Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (20:55 IST)
सचिन परब
मुक्त पत्रकार
 
आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
 
'प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांनी आपली धर्मपत्नी रमाबाईंना चार मुली झाल्यानंतर विचारलं, 'काय हो, आपल्या शेतात ज्वारी बाजरीच पिकते काय? गहू पिकतच नाही!' आणि 23 जानेवारी (1926) रोजी रमाबाईंनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
 
त्यानंतर केशवराव नि रमाबाई या दोघांनीही हे बाळ जगदंबेच्या ओटीत ठेवले नि म्हणाले, हे बाळ तुझं. तुझ्या स्वाधीन केलंय ! म्हणून त्या बाळाचं नाव बाळ असं ठेवलं…'
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दोन शपथा घेतल्या होत्या. एक निवडणूक लढवणार नाही. दुसरी आत्मचरित्र लिहिणार नाही. त्यानुसार त्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यामुळे आपल्याला बाळासाहेबांना आयुष्यभर सावलीसारखे सोबत करणारे भाऊ श्रीकांतजी ठाकरे यांच्या आत्मचरित्रात बाळासाहेबांचं बाळपण शोधावं लागतं.
 
श्रीकांतजींचं आत्मचरित्र `जसं घडलं तसं` यामध्ये आत्मचरित्रासारखा सविस्तर पट सापडत नाही. त्यात गोष्टीवेल्हाळ आठवणीच आहेत. त्यातल्या बाळासाहेबांविषयी लिहिलेल्या प्रकरणाच्या सुरुवातीला ज्वारी-बाजरी आणि गव्हाची गंमत सांगितलीय.
 
कष्टातलं बालपण
बाळासाहेब जन्मले तो काळ समजून घ्यायला मात्र प्रबोधनकारांचं आत्मचरित्र `माझी जीवनगाथा` तपासावं लागतं. बाळासाहेबांच्या जन्माच्या वेळेस प्रबोधनकार 41 वर्षांचे होते. सत्यशोधकी ब्राह्मणेतर आंदोलनातले आघाडीचे विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, नाटककार, व्याख्याते म्हणून ते महाराष्ट्रभर परिचित होते.
 
`प्रबोधन` हे नियतकालिक सुरू होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला होती. `प्रबोधन`साठी त्यांनी सरकारी नोकरी सोडलेली होती. सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या दहा वर्षांचा तुलनेने स्थैर्याचा काळ वगळता, त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि अस्थिरतेचा फेरा कधी चुकला नाही.
 
`प्रबोधन`नंतर तर प्रबोधनकारांचा ब्राह्मणी जातवर्चस्ववादाच्या विरोधातला पवित्रा अधिक अधोरेखित झाला. तत्कालीन सामाजिक परिस्थितीत ही भूमिका पदराला जळता निखारा बांधून घेतल्यासारखीच होती. त्यात प्रबोधकारांचा स्वाभिमानी, तापट आणि फटकळ स्वभाव. त्यामुळे पाचवीला पुजलेली फरफट अधिक तीव्र झाली.
 
त्यांचं बिऱ्हाड कधी दादर तर कधी भिवंडी, कधी सातारा तर कधी धुळे असं फिरतीवर होतं. `खरा ब्राह्मण` सारखी नाटकं सादर करणारी त्यांची नाटक कंपनी असल्यामुळेही ही अस्थिरता वाढली होती. अशाच धावपळीत पुणे मुक्कामी बाळासाहेबांचा जन्म झाला.
 
'जगदंबेच्या ओटीत टाकलेला बाळ' ही बाळासाहेबांच्या बाळ या नावाशी श्रीकांतजी सांगत असलेली दैवी कहाणी प्रचलित असली, तरी विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्वाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे 'बाळ' या नावाची एक वेगळीच गोष्ट सांगतात.
 
बाळ हे नाव प्रबोधनकारांनी छत्रपती शिवरायांचे जवळचे सहकारी बाळाजी आवजी यांच्यावरून ठेवलं असावं, असा कयास ते मांडतात. बाळाजी आवजी स्वराज्याचे चिटणीस होते. स्वराज्याच्या कारभाराची मुहूर्तमेढ रचण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
 
पुढे पेशवाईतील ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या दुराग्रहाच्या विरोधात लढा देणाऱ्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा अभिमान म्हणून ते प्रबोधनकारांच्या साहित्यात अधूनमधून सापडतात. बाळासाहेबांच्या नावाची ही जोड प्रबोधनकारांच्या मानसिकतेची जडणघडण समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरते.
 
'पैशांना महत्त्व नाही'
आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी प्रबोधनकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठराविक रक्कम पत्नी रमाबाईंना आणून देत, असं ते `माझी जीवनगाथा`मध्ये सांगतात. त्याला ते गमतीने खंडणी असं म्हणत. पण ती रक्कम पुरेशी नसावी.
 
`ठाकरे फॅमिली` या पुस्तकात ज्ञानेश महाराव यांना दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब त्यांच्या बाळपणाविषयी सांगतात, `दादा (प्रबोधनकार) सतत फिरतीवर असल्यामुळे घरात कमीच असायचे. आईची खूप ओढाताण व्हायची. आमच्या फिया तुंबल्यात, पुस्तकं पाहिजेत, कपडे पाहिजेत या साऱ्याला तिलाच तोंड द्यावं लागायचं. पण त्या माऊलीनं अक्षरशः सगळं निभावलं. तिने मडक्यावर स्वयंपाक केलेला मी पाहिलेला आहे. पण कधी तिनं हू की चू नाही केलं. तिनं सगळं भोगलं. पण सुख नाही भोगलं. आज सगळी सुखं आहेत. पण आई नाही आणि दादाही नाहीत.`
 
बाळासाहेबांना चार मोठ्या आणि एक लहान बहीण. दोन छोटे भाऊ. शिवाय एक मोठी बहीण आणि छोटा भाऊ खूप लहानणी वारला. आधीच गरिबी आणि त्यात आईची सतत बाळंतपणं, यामुळे ठाकरे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कधीच स्थिर राहिलं नसणार.
 
रमाबाईंचं बाळंतपण आणि प्रबोधनकारांचं आजारपण यामुळे एकदा तर घर सोडण्याची पाळी ठाकरे कुटुंबावर आली होती. पण पैशांच्या पलीकडे बघण्याचे संस्कार ठाकरे कुटुंबात फार पूर्वीपासून होते. एकटे प्रबोधनकारच नाहीत तर त्यांचे आईवडील आणि आजी आजोबा यांनीही कधी पैशाला फार महत्त्व दिलेलं आढळत नाही.
 
श्रीकांत ठाकरे `ठाकरे फॅमिली` पुस्तकातल्या मुलाखतीतही हेच सांगतात, `दादांसारखे वडील आम्हाला लाभले नसते. तर आम्ही कसे असतो, काय केलं असतं? त्यांनी पैसा नाही ठेवला, तो ठेवला असता तरी त्याचा काय उपयोग झाला असता? कारण त्या संस्कारांनी आम्हाला पैशाच्याही पुढे नेऊन ठेवलंय. उद्याचा विचार करायचा नाही, हा त्यांचा संस्कार आमच्याकडून आजही चांगलं काम करून घेतो.`
 
'फटकाऱ्यां'ची अशी झाली सुरुवात...
प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना बुलबुलतरंग आणून दिला होता. ते वाजवणं काही त्यांना जमलं नाही. बाळासाहेबांना बुलबुलतरंग नाही तर व्यंगचित्रांतून फटाके वाजवता येतील, हे प्रबोधनकारांनीच ओळखलं.
 
`फटकारे` या व्यंगचित्रसंग्रहाच्या सुरुवातीला बाळासाहेबांनी लिहिलेलं एक चार पानी टिपण आहे. त्यात ते सांगतात, `मुळात मी व्यंगचित्रांकडे आकर्षित झालो ते बॅन बेरीच्या व्यंगचित्रांमुळे.
 
बॅन बेरी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात `टाइम्स ऑफ इंडिया`त व्यंगचित्र काढत असत. त्यावेळी आम्ही नुकतेच भिवंडीहून मुंबईला आलो होतो. 1939 चा काळ तो. दादरला मुक्काम होता. दुसरे महायुद्ध सुरू झाले.
 
रोज `टाइम्स`मध्ये मी बॅन बेरींची चित्र पाहात होतो. एक दिवस दादांनी म्हणजे वडिलांनी विचारलं, काय रे काय पाहतोस? मी सांगितलं, ही चित्र पाहतोय. दादांनी विचारलं. आवडलं का? मी म्हणालो, हो आवडलं. दादा म्हणाले, ठीक आहे, आजपासून काढायला लाग. पेन्सिलने काढून ठेव. मी संध्याकाळी आल्यानंतर पाहीन. संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी हात पाय धुवून चहा घेऊन झाल्यावर विचारलं, काय रे काही केलंस का? मी जे केलं होतं ते दाखवलं. त्यांनी त्यात काही सुधारणा सुचवल्या. दादांचा हात चांगला होता. दादा स्वतः चित्रकार होते. दादांनी मला सदैव आधार दिला. प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला ऐन उमेदीच्या काळात माझी व्यंगचित्र प्रसिद्ध झाली, त्यांची कल्पना दादांचीच असायची. त्यामुळे व्यंगचित्रकलेतले माझे पहिले गुरू वडीलच होते.`
 
शिक्षण सुटलं...
आर्थिक गरिबीमुळे प्रबोधनकारांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. पण त्यांनी स्वतःच्या व्यासंगाच्या जोरावर बड्या बड्या डिग्रीवाल्यांनी तोंडात बोट घालावं असं काम करून ठेवलं.
 
हुन्नर कमवा, हा वडिलांकडून शिकलेला मंत्र त्यांनी त्यांच्या मुलांना दिला. त्यामुळे बाळासाहेब नेहमीच्या शिक्षणापेक्षा चित्रांमध्येच रंगले. इंग्रजी सातवी शिकल्यानंतर प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग अचानक बदलला. त्याची घटनाही गंमतीशीर आहे.
 
बाळासाहेब सांगतात, `बाबूराव पेंटर एकदा दादरच्या घरी आले. शतपावली करत होते. माझं एक पेंटिंग भिंतीवर लावलेलं होतं. त्यांना ते आवडलं. दादांना विचारलं, कोणी काढलंय? बाळनं काढलंय, असं दादांनी म्हटल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं नि विचारलं, काय करतोस? मी म्हटलं, मी उद्यापासून जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् ला जाणार आहे. प्रवेश घेतला होता. साठ रुपये फी भरून झाली होती. रंग, ब्रश वगैरे आणून सगळी तयारी झाली होती. ते ऐकून बाबूराव दादांना म्हणाले, अरे, या पोराचा हात चांगला आहे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्याला पाठवून तो फुकट घालवू नको. पाहिजे तर त्याला मी कोल्हापूरला घेऊन जातो आणि चांगला आर्टिस्ट तयार करतो. बाबूरावांमुळे मी स्कूल ऑफ आर्टस् ला गेलो नाही. साठ रुपये फुकट गेले. पण माझा हात वाचला.`
 
बाळासाहेब कोल्हापूरला गेले नाहीत. पण मुंबईत ते वॉल्ट डिस्नेचे सिनेमे पाहू शकले. बाम्बी हा सिनेमा त्यांनी २५ वेळा पाहिला होता. बाळासाहेबांमधल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या कार्टूनिस्टचा पाया प्रबोधनकारांनीच घातला होता.
 
प्रबोधनकार स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांच्या रेषा जोमदार होत्या, असं श्रीकांत ठाकरे सांगतात. ब्राह्मणी सार्वजनिक गणेशोत्सवाला पर्याय म्हणून प्रबोधनकारांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव काढला होता. त्यासाठी देवीच्या अवाढव्य चित्राच्या मागे प्रबोधनकारांनी झेप घेणारा वाघ काढला होता.
 
तो त्यांच्या दोन्ही मुलांना खूप आवडला होता. तो त्यांनी अनेकदा काढला. तोच पुढे शिवसेनेच्या नावात वर्षानुवर्षं झळकत होता. मुळात शिवसेना हे नावही प्रबोधनकारांचंच. तसंच मार्मिक हे नावंही त्यांचंच आणि मातोश्री या ब्रँड झालेल्या ठाकरेंच्या बंगल्याचं नावही त्यांचंच. 'जय महाराष्ट्र' हा शिवसेनेसाठी मंत्र असणारा वाक्प्रचार त्यांच्या चाळीसच्या दशकातल्या पत्रांवर दिसतो.
 
वडिलांचा प्रभाव
बाळासाहेबांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं आणि मराठी बाणाही. या दोन्ही विषयावंर फक्त विचारवंत म्हणून नाही तर कार्यकर्ते म्हणूनही प्रबोधनकार वर्षानुवर्षं राबले होते. पण प्रबोधनकारांचा आणि बाळासाहेबांचा पिंड वेगवेगळा होता.
 
प्रबोधनकारांच्या निधनाआधी काही महिने 17 सप्टेंबर 1973 ला `माझी जीवनगाथा`चं प्रकाशन झालं. त्या कार्यक्रमात प्रबोधनकारांचं अखेरचं भाषण झालं. त्यात त्यांनी सांगितलंय, `माझा नि माझ्या आई वडील, आजी आजोबांचा संप्रदाय वेगळा होता. बाळने आपला संप्रदाय काढलाय. शिवसेना शब्द घेऊन हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्याची झुंज सुरू आहे. ह्या कार्यात तो माझ्या शतपट पराक्रम करील, याचा मला अभिमान वाचतो.`
 
आपल्या मुलाच्या पराक्रमाचा प्रबोधनकारांना अभिमान होताच. त्या पराक्रमाचा पाया त्यांनीच रचला होता. पण त्याचबरोबर त्या दोघांचे संप्रदाय निराळे आहेत हेही त्यांना माहीत होतं. ते बाळासाहेबांनाही माहीत होतं. त्यामुळेच आपण प्रबोधनकारांचा वारसा चालवतोय, असं त्यांनी कधी म्हटलं नसलं तरी त्यांच्या झोपण्याच्या खोलीत त्यांच्या बेडसमोर प्रबोधनकारांचाच फोटो अखेरपर्यंत होता. सकाळी उठल्यावर ते पहिला नमस्कार प्रबोधनकारांनाच करत.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments