Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्याला वाचवण्यात अपयश

Webdunia
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (07:48 IST)
तामिळनाडूमधील त्रिची शहराजवळच्या नाडुकाटुपत्ती गावातील दोन वर्षांचा सुजीत विल्सन नावाचा चिमुरडा घरामागे असलेल्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचा आता मृत्यू झाल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
 
सरकारी अधिकारी जे. राधाकृष्णन यांच्या हवाल्यानं एएनआय या वृत्त संस्थेनं ही माहिती दिली आहे. मुलाचं शरिर कुजण्यास सुरुवात झाली होती असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
कोईम्बतूरहून बीबीसीसाठी काम करणाऱ्या हरिहरन यांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुरड्याचा मृतदेह त्याच खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला ज्यात तो पडला होता. त्याला वाचवण्यासाठी खणण्यात आलेल्या समांतर खड्ड्याचा त्यासाठी उपयोग झाला नाही.
 
नेमकं काय घडलं?
ही बोअरवेल पाण्यासाठी खणण्यात येत होती. पाणी न लागल्याने त्यांनी खाली जाण्याचा रस्ता बंद करून टाकला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बोअरवेलवरचं आवरण म्हणून काम करणारी रेती बाजूला झाल्याने सुजीत खाली पडला असं सांगितलं जातं.
 
26 फूटवर सुजीत अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. तो बोअरवेलमध्ये पडला हे समजताच संबंधित यंत्रणांनी त्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले.
 
सुजीतला खोल खड्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला जेणेकरून त्याला श्वसनाचा त्रास होऊ नये. एनडीआरएफच्या जवानांनी सुजीतची स्थिती समजावी यासाठी खड्यात सीसीटीव्ही कॅमेरे पाठवले होते.
 
सुजीतला वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या सहा आणि राज्य डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या काही तुकड्या कार्यरत होत्या.
 
थायलंडच्या गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेचा थरार
थायलंड : गुहेत स्वतः 3 दिवस राहून मुलांना वाचवणारा अवलिया डॉक्टर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुजीतला वाचवण्यात यावं यासाठी प्रार्थना केली. "सुजीत विल्सनसाठी प्रार्थना करत आहे. सुजीतला वाचवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील," असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं.
 
हात बांधून ओढून काढण्याचे प्रयत्न निष्फळ
तामिळनाडूचे आरोग्य मंत्री विजय भास्कर यांच्या मते सुरुवातीला सुजीतचे हात वरून दिसत होते. म्हणून बचाव करणाऱ्या टीमने त्याच्या हाताला दोरी बांधून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याला यश मिळू शकले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा असा प्रयत्न करण्यात आला मात्र तोही अपयशी ठरला.
 
राज्याचे आरोग्य मंत्री शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि सुजीतच्या आईवडिलांशी बातचीत केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
 
एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाने सुजीतला ओढून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र तो दगडांमध्ये अडकला होता.
 
एनडीआरएफचे जवान सीसीटीव्हीशी संलग्न एका मशीनद्वारे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
 
अधिकाऱ्यांनी बोअरवेलला समांतर खड्डा खणण्याचा निर्णय घेतला. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत खड्डा खोदण्याचं काम मशीनने सुरू केलं. 10 फूटांच्या खोलीनंतर कातळाचा भाग लागला.
 
काही तासांनंतर ते मशीन नादुरुस्त झालं. दुसऱ्या मशीनद्वारे हे काम सुरू ठेवण्यात आलं.
 
रविवारी रात्री तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला.
 
सुजीतला वाचवण्यासाठी कार्यरत टीमने 35 फूटांपर्यंत खड्डा खोदला. 45 फूट आणखी खणणे आवश्यक होतं.
 
अनेक अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजीत सुखरूप बाहेर यावा यासाठी प्रार्थना करत होते.
 
सुजीत सुखरूप बाहेर पडेल असा विश्वास तामिळनाडू चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत तसंच अभिनेते आणि राजकारणी कमल हासन यांनी व्यक्त केला होता.
 
सुजीतसाठी मी प्रार्थना करतो आहे. आईवडिलांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं, असं रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
बोअरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. याबद्दल कमल हासन यांनी चिंता व्यक्त केली. सुजीत सुखरुपपणे बाहेर यायला हवा. बोअरवेल उघडी सोडणाऱ्या लोकांना प्रचंड दंड व्हायला हवा असं ते म्हणाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments