Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असद दुर्रानी : माजी ISI प्रमुखाचे भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'शी संबंध आहेत का?

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:52 IST)
शहजाद मलिक
बीबीसी उर्दू, इस्लामाबाद
 
पाकिस्तानातली गुप्तचर संस्था 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स' (आयएसआय) चे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल असद दुर्रानी यांनी आपलं नाव एग्झिट कंट्रोल लिस्ट (इसीएल)मधून काढण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या अर्जावर इस्लामाबादच्या हायकोर्टात उत्तर दिलं आहे.
 
या उत्तरात म्हटलं आहे की, "माजी आयएसआय प्रमुख 2008 पासून भारतीय गुप्तचर संस्था रॉ च्या संपर्कात आहेत."
 
यात असंही म्हटलं आहे की, "असद दुर्रानी देशविघातक कारवायांमध्ये सहभागी आहेत."
 
संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव इसीएलमधून काढता येऊ शकत नाही. याच कारणामुळे ते देश सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत.
 
असद दुर्रानी यांनी भारतीय गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्यासह एक पुस्तक लिहिलं होतं हे विशेष. पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकात पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मजकुरही होता.
 
पाकिस्तानच्या सरकारने 29 मे 2018 मध्ये माजी आयएसआय प्रमुखांचं नाव या यादीत समाविष्ट केलं होतं. याच्या विरोधात दुर्रानी यांनी इस्लामबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
 
दुर्रानी यांच्याबद्दल पाकिस्तानचं संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?

27 जानेवारीला इस्लामाबादच्या हायकोर्टात दाखल केलेल्या उत्तरात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की असद दुर्रानी यांनी रॉच्या माजी प्रमुखांसोबत पुस्तकाचं सहलेखन करून अधिकृत गोपनीयता कायद्याचा भंग केला आहे. या गुन्हासाठी सैनिकी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते.
 
यात 1952 च्या सैन्य अधिनियमाचा उल्लेख आहे ज्यानुसार कोणतीही व्यक्ती जर देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असेल तर या नियमाच्या अनुच्छेद 2D नुसार त्या व्यक्तीचं कोर्टमार्शल होऊ शकतं.
 
यात असंही म्हटलं होतं की जर कोणी व्यक्ती अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असेल, किंवा त्या व्यक्तीपासून राष्ट्राला धोका असेल तर अशा व्यक्तींचं नाव कोणतीही पुर्वसुचना न देता देश न सोडता येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत टाकता येण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. अशा व्यक्तींच्या देश सोडण्यावर बंदी घालता येईल.
 
दुर्रानी यांच्याबद्दलचा तपास अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता त्यांचं नाव इसिएलमधून काढता येणार नाही असंही यात म्हटलं आहे.
 
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की याचिकाकर्त्यांचा देशबाहेर जाण्याचा उद्देश 'आंतरराष्ट्रीय संमेलनात भाग घेणं तसंच टॉक-शो मध्ये सहभागी होणं' हा आहे. अशाने देशाच्या सुरक्षेला बाधा पोहचू शकते.
 
असद दुर्रानी यांच्या याचिकेवर पुढची सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल.
 
कोर्टाने सरकारला निर्देश दिले की त्यांनी याचिकाकर्त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातले ते उतारे कोर्टात सादर करावेत जे सरकारच्या दुष्टीने 'राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणतात.'
 
असद दुर्रानी यांचं म्हणणं काय?

गेल्यावर्षी बीबीसीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये असद दुर्रानी यांनी म्हटलं होतं की, "जोवर कोणत्याही पुस्तकावर वाद होत नाही तोवर काय फायदा. मग ते एकप्रकारच सरकारी लेखनच झालं. तुम्हाला तर वाद निर्माण करायचे आहेत म्हणजे प्रतिवाद होतील."
 
देशाच्या गोपनीय गोष्टी जाहीर केल्या या आरोपावर उत्तर देताना ते म्हटले होते की, "गोंधळ तर खूप झाला, पण आजपर्यंत कोणी हे सांगू शकलं नाही की या पुस्तकात देशाच्या गोपनियतेला हानी पोहचेल अशा कोणत्या गोष्टी आहेत. अधिकृत गोपनीयता अधिनियमाखाली कोणावरही खटला दाखल करणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. ज्या गोपनीय गोष्टी होत्या त्याही लपलेल्या नव्हत्या. कधी कोणी इकडून त्याविषयी बोलायचं, कधी तिकडून. मला वाटतं मी माझं विश्लेषण करून जणू काही शेपटीवरच पाय दिला आहे. मी फक्त या आधारावर परिस्थितीचं विश्लेषण केलं की त्याजागी मी असतो तर काय केलं असतं."
 
"सैन्यात तर अनेकांनी पुस्तकं लिहिली आणि त्यांना कोणी विचारलं नाही की काय लिहिलं आहे," असंही ते पुढे म्हणाले.
 
"मला रिटायरमेंटच्या वेळी तत्कालीन आर्मी चीफ जनरल वहीज काकड यांनी सांगितलं होतं की तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे की काय लिहायचं आणि काय नाही. तत्वतः तुम्हीच स्वतःचे सेन्सॉर आहात."
 
कोण आहेत असद दुर्रानी?

80 वर्षीय असद दुर्रानी पाकिस्तानी सैन्यातले निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत. त्यांना 1988 साली सैन्य गुप्तचर महासंचालक या पदावर नियुक्त केलं गेलं होतं. 1990 साली त्यांना आयएसआयचे महासंचालक म्हणून नियुक्ती मिळाली.
 
1993 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जर्मनी आणि सौदी अरबमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम केलं.
 
असद दुर्रानी नेहमीच वादांच्या भोवऱ्यात सापडले मग ते त्यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांमधली माहिती असो वा ओसामा बिन लादेनवर केलेलं त्यांचं वक्तव्य. याला ते आपलं 'विश्लेषण' म्हणतात.
 
स्पाय क्रॉनिकलचे लेखक असद दुर्रानी यांना 1990 मध्येच सैन्यातून बेदखल केलं होतं. असगर खान केसमध्ये त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांना आयएसआयमधून जीएचक्यूला बोलावलं गेलं. त्यानंतर समोर आलं की त्यांचा राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप आहे तेव्हा त्यांना वेळेआधीच निवृत्ती दिली गेली.
 
'ऑनर अमंग स्पाईज' या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरही ते चर्चेत आले. हे पुस्तक त्यांचं पहिलं पुस्तक 'स्पाय क्रॉनिकल्स' चा पुढचा भाग आहे.
 
ते 1990 च्या काळात पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारविरोधात इस्लामिक जम्हूरी इत्तेहाग स्थापन झाल्यानंतर जो खटला चालला त्यातही सहभागी होते. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांना लाच दिल्याचं मान्य केलं होतं.
 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments