अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं आज भूमिपूजन होत आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. वाचा काय म्हणाले राज ठाकरे….
जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे.
अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.
तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.
सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे.
तमाम हिंदू बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.