Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबासाहेब पुरंदरे: शिवचरित्र लोकांपर्यंत नेताना वादात सापडलेले 'शाहीर’

Webdunia
गुरूवार, 29 जुलै 2021 (15:13 IST)
तुषार कुलकर्णी
(बाबासाहेब पुरंदरे हे आज शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्या निमित्त हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)
 
'जर 125 वर्षांचं आयुष्य मिळालं तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल,' असा म्हणणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना भारत सरकारनं पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल वाटणारा आनंद शब्दांत न सांगता येण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
बाबासाहेब पुरंदरे यांना गेली अनेक दशके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवचरित्र नेण्याचे श्रेय त्यांना दिलं जातं. पण अनेक प्रसंगी त्यांना विरोध झाला आहे, त्यांच्या कामावर टीकाही झाली आहे.
 
बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचं नातं अतूट आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना "शिवशाहीर" म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणतात की "मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा."
 
"शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे," असं बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे चरित्रकार सागर देशपांडे यांना सांगितलं होतं. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर 'बेलभंडारा' हे पुस्तक लिहिलं आहे.
 
बाबासाहेब पुरंदरे यांनी लेखकाला सांगितलेल्या आठवणी तसंच पुरंदरेंच्या सहकाऱ्यांशी आणि नातेवाईकांशी बोलून देशपांडे यांनी हे चरित्र लिहिलं आहे.
 
बळवंत मोरोपंत पुरंदरेंचा जन्म 29 जुलै 1922ला झाला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकांवर हेच नाव असायचं, पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.
 
लहानपणी वाढदिवसाला एखादं खेळणं, खाऊ किंवा फार फार तर आवडतं पुस्तक भेट म्हणून मिळावं, म्हणून अनेक जण हट्ट करतात. पण पुरंदरेंनी आपल्या आठव्या वाढदिवसाला वेगळाच हट्ट आपल्या वडिलांकडे केला. तो म्हणजे सिंहगड पाहायचा आहे.
 
या हट्टाला काय उत्तर द्यावं, त्यांच्या वडिलांना कळेना. पण त्यांनी त्यांचा हट्ट पुरवला. त्यांनी आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या कथा त्यांच्यासमोर जिवंत झाल्या, अशी आठवण 'बेलभंडारा'मध्ये आहे.
 
एका मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शाळेत त्यांनी भाषण दिलं होतं. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना छातीशी धरलं आणि म्हटलं, "खूप अभ्यास कर आणि खूप मोठा हो."
 
"तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा संदेश आपण आपल्या मनावर कोरला आहे," असं बाबासाहेब सांगतात. त्यांनी आतापर्यंत शिवचरित्राबरोबरच 50 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.
 
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्यांना विरोध करणाऱ्यांनी 'महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू' असा इशारा दिला आहे.
 
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हीडिओद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानाचा विरोध केला आहे.
 
"या निर्णयामुळे शिवभक्तांच्या भळभळत्या जखमांवर सरकारनं मीठ चोळलं आहे. दर दोन चार वर्षांनी इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचा सन्मान केला जातो," असा आरोप त्यांनी केला आहे.
 
तसेच सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण 'महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू', असंही आव्हाड या व्हीडिओमध्ये म्हणाले आहेत.
 
'सर्वांत लोकप्रिय संशोधक'
पुण्याचे इतिहासकार मंदार लवाटे सांगतात, "सात दशकांहून अधिक काळ त्यांनी शिवचरित्र लोकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे. पहिल्यांदा ते 1941 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांचं इतिहास संशोधनाचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
 
"बाबासाहेब पुरंदरे हे संशोधक आहेत, यात संशयच नाही, पण त्याच बरोबर त्यांनी इतिहास सामान्यांना वाचता येईल, अशा भाषेत लिहिला. इतका अभ्यास आणि विशिष्ट भाषाशैली असलेली काही मोजकी उदाहरणं आहेत या क्षेत्रात होऊन गेली. जसं की सेतूमाधवराव पगडी किंवा य. न. केळकर. त्यांच्याप्रमाणेच पुरंदरे देखील आहेत."
 
"त्यांच्या इतका लोकप्रिय संशोधक किंवा इतिहासकार मी तरी पाहिला नाही. पानटपरीवर सुद्धा त्यांचे फोटो लावलेले मी पाहिले आहेत. जितका लोक त्यांचा आदर करतात तितका आदर ते लोकांचा करतात. लहान मुलाला देखील ते आहो-जाहो करतात. कधी कुणाला नावं ठेवत नाही, फक्त लोकच त्यांच्यावर प्रेम करतात असं नाही त्यांचं देखील तितकंच प्रेम समाजावर आहे," असं लवाटे सांगतात.
 
'त्यांचं व्याख्यान ऐकून मी शिवमय झाले होते'
कथाकथन, व्याख्यान, नाटक, 'जाणता राजा' हे महानाट्य, पुस्तकं, विविध मालिकांसाठी संहिता लेखनात मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवलं. त्यांच्या व्याख्यानांना हजर राहणारे लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात.
 
"मी तेव्हा 23-24 वर्षांची असेल जेव्हा मी त्यांच्याकडून रायगडवर शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं. ऐकताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले. ते अत्यंत पोटतिडकीनं सांगतात. ते चरित्र ऐकून मी शिवमय होऊन गेले," असा अनुभव नाट्य दिग्दर्शक पद्मश्री राव सांगतात.
 
"शिवचरित्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं, त्यासाठी ते वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करतात. 97 व्या वर्षांतही ते तरुणांना लाजवेल या उत्साहाने काम करतात. आता जरी तुम्ही त्यांच्या घरी गेला तर ते वाचत बसलेले तुम्हाला आढळतील. त्यांना नवीन शिकण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर जे आपल्याला समजलं ते इतरांना समजावं, नवीन अभ्यासक, नवीन इतिहासकार तयार व्हावे असं त्यांना खूप वाटतं. त्यामुळे ते तरुणांना प्रोत्साहन देतात, त्यांना मदत करतात आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे ते त्यांच्या कार्याला आशीर्वाद देतात," असंही राव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
 
राव या 'शिवरुद्राचं दिग्विजयी तांडव' या नाटकाच्या दिग्दर्शक आहेत. "ज्या वेळी या नाटकाची संहिता आम्ही पुरंदरेंना दाखवली तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की हे नाटक लवकरच रंगमंचावर यायला हवं. त्यांनी जे प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले ते फार महत्त्वाचे वाटतं," राव सांगतात.
 
इतिहास संशोधनाची पद्धत
'गणगोत'मध्ये पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात, "इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे."
 
त्यांच्या इतिहास संशोधनाच्या पद्धतीबद्दल मंदार लवाटे सांगतात "त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेला बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते 'हार्ड कोअर' संशोधक आहेत पण शास्त्रीय पद्धतीने ते लिहिलं तर ते मोजक्या अभ्यासकापुरतंच मर्यादित राहतं असं त्यांना वाटतं म्हणून ते त्यांचा अभ्यास रंजक पद्धतीने मांडतात."
 
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद
2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.
 
'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला', हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. "बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही," असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात.
 
त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.
 
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती.
 
'सरकारचा निर्णय संशयास्पद'
बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय म्हणजे 'निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक केलेलं कार्य आहे,' असं मत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.
 
बीबीसी मराठीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "लोक चिडले पाहिजेत, वाद निर्माण झाले पाहिजेत असा हेतू हा पुरस्कार देण्यामागे असावा. राजाशिवछत्रपती हा इतिहास नसून ती कादंबरी आहे. इतिहासाची उपलब्ध पुस्तकं असताना त्यांनी राजाशिवछत्रपतीसाठी त्यांचा वापर केला नाही. 'राधामाधवविलासचंपू', 'बुधभूषण', 'शिवभारत', 'जेधेशकावली' यांसारखी पुस्तकं आणि इतर पत्रव्यवहार उपलब्ध असूनही त्यांचा वापर या पुस्तकासाठी केला नाही. तसंच जेम्स लेनच्या लिखाणासाठी पूरक असं वातावरण त्यांनी तयार केले.
 
"जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्यावेळेस राज्यभरात आम्ही 28 शिवसन्मान परिषदा घेतल्या होत्या. परंतु इतकं होऊनही पुन्हा त्यांना पुरस्कार देणं म्हणजे विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा दिल्यासारखं मला वाटतं," असं गायकवाड म्हणाले.
 
त्यांना स्वतःला काय वाटतं?
बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे इतर लोकांनी वाद केलेले आपल्याला दिसतील. पण ते स्वतःहून कोणत्या वादात अडकले, असं दिसत नाही. त्यांच्यात एक अलिप्तपणा आहे. स्वतःच्या कार्याकडे ते एका वेगळ्या दृष्टीने पाहतात असं वाटतं.
 
ते स्वतःच्या कार्याबद्दल 'बेलभंडारा'मध्ये सांगतात, "मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे."
 
पद्मविभूषण मिळाल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिलं, "छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments