुढच्या काळात हा ग्रंथ अनेक संशोधकांना पथदर्शक ठरला.
 
दुसरे प्रमुख विदेशी अभ्यासक म्हणजे जर्मनीच्या हायडलबर्ग येथील डॉ. गुंथर सोन्थायमर.
 
ते 1954मध्ये पुण्यात आले. दलरी यांच्याप्रमाणे श्री विठ्ठलाचे मूळ एका वीरगळात आहे, असा सिद्धान्त त्यांनीही मांडला.
 
अर्थात तो मौखिक ओव्यांवर वगैरे आधारित असल्याने अभ्यासकांना मान्य झाला नाही. 1970 नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. करण्यासाठी पश्चिम जर्मनीतून अनेक अभ्यासक पुण्यात आले.
 
त्यामध्ये एकनाथी भागवतावर अभ्यास करणारे डॉ. स्कोय हॉक, संत शेख महंमद यांच्यावर अभ्यास करणारे डॉ. मायकेल मार्टीनस, तुळजाभवानी मातेवर संशोधन करणारे डॉ. जेन्सन आदींचा समावेश होता.
 
पायी पंढरीची वारी केलेल्या सोन्थायमर यांनी वारीवर 1989मध्ये दीड तासांचा ‘वारी अँन इंडियन पिलग्रिमेज’ नावाचा माहितीपट तयार केला.
 
जर्मन दूरचित्रवाणीने पहिल्यांदा हा माहितीपट प्रसिद्ध केला. यात वारीशी संबंधित अनेकांच्या मुलाखती, आठवणी, मत-मतांतरे चित्रित करण्यात आली आहेत.
 
हायडेलबर्गमध्ये 1988 मध्ये सोन्थायमर यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक आणि संस्था परिषदेचे पहिले अधिवेशन आयोजित केले होते.
 
त्यात जगातील 50 अभ्यासकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीवर शोधनिबंध वाचले. एक आंतरराष्ट्रीय भक्ती परिषदही त्यांनी हायडेलबर्गलाच घेतली होती. त्यात त्यांनी वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. सोनोपंतमामा दांडेकर यांच्या कीर्तनाचे ध्वनिमुद्रण ऐकवले होते.
 
खंडोबाच्या अभ्यासासाठी सोन्थायमर यांनी जेजुरीत तळ ठोकला. गावोगाव प्रत्यक्ष फिरून विठोबा, खंडोबा, बिरोबा, वीरगळ, धनगर आदींचा अभ्यास केला. यात्रा-जत्रांमध्ये फिरले.
 
वयाच्या 54 व्या वर्षीच सोन्थायमर यांचे हृदयविकाराने जर्मनीत निधन झाले. मृत्यूनंतर आपले दहन करून रक्षा जेजुरीला कऱ्हा नदीच्या पात्रात टाकावी, अशी त्यांची इच्छा होती.
 
त्यानुसार जेजुरीकरांनी मल्हारगडाच्या पायथ्याला त्यांच्या अस्थिकलशावर पुष्पवर्षाव करून वाद्यांच्या गजरात त्यांच्या अस्थींचे कऱ्हा नदीत विसर्जन केले.
 
1855 मध्ये मिचेल मरे हे ख्रिश्चन धर्मोपदेशक महाराष्ट्रात आले होते. त्यांनी 'आळंदीची यात्रा' या नावाची पुस्तिका लिहिली. तसेच मराठी संतांवर 10 पुस्तके लिहिली.
 
'ज्ञानेश्वर चीफ मराठी पोएट्स' असा शोध निबंध मरे यांनी लिहिला आहे. तसेच 'पंढरपूरचा विठोबा' आणि 'तुकारामाची गोष्ट' हे दोन ग्रंथ लिहिले आहेत.
 
अमेरिकेतली न्यू हॅम्पशायरचे जस्टीन ई अॅबॅट अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिले. 1910 मध्ये अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे स्थायिक होऊन मराठी संतांच्या रचनांचा अभ्यास केला. त्यात संत चरित्रे लिहिणारे महिपतीबुवा ताराबादकर यांच्या भक्तचरित्रांचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.
 
संत भानुदास, संत एकनाथ, संत दासोपंत, संत बहिणाबाई, संत तुकाराम, आदी संतांची चरित्रे प्रसिद्ध केली. अॅबॅट यांनी सुरुवातीला 'प्रेअर्स ऑफ ज्ञानदेव' या नावाने इंग्रजीत ग्रंथ प्रसिद्ध केला.
 
1914मध्ये मराठी संतांच्या रचनांची ओळख ’भक्ती’ या दीर्घ लेखातून करून देणारे पाश्चात्य लेखक लिओनार्ड जॉन सेज्विक, ज्ञानेश्वरीच्या व्याकरणावर 1917मध्ये चिकित्सात्मक लेख लिहिणारे डब्लू डॉडरेट
 
डॉ. निकोल मॅकॅनिकल यांनी 1917-18 मध्ये 'इंडियन पोएट्री ऑफ डिव्होशन' असा लेख लिहून, ज्ञानेश्वरादी संतांच्या अभंगांचा परिचय करून दिला.
 
1919 मध्ये 'साम्स ऑफ मराठा सेंटस्' हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. या ग्रंथात त्यांनी संतांच्या १०८ अभंगांचा इंग्रजी अनुवाद दिला आहे. त्यात 76 अभंग तुकाराम महाराजांचे आहेत.
 
1941मध्ये रेव्हरंड जे. एफ. एडवर्डस यांचे 'ज्ञानेश्वर द आउटकास्ट ब्राह्मीन' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. संत तुकारामांवर त्यांनी चार ग्रंथ लिहिले. 1947 मध्ये 'महाराष्ट्राला आध्यात्मिक जीवनाची भूक' या साडेतीनशे पानांच्या ग्रंथामध्ये त्यांनी संत चरित्रे वर्णन केली आहेत.
 
फ्रेंच प्राध्यापिका प्रा. शालोंद वोदविले यांनी वारकरी संप्रदाय, पंढरपूर आणि मराठी संतांच्या रचनांवर लिहिले आहे. 1969मध्ये त्यांनी फ्रेंच भाषांतरासहित संत ज्ञानेश्वरांचा 'हरिपाठ' प्रसिद्ध केला.
 
प्रा. जॉन स्टॅन्ले यांनी 'ग्रेट महाराष्ट्रीयन पिलग्रीमेज : आळंदी-पंढरपूर' हा शोधनिबंध 1980च्या तीर्थयात्रेवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत वाचला. दक्षिण जर्मनीच्या स्टुटगार्टच्या प्रा. कॅथॉरिना किनले यांनी 'ज्ञानेश्वर स्टडीज' ग्रंथाच्या तीन खंडांतून ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथ्याचे चिकित्सात्मक अध्ययन केले.
 
एच्. एम्. लॅम्बर्ट या लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज या संशोधन संस्थेतील मराठीच्या प्राध्यापिका. त्यांनी व्ही. जी. प्रधान यांच्या सोबत युनेस्को प्रकाशनासाठी ज्ञानेश्वरीचे दोन खंडातून इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केले.
 
जपानच्या प्रा. इवानो शिमा यांनी 'महाराष्ट्राची दैवते', 'पंढरपूरचा विठ्ठल', 'विठ्ठलाचे नित्योपचार', 'महाराष्ट्र आणि विठ्ठल संप्रदाय' असे जपानी भाषेत लेख लिहिले.
 
त्यांनी जपानीत ज्ञानेश्वरीचे भाषांतर केले आहे. जपानच्याच डॉ. चिहीरो कोईसा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'ज्ञानेश्वरांच्या भक्तिविषयक तत्त्वज्ञानाचे सामाजिक परिणाम' या विषयावर पीएच. डी. केली. डॉ. शिमा यांच्या ज्ञानेश्वरी जपानी भाषांतराच्या प्रकल्पातही त्यांनी काम केले.
 
पंढरपूर येथील श्रीधर स्वामी नाझरेकर यांनी लिहिलेले 'रामविजय', हरिविजय', 'पांडवप्रताप', 'शिवलीलामृत' आदी धार्मिक ग्रंथ अजूनही खेडोपाड्यांत नित्य ‘पोथी’ म्हणून वाचले जातात.
 
या श्रीधर स्वामींनीच 'पांडुरंगमाहात्म्य' नावाचा 10अध्यायांचा ग्रंथ लिहिला आहे. त्याचा अभ्यास 1965 मध्ये लंडनचे आय. एम. पी. रिसाईड यांनी केला.
 
'पांडुरंग महात्म्य ऑफ श्रीधर' हा 20 पानांचा निबंध त्यांनी लिहिला. ते लंडनच्या 'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेचे संशोधक होते. या अभ्यासासाठी रिसाईड तीन महिने पंढरपुरात राहिले.
 
अमेरिकेतील डॉ. एलिनॉर झेलियट यांनी संत चोखा मेळा यांच्यावर संशोधन केले. संत एकनाथांच्या भारूडांमधील स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू- मुसलमान संबंधांचा विचार केला. 'संतसाहित्याच्या परंपरा आणि आधुनिकता', 'मध्यमयुगीन भक्तीचा इतिहास', 'दलितांच्या जीवनावर चोखोबांवर प्रभाव', 'भक्तिसंप्रदायातील हिंदू-मुसलमान संबंध' असे लेखन त्यांनी केले.
 
अमेरिकेच्या लॉरेन्स विद्यापीठातील डॉ. जॉन स्टॅन्ले यांनी एकनाथांच्या भारूडांचा अभ्यास केला. रशियातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत 1980 मध्ये त्यांनी 'दी ग्रेट महाराष्ट्रीयन पिलग्रिमेज आळंदी-पंढरपूर' आणि 1982 च्या परिषदेत, 'दी पंढरपूर पिलग्रीमेज रिच्युअल अँड प्रोसेस' या विषयावर शोधनिबंध सादर केले.
 
प्रा. एरिक सँड हे डेन्मार्कचे भारतीय विद्यांचे प्राध्यापक 1984 मध्ये दिंडीतून पंढरपूरला पायी गेले होते. पंढरपूरात शैव आणि वैष्णव संप्रदायांचा महासमन्वय झाल्याने, हे क्षेत्र तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
 
महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासक म्हणून डॉ. अॅन फेल्डहौस यांना ओळखले जाते.
 
संत तुकाराम महाराजांच्या शिष्या असलेल्या संत बहिणाबाई यांच्यावर त्यांनी लेखन केले. बहिणाबाईंच्या संसारात राहून परमार्थ करण्याच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
 
अमेरिकन-भारतीय समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्वेट यांनी लिहिलेले ‘दी साँग ऑफ तुकोबा’ हे पुस्तक लोकप्रियता मिळवत आहे.
 
पाश्चिमात्य जगावर नेदरलँड येथील थोर विवेकवादी तत्त्वज्ञ स्पिनोझा बारूख यांचा मोठा प्रभाव आहे. स्पिनोझा यांचे विचार तुकोबांशी जुळतात असे विचारवंतांच्या लक्षात आले.
 
तुकोबांप्रमाणेच नैतिकता म्हणजेच देव, हे सूत्र स्पिनोझा यांनी त्यांच्या ‘एथिक्स’ नावाच्या ग्रंथात सांगितले. मात्र बायबलने वर्णन केल्यापेक्षा हा देव वेगळा असल्याने या पुस्तकावर बंदी घातली गेली. नंतरच्या काळात पाश्चिमात्यांनी हा विचार उचलून धरला.
 
तुकोबा आणि इतर संतांच्या विचारांची मदत छत्रपती शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी झाली, तसाच आधार वसाहतवादाच्या काळात स्पिनोझाच्या विचारांनी पाश्चिमात्य राज्यकर्त्यांना दिला. अमेरिकेतील देवाची संकल्पनाही स्पिनोझाच्या देव संकल्पनेवर आधारलेली आहे.
 
वसाहतवाद्यांमुळे त्याचा प्रसार, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथील जनतेत झाला. या देशांतील विचारवंतांनाही स्पिनोझाकडून प्रेरणा मिळाली. त्यातून उदारमतवाद्यांनी धर्मवेडाचे भूत रोखले.
 
अगदी इंग्लडसारख्या देशातही उदारमतवादी लोकांची संख्या वाढली. त्याचा परिणाम म्हणून वसाहतवाद्यांच्या विरोधात 20व्या आणि 21व्या शतकात उदारमतवादी सरकारांची स्थापना झाली. आजही सर्व वंशवादी, फॅसिस्ट, हुकूमशाही विचारसरणीला मागे सारत या विचारांची आगेकूच सुरू आहे.
 
हे उदारमतवादी विचार महाराष्ट्रातील संतांनी साडेसातशे वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहेत. संतांनी स्वत:च देव ही संकल्पना उभी केली. संत सावता माळी ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असे म्हटले, हे त्याचेच उदाहरण.
 
स्पिनोझा यांनी सांगितले, निसर्ग हाच देव आहे. स्पिनोझाच्या काळातच तुकोबा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ असे सांगत होते. स्पिनोझाला विश्वातील एकत्त्वाचा ध्यास होता. संत ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागितले होते.
 
आज कृत्रिम बुध्दीमत्तेकडे वेगाने निघालेल्या जगाला मानवी संवेदनशीलता, नैतिकता यांची गरज भासत आहे. म्हणून तर जगातील सर्वच विद्वान, संशोधकांना संतविचार आपले वाटू लागले आहेत.
 
संदर्भ : बापरखुमादेवीवरू मासिक, पुणे

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

Chath Aarti छठ मातेची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments