Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिनी मुसलमान विद्यार्थी पाकिस्तानात लपूनछपून घेत आहेत इस्लामचे धडे

Webdunia
बावीस वर्षांचा चिनी विद्यार्थी उस्मान (नाव बदललं आहे) हा पाकिस्तानमध्ये राहून धार्मिक शिक्षण घेत आहे.
 
त्याच्या देशामध्ये रमजानच्या महिन्यात रोजे धरणं, पाच वेळा नमाज पढणं किंवा इतर कोणतंही धार्मिक कार्य करणं हे तितकं सोपं नाहीये. मात्र पाकिस्तानमध्ये राहून तो सर्व धार्मिक कर्तव्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडू शकतो.
 
चीनमध्ये मुसलमानांना धार्मिक स्वातंत्र्य नाहीये. गेल्या वर्षीही चीनमध्ये मुस्लिम नागरिकांना रोजे धरण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या अॅमनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेनं या गोष्टीचा निषेध केला असून मुस्लिम राष्ट्रांना याविरोधात आवाज उठविण्याचं आवाहन केलं आहे.
 
उस्मान कराचीतील एका मदरशामध्ये शिक्षण घेत आहे. पाकिस्तानमध्ये परवेझ मुशर्रफ यांची सत्ता असताना मदरशांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानी मदरशांमध्ये परदेशी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.
 
पाकिस्तानच्या केंद्रीय कॅबिनेटनं मदरशांमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याचा निर्णयही घेतला आहे.
 
चिनी विद्यार्थ्यांचा नेमका आकडा उपलब्ध नाही
पाकिस्तानमधील केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या शाळांसाठी माध्यम समन्वयक म्हणून काम करणाऱ्या तलहा रहमानी यांनी सांगितलं, की सध्या देशात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचा नेमका आकडा उपलब्ध नाहीये. कराचीमधील एका मदरशानं आपल्याकडे 25 चिनी विद्यार्थी शिकत असल्याची माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं.
 
उस्मान गेल्या पाच वर्षांपासून कराचीतील एका मदरशामध्ये शिकत आहे. इथे तो कुराण, हदीस, अरेबिक आणि तर्कशास्त्राचा अभ्यास करत आहे.
 
'आपला मुलगा धार्मिक विद्वान बनावा अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. मला लहानपणापासूनच यासंबंधीचं शिक्षण दिलं जात होतं,' असं उस्माननं सांगितलं.
 
चीनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उस्मान कराचीमध्ये पोहोचला. तिथं त्यानं धार्मिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली.
 
उस्मान सांगतो, "चीनमध्ये इस्लाम आणि धर्माचं शिक्षण घेण्याच्या संधी अतिशय कमी आहेत. तिथलं शिक्षण आणि त्याचे विषय हे खूप मर्यादित आहेत. मौलवी साहेब शुक्रवारच्या दिवशीच प्रवचन देतात. त्याशिवाय लोक इंटरनेटच्या मदतीनं धर्माबद्दलची थोडीफार माहिती मिळवतात."
 
पाकिस्तानात इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच चीनहून आलेले विद्यार्थीही धर्मासंबंधीचं मुलभूत शिक्षण घेतात. त्यांच्यापैकी काहीजण एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि आपल्या देशात परत जातात. काही विद्यार्थी मात्र मुफ्ती आणि आलिम (इस्लामी डिग्री) बनतात. काही विद्यार्थी महिन्याभराचे कोर्स करायलाही येतात.
 
मदरशामधून परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी परत जातात आणि काही जण धर्माचं शिक्षण द्यायला सुरुवात करतात.
 
उस्मान सांगतो, "आम्हाला चीनमध्ये धार्मिक शिक्षण हे अतिशय गुप्तपणे द्यावं लागेल. पहिल्यांदा आमच्या घरातल्या व्यक्तिंना धर्माचं शिक्षण देऊ. त्यानंतर जवळच्या नातेवाईकांना. तिथं मदरसा बनवून शिक्षण देणं शक्यच नाहीये."
 
चिनी भाषेचं शिक्षण
कराची विद्यापीठ आणि अन्य खासगी संस्थांप्रमाणेच जामिया बनवरिया अलआलीमिया मदरशातही चिनी भाषा शिकविण्याचं केंद्र सुरू करण्यात आलं आहे.
 
या मदरशाचे व्यवस्थापक आणि धार्मिक विषयातील तज्ज्ञ मुफ्ती मोहम्मद नईम यांचं म्हणणं आहे, की चीनमध्ये अनेक भागांमध्ये सरकार मुसलमानांवर दडपशाही करते. चीनमधील नागरिक जेव्हा पाकिस्तानात येतात, तेव्हा ते मोकळेपणानं हिंडू-फिरू शकतात. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. चीननं आपल्या देशातही मुसलमानांना धार्मिक स्वातंत्र्य द्यायला हवं.
 
मोहम्मद नईम सांगतात, "चीनमध्ये मुसलमानांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांच्यासाठी चिनी भाषेत नमाज शिकवणारं कोणतंही पुस्तक उपलब्ध नाहीये. आमच्या मदरशात चिनी भाषा शिकण्यासाठी केवळ विद्यार्थीच नाहीत तर व्यापारी आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारीही येतात."
 
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि दोन्ही देशांमध्ये वाढणाऱ्या व्यापारी संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये चिनी भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
 
उस्मानच्या मदरशामध्ये चिनी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबतच राहतात. आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा इतर मदरशातूनही काही चिनी विद्यार्थी आले होते.
 
त्यांच्यामते चिनी सरकार मदरशांमध्ये शिकण्याची परवानगी देत नाही. मात्र चीनमध्ये विद्यापीठात शिकण्याची परवानगी आहे. जे विद्यार्थी धर्माचं शिक्षण घेत आहेत, त्यांच्याशी सरकारचा काहीच संबंध नाही असं या चिनी विद्यार्थ्यांनी सांगितलं.
 
चीनमधील शिनजियांग प्रांतात मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे. या प्रांताला पूर्वी तुर्कस्तान म्हटलं जायचं. या प्रांताच्या सीमा पाकिस्तान आणि भारतासह मंगोलिया, रशिया, कझाकिस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान या देशांनाही भिडल्या आहेत. या प्रांताची राजधानी उरूमची आहे आणि काशगर हे इथलं सर्वांत मोठं शहर आहे.
 
चीनमध्ये धार्मिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह
शिनजियांग प्रांतात उईघूर मुसलमान आणि अन्य मुस्लिम समुदायाच्या दहा लाख लोकांना ताब्यात घेतलं असून पुनर्शिक्षणाच्या नावाखाली त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या समितीनं म्हटलं होतं.
 
इस्लामी देशांच्या संघटनांनीही चिनी मुसलमानांच्या मानवाधिकार उल्लंघनावर आपला निषेध व्यक्त केला होता.
 
पाकिस्तानमधील चीनचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून स्पष्ट केलं, की चीनमध्ये 35 हजार मशिदी आहेत जिथे देशातील दोन कोटी मुसलमानांना कायद्यानुसार त्यांचे धार्मिक विधी करण्याचं स्वतंत्र आहे.
 
त्यांनी स्पष्ट केलं, की आम्ही धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. धार्मिक कट्टरपंथाविरूद्ध आमचा लढा सुरू आहे. सामान्य धार्मिक व्यवहारांना कायद्यानंच मान्यता आहे.
 
दुसरीकडे पाकिस्तानी मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शिनजियांगमधील विद्यार्थ्यांची आम्ही चौकशी करू असही चीननं स्पष्ट केलं आहे.
 
पाकिस्तानमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना व्हिसा देण्यात येत आहे त्यांच्यासंबंधी दोन महिन्यात माहिती दिली जावी, असं गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments