Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार की सुप्रिया सुळे: शरद पवार यांचा राजकीय वारसदार आता कोण?

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (10:44 IST)
मयुरेश कोण्णूर
24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला कौल मिळाल्यानंतर शिवसेनेनं अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली.
 
मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना-भाजपची युती तुटली आणि नंतर सरकार स्थापण्यासाठी, आकडे जमवण्यासाठी अतर्क्य राजकीय डाव पडायला सुरुवात झाली.
 
दरम्यान, निकालानंतर 'राष्ट्रवादी'नं, विशेषत: शरद पवारांनी, भाजपाच्या अश्वमेधाला बहुमतापासून कसं लांब ठेवलं, याच्या कौतुकवजा चर्चा झडत होत्या.
 
निकालानंतर दोनच दिवसांनी दिवाळी होती. भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या काटेवाडीतल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसमध्ये पवारांचा सगळा परिवार जमला होता. यापूर्वी पवार कुटुंबीयांच्या कौटुंबिक कार्यक्रमात माध्यमांना असा मुक्त प्रवेश क्वचितच दिला गेला असेल. पण हे वर्षं अपवाद होतं.
 
सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची भाऊबीज सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली. दोघे एकत्र मुलाखतीही देत होते. असा एकत्र परिवार पाहून राजकीय पटलावर महिनाभरापेक्षाही कमी कालावधीत काय घडणार आहे, याची कुणाला यत्किंचितही कल्पना आली नसेल.
 
त्या दिवशी एका वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रिया सुळे अजित पवारांना त्यांच्या आवडीचं गाणं गायचा आग्रह धरला. 'नको, नको' म्हणत अजित पवारांनी त्यांच्या आवडीच्या दोन ओळी गुणगुणल्या... "मेरे दिल में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं...."
 
त्यांच्या मनात खरंच काय आहे, हे तेव्हा लगेच नाही समजलं, पण महिन्याभरातच समजलं. अजित पवार यांनी आपल्याच 'राष्ट्रवादी'विरुद्ध बंड केलं, पवर कुटुंबात उभी फूट पाडली.
 
अजित पवारांच्या या बंडानं अनेक प्रश्नांचं मोहोळ तयार झालं आहे. त्यातला एक प्रश्न गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला रुंजी घालतो आहे. तो म्हणजे शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण? या प्रश्नाला आता उत्तर मिळालं आहे का?
 
जर अजित पवारांचं हे बंड अंतिम असेल आणि त्यांचे परतीचे सगळे दोर कापले गेले असतील, तर सुप्रिया सुळे याच शरद पवारांच्या वारसदार आहेत, हे उत्तर मिळालं आहे का? हेच उत्तर असेल तर त्या आता मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार आहेत का?
 
सुप्रिया सुळेंचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्यानं निर्णय?
पवारांचा राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना यापूर्वी असंख्य वेळा विचारला गेला आहे. शरद पवारांनी कायम त्याला उत्तर हेच दिलं आहे, की अजित पवारांना राज्याच्या राजकारणात रस आहे त्यामुळे ते विधानसभेत आहेत. सुप्रिया सुळेंना देशाच्या, महिलांच्या, शिक्षणाच्या प्रश्नात रस आहे म्हणून त्या संसदेत आहेत. वारसदाराचा राजकीय प्रश्न पक्ष आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊ नये म्हणून केलेली ही रचना आहे, असंच याकडे पाहिलं गेलं.
 
शनिवारी (23 नोव्हेंबर) अजित पवारांच्या बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जेव्हा त्यांना विचारलं, की सुप्रिया सुळेंचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत आलं म्हणून अजित पवारांनी हा निर्णय घेतला का, तेव्हा पवार यांनी म्हटलं,"सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे आणि राष्ट्रीय राजकारणातच त्यांना रस आहे."
अजित पवार तर कायम मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतेच, पण महाराष्ट्रात सुप्रिया सुळे याही पर्याय म्हणून चर्चेत राहिल्या. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न फेब्रुवारी 2018 मध्ये 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, "का आवडणार नाही? कोणत्या भावाला आपली बहीण मुख्यमंत्री झालेली आवडणार नाही?"
 
याच मुलाखतीत वारसा हक्कावरून इतर कुटुंबांमध्ये झालेल्या वादाच्या संदर्भानं त्यांनी असंही म्हटलं होतं, की "बाकीच्यांमध्ये जे झालं ते पवारांमध्ये होणार नाही, हा या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो."
 
 
राजकीय वारसदार घरातलाच हवा?
"प्रथमदर्शनी पाहता अजित पवार की सुप्रिया सुळे, या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं आहे, कारण आता फक्त सुप्रिया सुळे आहेत. पण वारसदार कोण, या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे असं मला वाटत नाही," असं मत अनेक वर्षं अजित पवारांचं राजकारण जवळून पाहणारे 'न्यूज 18 लोकमत'चे पत्रकार अद्वैत मेहता यांनी व्यक्त केलं.
 
ते सांगतात, "शरद पवारच एकदा म्हणाले होते, की राजकीय वारसदार हा घरातलाच असायला पाहिजे असं नाही. याचाच अर्थ तो बाहेरचाही असू शकतो. पण आता त्यासाठी जी नावं दिसताहेत त्यात घरातली नावं म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार. बाहेरचे म्हणजे जयंत पाटील ज्यांच्यावर पवारांचा विश्वास आहे. पण राजकारण आता कोणत्या दिशेला जातं यावरही हा वारसाहक्क ठरेल.
 
"दुसरीकडे, अजित पवार हे खरंच शरद पवारांचे फर्स्ट चॉईस होते का, हा प्रश्नही आपल्याला विचारावा लागेल, कारण अजितदादांच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील यांची निवड केलेली दिसते. अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना आमदारांचं बळ दाखवूनच ते पद आपल्याकडे ओढावं लागलं. त्यावेळी अजित पवारांना आपण शरद पवारांचे वारसदार नाही, याची कदाचित जाणीव झाली असावी. आता शरद पवार राष्ट्रवादीकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद घेत नव्हते आणि फक्त दोन आमदार अधिक घेत असलेल्या शिवसेनला मुख्यमंत्रिपद देत होते, हाच माझ्या मते ट्रिगर पॉईंट होता," असं अद्वैत मेहता सांगतात.
 
'पण वारसदाराचा प्रश्न उरतोच'
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते आता राष्ट्रवादीमधला 'अजित की सुप्रिया?' हा प्रश्न निकालात निघाला आहे. "या पक्षांतर्गत संघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. सुप्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
"दुसरीकडे रोहित पवार यांचं नाव पुढे येतं आहे. पण माझ्या मते त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. विधिमंडळाचं कामकाज, पक्षाचं काम याचा त्यांना अनुभव घ्यावा लागेल," चोरमारे पुढे सांगतात.
 
सध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यात वारसाहक्काचा प्रश्न येणार नाही असंही चोरमारेंना वाटतं. "हा प्रश्न लगेच येणार नाही. सध्या सगळी सूत्रं शरद पवारांच्या हातात आहेत आणि जयंत पाटील हेच गटनेते, प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका वठवतील. सुप्रिया सुळे आता जरी उपस्थित असल्या तरीही तूर्तास त्या दिल्लीतच लक्ष केंद्रित करतील. जर 'महाविकास'आघाडीच्या सरकारची शक्यता निर्माण झाली आणि मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं ठरलं तर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव येऊ शकतं," असं चोरमारे यांनी म्हटलं.
 
ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अनेक वर्षं शरद पवारांचं राजकारण जवळून पाहत आहेत. त्यांच्या मते आता सुप्रिया की अजित पवार हा प्रश्न उरलेला नसला तरीही वारसदार हा लोकांनीच ठरवायचा असतो.
 
"पवारांनीही आपलं हे मत बोलून दाखवलं आहे. कुणाचं नाव पुढे केलं तरी लोक त्यांना स्वीकारतील का, हाही एक प्रश्न असतोच. त्यामुळे लोकांना काय अपील होतं हेही पहावं लागेल. कुटुंब आणि पक्षासोबतच राजकीय वारसदारी, हा एक प्रश्न असतो. ती राजकीय कार्यानं मिळते. राहुल गांधींना सोनियांनी उत्तराधिकारी म्हणून निवडलं. काय झालं हे आपण पाहतो. राज हे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार आहेत, असं सगळ्यांना वाटायचं. पण उद्धव यांना जरी वारसाहक्कानं शिवसेना मिळाली तरीही त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करावं लागलं. त्यामुळं राजकीय वारशासाठी कुणालाही कर्तृत्व दाखवावं लागेल," प्रताप आसबे म्हणतात.
सुप्रिया सुळे यांनी रविवारी हा फोटो शेअर केला होता
जेव्हापासून नव्या राजकीय समीकरणांसाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून सुप्रिया सुळे त्यात सहभागी आहेत. दिल्लीतल्या बैठकांमध्ये त्या होत्या. अजित पवारांचं बंड झाल्यानंतर दिवसभर ज्या घडामोडी मुंबईत झाल्या, पत्रकार परिषद झाली, त्यात त्या सतत शरद पवारांसोबत होत्या. अजित पवारांना परत येण्याचं भावनिक आवाहन करण्यापासून ते त्यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सतत चर्चेत राहिलं.
 
दुसरीकडे अजित पवारही ट्विटरवरून 'आपण अद्याप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत आणि शरद पवार हेच आपले नेते आहेत,' हेही सांगताहेत. जरी थोरल्या पवारांनी त्यावर लगेच "अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे," असं ट्वीट केलं असलं, तरी राजकारणात कुठलीही शक्यता नाकारता येत नाही.
 
त्यामुळे रस्ते बदललेले दिसत असले तरीही राजकीय वारशाचा प्रश्न चर्चेत राहणार आहे. तूर्तास सूत्रं शरद पवारांच्या हाती आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments