तेव्हा शिवाने त्याला म्हटले, तू अत्यंत दुर्लभ आणि देवाला दु:ख देणारे वर मागितले आहेत. तरीही तुझ्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन मी तुझी कामना पूर्ण करतो. कामासुर प्रसन्न होऊन गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना शिव दर्शनाचा वृत्तांत सांगितला. दैत्याचार्यांने खूश होऊन त्याचा विवाह महिषासुराच्या रूपवान कन्येशी लावून दिला. या दरम्यान सर्व दैत्य एकत्र आले आणि त्यावेळी शुक्राचार्यांनी कामासुराची दैत्यराजपदी नियुक्ती केली. सर्वांनी त्याच्या अधीन राहण्याचे मान्य केले.
कामासुराने अत्यंत सुंदर रतिद नावाच्या नगरात आपली राजधानी निर्माण केली. रावण, शंबर, महिष, बळी आणि दुर्मद हे पाच त्याचे शूर प्रधान होते. कामासुराने आपल्या पाच प्रधानांबरोबर चर्चा करून पृथ्वीवर आक्रमण केले. नंतर स्वर्गावर आक्रमण केले त्याच्या शस्त्रासमोर देवांचाही टिकाव लागला नाही. सर्वजण त्याला शरण आले. काही कालावधीतच कामासुराने त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. त्याने सर्व धर्मकार्ये बुडवली.
त्याच्या त्रासाला कंटाळलेले सर्व देव एकत्र आले तेव्हा तेथे योगीराज मुदगल ऋषी आले. भगवान शंकराने त्यांना कामासुराच्या विनाशापासून मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग विचारला. योगीराज मुदगल यांनी सांगितले की आपण सर्वजण सिद्धक्षेत्र मयुरेश येथे जाऊन तप करा. तेथे तुमच्या तपाने संतुष्ट होऊन गणेश प्रकट होतील आणि आपल्या संकटाचे निवारण करतील.
शंकरासह सर्व देव मयुरेश येथे गेले. तिथे त्यांनी गणेशाची श्रद्धा आणि विधीपूर्वक पूजा केली. नंतर एकाक्षरी मंत्राने गणेशाची उपासना केली. गणेश प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले. देवतांनी निवेदन केले की, 'प्रभू दैत्यराज कामासुराच्या क्रूरतेमुळे आम्हा सर्व देवतांचे स्थान भ्रष्ट झाले आहे. आपण आमचे रक्षण करा. हे ऐकून गणेशाने कामासुराचा वध करण्याचे आश्वासन त्यांना दिले. आकाशवाणीने ही घोषणा ऐकून कामासूर मूर्च्छित झाला. काही वेळानंतर त्यांने देवता आणि ऋषींवर आक्रमण केले.
तेव्हा देवतांनी गणेशाला साकडे घातले. त्यानंतर अंकुशधारी महाविकट गजानन प्रकट झाले. त्यांनी कामासुराला नष्ट करण्याचे आश्वासन दिले. आपल्या अफाट सैन्यासह कामासुर तिथे पोहचला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. देवतांच्या प्रबळ प्रहाराने दैत्य व्याकूळ झाले आणि भयभीत होऊन सैरभैर धावू लागले. या भीषण युद्धात कामासुराचे दोन प्रिय पुत्र शोषण आणि दुष्पूर मारले गेले. तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन कामासुर समोर आला. देवाला मारण्याची वल्गना त्यांनी केला.
विकटाने हसून उत्तर दिले, 'तू शंकराच्या वराने माजला आहेस मी सृष्टीस्थित संहारकर्ता आणि जन्म-मृत्यूरहीत आहे. तू मला कसे मारशील. आपले गुरू शुक्राचार्यांच्या उपदेशाची आठवण करून माझ्या स्वरूपाला समजून घे. जिवंत राहू इच्छित असशील तर मला शरण ये अन्यथा तुझा सर्व गर्व दूर करून तूला निश्चितच मारील'. हे ऐकून कामासुर अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपली गदा विकटावर फेकली. पण ती विकटाला स्पर्श न करताच पृथ्वीवर पडली.
त्यानंतर कामासूर मुर्च्छित होऊन पडला. त्याला भयानक वेदना होऊ लागल्या. अकल्पित शक्तीचा अनुभव त्याला आला. मग त्याने विचार केला की या देवाने शस्त्राशिवाय माझी अशी दुर्दशा केली आहे. त्याच्या हातात शस्त्र असेल तर काय होईल? तो निश्चितच मला मारून टाकेल. मग त्याने विकटाला अनेक प्रश्न विचारले आणि त्याचे समाधान झाल्यानंतर तो विकटचरणी शरण गेला. मूषकध्वजाने त्याला आपले भक्त मानले. अशा प्रकारे कामासूर शांत जीवन व्यतीत करण्यासाठी निघून गेला. देवता आणि मुनी प्रसन्न झाले.