Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा 2019: अमित शाह गांधीनगर रोडशो मध्ये उद्धव ठाकरे यांनी केला विरोधकांवर हल्ला

Webdunia
शनिवार, 30 मार्च 2019 (12:04 IST)
भाजप आणि शिवसेना एकत्र आले म्हणून विरोधकांना पोटशूळ होतोय, पण विरोधकांच्या पोटदुखीचा इलाज हा अमित शाहांकडे आहे, माझ्याकडे आहे पण सर्वांत मुख्य म्हणजे तुम्हा मतदार लोकांकडे आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये म्हणाले.
 
भाजप अध्यक्ष अमित शाह गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप शनिवारी अर्ज भरत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष गांधीनगरमध्ये आले आहेत, तिथे अर्ज भरण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या रोडशोमध्ये भाषण केलं.
 
तेव्हा शिवसेना आणि भाजप हे गेली कित्येक वर्षं सोबत आहेत, याची आठवण उद्धव यांनी करून दिली. यावेळी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादलसुद्धा गांधीनगरमध्ये उपस्थित आहेत.
 
"शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष राजकारणात अस्पृश्य होते त्या काळात आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. आता आमच्यात काही मतभेद झाले पण आता ते दूर झाले आहेत. आमचे विरोधक एकमेकांशी हस्तांदोलनसुद्धा नीट करू शकत नाहीत. आमचे केवळ हातच जुळले नाहीत तर आमची मनं जुळली आहेत," असं ते म्हणाले.
 
"अमित शाह आपल्याला भेटायला आले. आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षातील मतभेद दूर झाले. आमचे विचार, नेता आणि एकच ध्येय आहे. विरोधी पक्षांचा नेता कोण आहे. शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. आमचे विचार आणि हृदय जुळले आहे."
 
"विरोधी पक्षांचे विचार जुळत नसले तरी ते एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षाची हिंदुत्त्वाची एकच भूमिका असून आता आम्ही एकत्र आलो आहोत. मी इथं भाजप अध्यक्ष अमित शाह यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. काही जणांना आश्चर्य वाटत असेल," असं ठाकरे म्हणाले.
 
'NDA एकसंध आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न'
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ही जागा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची होती. अमित शाह यांना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणं याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.
 
सध्या शाह गांधीनगरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यांच्याबरोबर भाजपमधील महत्त्वाचे नेते तर आहेतच, शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) महत्त्वाच्या घटक पक्षांचे नेते तिथे उपस्थित आहेत. म्हणजे भाजपमधून राजनाथ सिंह, नितीन गडकरी इत्यादी नेते तर आहेतच, त्याशिवाय, NDAतील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. पण महाराष्ट्रासाठी सर्वांत लक्षवेधी उपस्थिती आहे ती म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची.
 
गांधीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये चार किलोमीटरचा रोडशो करत आहेत. त्यानंतर दुपारी 1वाजून 20 मिनिटांनी त्यांना अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे.
 
NDA एकसंध आहे, हे दाखवण्याबरोबर अमित शाह यांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर ठसवण्याचा हा प्रयत्न आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
 
उद्धव ठाकरे यांच्या नियोजित उपस्थितीवर लगेचच राज्यात राजकीय पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी यावर ठाकरेंवर "अफजल खानाच्या शामियान्यात जाऊन मुजरा करण्याची वेळ का आली?" अशी टीका केली.
 
शिवसेनेने भाजपवर चौकटीबाहेर टीका केली होती, त्यामुळे अशी टवाळी शिवसेनेला सहन करावी लागेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी नोंदवलं. "एकाच बोटीतील सहप्रवासी असल्याने अमित शाह यांच्या अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे जात आहेत, हे चांगलं आहे. भाजपलाही आपण घटकपक्षांना सोबत घेत आहोत, हा संदेश द्यायचा आहे. भाजपने स्वबळावर सत्ता येऊ शकली नाही तर योजनाकारांना सोबत घेण्याचं नियोजन आधीपासून झालेलं आहे."
 
"पश्चिम महाराष्ट्रातील बरेच नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. जर भाजप आणि शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेतून बरेच नेते भाजपमध्ये गेले असते. भाजपच्या बाजूने असलेला सुप्त प्रवाह शिवसेनेने ओळखलेला असू शकतो. शिवाय राम मंदिराचा मुद्दा उचलून हिंदुत्वापासून दूर नाही," असं त्या म्हणाल्या.
 
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे की तुम्ही आमचा मैत्रीचा धर्मही पाहिला. आमच्यातील गैरसमज होते ते दूर झाले आहेत. युतीच्या बैठका आणि पत्रकार परिषदा सातत्याने होत आहेत. विरोधकांना आमच्या युतीबद्दल असूया वाटत आहे, असं दिसतं."
 
धनंजय मुंडे यांची टीका दखलपात्र नाही, असं त्या म्हणाल्या. "एकतर त्यांना स्मृतिभ्रंश झाला असण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर किती गुन्हे नोंद आहेत आणि कितीवेळा त्यांनी अटकपूर्वी जामीन घेतला आहे? त्यांच्या जिल्ह्यातील महिला सुरक्षेची परिस्थिती काय आहे? एकूणच त्यांची टीका द्वेषातून आहे."
 
भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले, "शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर गेली 30 वर्षं एकत्र आहेत. दोन्ही पक्षांत मतभेद झाले पण मनभेद कधीच नव्हते. जेव्हा विधानसभा विरोधात लढवली तेव्हाही आम्ही केंद्रात एकत्र होतो. काही वाद होते, पण आम्ही त्यावर तोडगा काढला आहे.
 
"आमच्या विरोधातील महागठबंधनमधील पक्ष 350 जागांवर एकमेकांच्या विरोधात लढत आहे. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घटक पक्षांतील नेते उपस्थित असणे यातून सकारात्मक संकेत दिला जाणार आहे," असं ते म्हणाले.
 
आणि फक्त उद्धव ठाकरेच नाही, शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल आणि लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान हे सुद्धा यावेळी गांधीनगरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
 
याविषयी पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार जगतार सिंग म्हणाले, "भाजपची अल्पसंख्याकातील प्रतिमा फारशी चांगली नाही. अशावेळी प्रकाशसिंग बादल यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना बरोबर घेतलं तर पंजाबमध्ये चांगला संदेश देईल, असं भाजपला वाटतं. शिवाय मोदी आणि शाह यांची स्वीकार्हता बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे."

संबंधित माहिती

एक्सप्रेस वेवर भाविकांनी भरलेल्या चालत्या बसला आग, आठ जण जिवंत जळाले

World AIDS Vaccine Day 2024:विश्व एड्स वैक्सीन दिवस आज,इतिहास, महत्व जाणून घ्या

International Museum Day 2024: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन का साजरा करतात ,इतिहास आणि महत्व जाणून घ्या

IPL 2024: अभिषेक शर्मा IPL 2024 मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारणारा फलंदाज

Russia Ukraine Crisis:पुतिन म्हणाले – खार्किव ताब्यात घेण्याची योजना नाही

पुढील लेख
Show comments