'' टाळी वाजवावी गुढी उभारावी
वाट ती चालावी पंढरीची''
पावसाळा सुरु झाला की आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकर्याचं व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादूका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात.
आषाढी-कार्तिकीला 'पंढरपुरा नेईन गुढी' म्हणत. सर्व महाराष्ट्रातून दिंडया येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंडया येतात. नदी अनंत अडचणी आल्या तरी सर्वांना जीवन देत पुढे सागराशी एकरूप होण्यास आतुर झालेली असते तशीच ही विठ्ठल भकत्तीची गंगा, चंद्रभागेच्या काठाशी असणार्या पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप होते ती वारकरी सोहळ्याच्या रूपात.
MH GOVT
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सदगुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना-न्हावी, सावता 'माळी', नामा 'शिंपी', गोरा 'कुंभार, नरहरी 'सोनार' कान्होपागा 'वारांगना', एकनाथ 'ब्राह्मण', तर चोखा 'महार'! अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे! विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य. विठ्ठलाला माऊली मानणार्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मुर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.
{C}
MH GOVT
{C} प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोहचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकर्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकर्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतानी दाखविली. आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे.
अहो! एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणार्यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्याच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. 'गोपालकाल्यात' सर्वांच्या शिदोर्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.