Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘कफ सिरप दिलं आणि आमच्या मुलाच्या नाकातून रक्त आलं, फुफ्फुसं फुटली, ब्रेन हॅमरेज झाला'

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (21:17 IST)
Cough Syrup दीड वर्षांचा श्रेयांश, तीन वर्षांचा लामिन, तीन वर्षांची सुरभी शर्मा, 22 महिन्यांची अमीनाटा, अडीच वर्षांचा अनिरुद्ध आणि आणखी अशी अनेक मुलं.
 
भारत आणि गांबियामधली अशी मुलं आहे ज्यांचा जीव जाताना त्यांच्या आईवडिलांनी पाहिलं.
 
दोन महिने ते पाच वर्षांपर्यंतची मुलं.
 
कारण काय तर खोकला थांबण्यासाठी विषारी औषध घेतल्यामुळे त्याचं मूत्रविसर्जन बंद झालं, शरीरावर सूज आली आणि किडनी खराब झाली.
 
मुलं रडायची मात्र त्यांचं दु:ख त्यांना सांगता यायचं नाही.
 
गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरच्या दरम्यान गांबियामध्ये जवळजवळ 70 मुलांचा मृत्यू झाला होता.
 
डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 च्या दरम्यान रामनगरमध्ये कमीत कमी 12 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
या मृत्यूसाठी भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या कफ सिरपला जबाबदार ठरवलं गेलं.
 
कंपनीने आरोप चुकीचं असल्याचं सांगितलं, मात्र पीडितांचा त्यांच्यावर विश्वास नाही.
 
जम्मूमध्ये झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
 
गांबियामध्ये लहान मुलांच्या मृत्यूनंतर सरकारी अहवाल जारी केला. त्यात भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपला या मृत्यूंसाठी जबाबदार ठरवलं गेलं.
 
एकसमान वेदना
जम्मू आणि गांबिया यांच्यात दहा हजार किलोमीटरचं अंतर आहे. मात्र त्यांचं दु:ख एकच आहे. दोन्ही देशांची न्यायाची लढाई अद्यापही जारी आहे.
 
मृतकांमध्ये गांबियाची राजधानी बैंजुलमध्ये राहणारा तीन वर्षांचा लामिनसुद्धा होता.
 
लामिनला त्याच्या बाबांच्या मांडीत बसून ड्रायव्हिंगला जायला फार आवडायचं.
 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याला ताप आला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला औषधं द्यायला सांगितली. त्यात कफ सिरपही होतं.
 
लामिनला ते औषध घ्यायचं नव्हतं. मात्र त्याच्या कुटुंबियांना वाटत होतं की लवकरात लवकर ठीक व्हावा.
 
ड्रायव्हरचं काम करणारे त्याचे वडील एब्रिमा सानिया त्या क्षणांची आठवण करताना सांगतात, “मी लामिनला बळजबरीने औषध घ्यायला लावलं.”
 
त्यांना आजही हा क्षण लख्ख आठवतो. ते रडायला लागले.
 
औषध घेतल्यावर लामिनचं जेवण कमी झालं आणि त्याला कमी लघवी होऊ लागली.
 
डॉक्टरांनी तपासल्यावर लक्षात आलं की लामिनला किडनीची समस्या होती. त्याचे ओठ काळे होण्यास सुरुवात झाली होती.
 
एब्रिमा म्हणाले, “लामिनने माझ्या डोळ्यात पाहिलं. मी त्याला विचारलं बेटा तुला काय झालं? तो माझ्याकडे बघतच राहिला. मला आजही त्याची ती नजर आठवते.”
 
कफ सिरप घेतल्यावर सात दिवसांच्या आतच लामिनचा मृत्यू झाला.
 
मुलांच्या अशा प्रकारे जाण्यामुळे त्यांचे आईवडील चांगलेच खचले आहेत. त्यांच्यासमोर तडफडून त्यांच्या मुलांनी या जगाचा निरोप घेतला.
 
एक वडील म्हणाले, “माझी मुलगी सतत ओरडत होती. शेवटी तिच्या तोंडून आवाज यायचा बंद झाला. शेवटच्या काळात ती तिच्या आईचं नाव घेत होती. जणू तिच्याकडून मदत मागत होती.”
 
लामिनच्या घराच्या जवळ 22 महिन्याची अमीनाटा रहायची.
 
अमीनाटाच्या आईवडिलांना त्यांच्या मुलीबरोबर काय होतंय हे कळलंही नाही.
 
लाकडं विकून रोजीरोटी कमावणाऱ्या अमीनाटाच्या वडिलांनी तिला चांगल्या उपचारांसाठी सेनेगललाही पाठवलं.
 
ते सांगतात, “तिच्या शरीरावर सूज येत होती. ती संपत होती. तिच्या शरीरात काय होतंय हे आम्हाला कळत नव्हतं.”
 
त्यांनी व्हीडिओ कॉलवर मुलीला शेवटचं पाहिलं होतं. अमीनाटा सेनेगलच्या एका रुग्णालयात पलंगावर बेशुद्ध पडून होती.
 
मेमोदू सांगतात, “मला तिचं डोकं हलताना दिसत होतं. मी तिला सांगू इच्छित होतो की मी, तुझा बाबा आहे.”.
 
त्यानंतर थोड्यावेळाने अमीनाटाचा मृत्यू झाला.
 
गांबियामध्ये मृत्यूचं तांडव आणि चौकशी
गेल्या वर्षी जुलैमध्ये जगातल्या सगळ्यांत गरीब देशांपैकी असलेल्या गांबियामध्ये किडनीच्या आजारात वाढ पाहायला मिळाली. पाचपेक्षा कमी वर्षाच्या मुलांमध्ये ही प्रकरणं जास्त प्रमाणात आढळली.
 
किडनीमुळे इतर अवयवांवर परिणाम होतो आणि त्यामुळे जीव जाऊ शकतो.
 
त्यानंतर गांबिया सरकारने माहिती दिली त्यामुळे 69 मुलांचा मृत्यू झाला आहे.
 
गांबियाने त्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेला दिली
 
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की हे प्रकरण कफ सिरपशी निगडित आहे. हे कफ सिरप भारतीय कंपनी मेडन फार्मा कंपनीने तयार केलं आहे.
 
WHO ने सांगितलं की या कंपनीने तयार केलेल्या चार कफ सिरप सँपलची नीट तपासणी करण्यात आली आणि निष्कर्ष काढला गेला की त्यात मानकांपेक्षा जास्त प्रमाणात डाइइथिलिन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल होतं. हे दोन्ही विषारी पदार्थ आहेत.
 
WHO ने सांगितलं की याचमुळे पोटदुखी, उलट्या, डायरिया, लघवीला त्रास, डोकेदुखी, मानसिक स्थितीत बदल आणि किडनीला इजा होऊ शकतो आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.
 
WHO ने ज्या चार कफ सिरपचं नाव घेतलं त्यात प्रोमिथाझाईन ओरल सोल्युशन, कोफेक्सामलिन बेबी कफ सिरप, मेकऑफ बेबी कफ सिरप आणि मॅगरिप एन कोल्ड सिरप हे होते. हे सिरप मेडन फार्माने तयार केलं होतं.
 
त्यानंतर भारत सरकारने या कंपनीवर कारवाई करायला सुरुवात केली.
 
गांबियामध्ये झालेल्या मृत्यूंवर संसदेची चौकशी समिती आणि नुकत्या झालेल्या अक्युट किडनी इंज्युरी चौकशी अहवालात मेडन फार्मासियुटिकल्सला जबाबदार ठरवण्यात आलं.
 
या कफ सिरपमध्ये इथलिन ग्लायकॉल आणि डाईथिलिन ग्लायकॉल इतक्या प्रमाणात होतं की जीव जाऊच शकतो, असं या अहवालात तज्ज्ञांनी नमूद केलं.
 
मेडन आणि भारत सरकारने वारंवार या आरोपांचा इन्कार केला आहे.
 
भारत सरकारच्या मते मेडन कफ सिरपच्या नमुना चाचणीत कळलं की ते योग्य दर्जाचे होते.
 
एक ऑगस्ट 2023 संसदेत एक प्रश्न उपस्थित केला. त्यात सरकारने सांगितलं की गांबिया प्रकरणात असं कळलं की गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं उल्लंघन झालं आहे. त्यानंतर मेडन फार्माला कारणे दाखवा नोटिस पाठवली गेली आणि कंपनीला आदेश दिला गेला की सोनीपतमध्ये सर्व प्रकारच उत्पादन बंद करून टाकावं.
 
मेडन फार्मास्युटिकल्सची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या ऑफिमध्ये गेलो मात्र कोणाशीही संपर्क झाला नाही.
 
कंपनीने रॉयटर्स बरोबर झालेल्या संवादात सांगितलं की त्यांना भारताच्या न्यायिक प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही.
 
फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन काऊंसिल ऑफ इंडियाच्या मते 2022-23 मध्ये भारताने गांबियाला 9.09 मिलियन डॉलरची औषधं पाठवली. मात्र त्याचवेळी आफ्रिकेला पाठवलेल्या औषधांचं मुल्य 3,646 बिलियन डॉलर होतं.
 
नॅशनल असेम्बलीचे सदस्य यायदा सानयांग यांनी सांगितलं, “मी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी औषधं आणायला घाबरत होतो. सगळं अतिशय भीतिदायक होतं.”
 
गांबियामध्ये आयात केलेल्या औषधांची चाचणी करण्यासाठी लॅबसुद्धा नाहीत आणि दुसऱ्या आफ्रिकी देशांसारखंच इथेही मोठ्या प्रमाणात भारतीय औषधं येतात.
 
फक्त गांबियाच नाही तर उझबेकिस्तान, इराक, कॅमरुनमध्येही भारतीय कफ सिरपशी निगडीत प्रकरणांचे अहवाल आल्यानंतर भारतीय औषध कंपन्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेने इराकमध्ये जारी केलेल्या एका अलर्टमध्ये सांगितलं आहे की त्यात डायइथिलीन ग्लायकॉल आणि इथिलिन ग्लायकॉल जास्त प्रमाणात सापडलं आहे.
 
फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन काऊंसिल ऑफ इंडियाचे महासंचालक उदय भास्कर यांच्या मते, “गांबिया, उझबेकिस्तान आणि दुसऱ्या जागी झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे भारतीय औषध उद्योगाची प्रतिमा मलीन झाली आहे. मात्र तुम्ही निर्यात पाहिली तर त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.”
 
भारत सरकारने फार्मा कंपन्यांना सांगितलं आहे की त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या योग्य उत्पादनपद्धतीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करायला हवं. त्यासाठी एक डेडलाईसुद्धा दिली आहे.
 
भारतात 3000 औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे 10,000 उत्पादन युनिट आहेत. 2030 पर्यंत हा उद्योग 130 अब्ज डॉलर होऊ शकतो.
 
उदय भास्कर सांगतात, “ ज्या पद्धतीने जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केले आहेत त्यामुळे सर्वच देश पुनर्विचार करू लागले. ते वारंवार विचारणा करत आहे. हे इतकं सोपं नाही.
 
गांबियामध्ये आम्ही जितक्या लोकांशी बोललो की त्यांना भारत सरकार आणि भारतीय कंपन्यांच्या आरोपांवर भरवसा नाही.
 
मृत्यूवर चौकशी अहवाल तयार करणाऱ्या नॅशनल असेम्ब्ली च्या सिलेक्ट कमिटी ऑन हेल्थचे प्रमुख अमाडू कामरा कामरा म्हणतात, “मी याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. कारण आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही त्या औषधांची चौकशी केली आहे. ही औषधं मेडननेच तयार केली आहेत आणि त्यांना थेट भारतातूनच आयात केलं जात होतं. ”
 
मुलांच्या मृत्यूमुळे भारतात तयार झालेल्या औषधांबद्दल लोकांच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे.
 
आपल्या नऊ महिन्याच्या मुलाला गमावणाऱ्या लामिन डांसो म्हणाल्या, “जेव्हा मी पाहतो की एखादं औषध भारतात तयार झालंय तेव्हा मी त्या औषधाला हातही लावत नाही.”
 
मात्र तज्ज्ञांच्या मते भारतात तयार झालेल्या औषधांवर गांबियाचं अवलंबित्व कायम राहील.
 
पत्रकार मुस्तफा दारबोई म्हणतात, “मी अनेक औषध विक्रेत्यांशी बोललो. बहुतांश औषधं भारतात तयार झाली आहेत. ते अमेरिका आणि युरोपमधून आयात केलेल्या औषधांपेक्षा स्वस्त आहेत.”
 
ताज्या चौकशी अहवालात अनेक पावलं उचलल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच ड्रग रेग्युलेटर संस्था मेडिसिंस कंट्रोल एजन्सीच्या दोन उच्चाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.
 
मात्र कुटुंबीय खूश नाहीत आणि न्यायाची मागणी करत आहेत. त्यांच्या मते गेल्या एक वर्षात आरोग्य व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही.
 
कुटुंबियांच्या ग्रुपचे प्रवक्ते एब्रिमा सॅडी यांच्या मते “आरोग्य मंत्र्यांसकट जे लोक या गुन्ह्यात सहभागी होतो, न्याय व्यवस्थेने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.”
 
काही कुटुंबियांनी मेडन फार्मा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायलयाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि ते भारताच्या न्यायलायाचे दरवाजे ठोठावायला कमी करणार नाहीत.
 
जम्मूमध्येही न्यायासाठी आवाहन
जम्मूच्या रामनगरमधूनही न्यायासाठीची हाक ऐकू येत आहे. इथं डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत 5 वर्षांखालील 12 मुलांचा मृत्यू झाला होता.
 
आरोग्य कार्यकर्ते दिनेश ठाकूर आणि वकील प्रशांत रेड्डी यांनी त्यांच्या ‘द ट्रुथ पिल’ या पुस्तकात रामनगरच्या मृत्यूचं वर्णन हे भारतातील विषबाधा मृत्यूचं पाचवं मोठं प्रकरण म्हणून केलंय.
 
जम्मूपूर्वी चेन्नई, मुंबई, दिल्ली आणि बिहारमध्ये विषारी डीईजीमुळे मृत्यू झाल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी बहुतांश गरीब लोक होते.
 
जम्मूमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अडीच वर्षांच्या अनिरुद्धचाही समावेश आहे. मृत्यूच्या तीन दिवस आधी रेकॉर्ड केलेल्या शेवटच्या व्हीडिओमध्ये अनिरुद्ध हॉस्पिटलच्या बेडवर निपचित पडलेला दिसत होता.
 
त्याचे हात वायरनं बांधलेले आहेत आणि मागून मशीनच्या बीपचा आवाज ऐकू येत होता.
 
रडणारी आई वीणा कुमारी त्याला चमच्याने खाऊ घालण्याचा प्रयत्न करत आहे.
 
काही दिवसांपूर्वी अनिरुद्धला ताप आणि छातीत इन्फेक्शन झाल्यानंतर त्याच्या पालकांनी त्यांना खोकल्याचं सिरप दिलं होतं.
 
शेजारच्याच एका केमिस्टकडून हे सिरप विकत घेतलं होतं.
 
परिसरात चांगला बालरोग तज्ज्ञ नसल्यानं अनेक कुटुंबं आपल्या मुलांना या केमिस्टकडे घेऊन जात असत आणि त्यांनी दिलेले औषध मुलांना देत असत.
 
कुटुंबीयाच्या म्हणण्यानुसार, कफ सिरप प्यायल्यानंतर अनिरुद्धचं लघवी करणं थांबलं, त्याचे पाय सुजले आणि काहीही खाल्लं की तो उलट्या करत होत्या.
 
नंतर डॉक्टरांनी सांगितलं की, अनिरुद्धची किडनी खूप खराब झाली आहे.
 
अनिरुद्धचे वडील अशोक कुमार म्हणाले की, "आमच्या पायाखालची जमीन सरकली, हे कसे होऊ शकते? उलट्या, लूज मोशनमुळे किडनी खराब होऊ शकत नाही."
 
अनिरुद्धला ब्रेन हॅमरेज होऊन जास्त वेळ झाला नव्हता.
 
अशोक कुमार आठवतात, "(त्याला) ब्रेन हॅमरेज झाला होता, नाकातून रक्त येत होते. त्याची फुफ्फुसं फुटली होती. मुल 99 टक्के मेलं, असं डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली. आम्ही त्या 9 जानेवारीला कधीच विसरणार नाही."
 
दोन महिन्यांचा इफान हा जाफरुद्दीन आणि मुरफा बीबी यांचा पहिला मुलगा होता.
 
त्यांच्याकडे इफानचा फोटोही नाही. कफ सिरप प्यायल्यानंतर 10 दिवसात त्यानं जग सोडलं.
 
मुरफा बीबी सांगतात, "त्यावेळी तो खूप अस्वस्थ होता. त्याला उलटी व्हायची तेव्हा तो झोपून रडायचा. त्यानं दूध पिणं बंद केलं होतं. तो बेशुद्ध होत होता.”
 
मृत्यूची चौकशी
जम्मूमधील स्थानिक कार्यकर्ते सुकेश खजुरिया हे रामनगरमधील मुलांच्या मृत्यूवर सातत्यानं लिहीत आहेत आणि बोलत आहेत.
 
ते म्हणतात, "मृत्यू झालेल्या सर्वांचा नाहक बळी गेला आहे आणि हे औषध बनवणाऱ्या कंपनीने आणि औषध नियंत्रक अधिकाऱ्यानं त्यांचं काम व्यवस्थित केलेलं नाहीये. त्यांनी बेकायदेशीर औषधाची शहानिशा न करताच विक्री करण्यास परवानगी दिली. जर सरकारने याची वेळीच दखल घेतली असती तर हे असं घडलं नसतं.”
 
जम्मू-काश्मीरच्या ड्रग कंट्रोलर लोटिका खजुरिया म्हणतात, "आम्ही कायदेशीर नमुना घेत तो तपासणीसाठी प्रादेशिक औषध प्रयोगशाळा चंदिगड येथे पाठवला. तिथल्या अहवालानुसार, त्यात डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण 34 टक्के जास्त होते.
 
पण तो अंतिम अहवाल नव्हता. आम्ही पुन्हा नमुने घेऊन ते CDL कोलकाता येथील ऍपलेट प्रयोगशाळेत पाठवले. तिथूनही असाच अहवाल आला की त्यात डायथिलीन ग्लायकोल 34 टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर आमची तपासणी सुरू झाली."
 
बालरोगतज्ज्ञ भवनीत भारती या रामनगरमधील मुलांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पथकाच्या प्रमुख होत्या
 
त्या सांगतात, "विषामुळे त्यांची किडनी निकामी झाली. त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. शारीरिक अपंगत्व आलं. त्यांना वेंटिलेशनची गरज भासू शकते, कारण अनेक मुले व्हेंटिलेटरवरही गेली होती."
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. या प्रकरणी डिजिटल व्हिजन नावाच्या कंपनीवर आरोप करण्यात आले होते.
 
पण कंपनीचे मालक परशोतम गोयल यांचा दावा आहे की, मुलांनी त्यांच्या कंपनीनं बनवलेले कफ सिरप पिलेलं नाहीये.
 
आम्ही त्यांच्याशी फोनवर बोललो.
 
तर ते म्हणाले, "आम्ही इथे मुलांना मारायला बसलो नाही. आम्ही तिथल्या मुलाला का मारू? आम्ही औषध बनवतो, आम्ही विष बनवत नाही. आम्ही देवाला भिणारी माणसं आहोत, आम्ही असं काम करतच नाही. कुणावर अन्याय करण्याची आम्हाला काय गरज आहे?”
 
मुलांच्या मृत्यूनंतर कारखाना सहा महिने बंद होता, पण न्यायालयाच्या आदेशानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.
 
व्यवस्थेत पारदर्शकता नसल्याचा आरोप कार्यकर्ते आणि लेखक दिनेश ठाकूर यांनी केला आहे.
 
त्यांच्या मते, भारतीय कंपन्या जेव्हा अमेरिका आणि युरोपसाठी औषधं बनवतात तेव्हा त्यांची मानकं वेगळी असतात आणि कंपन्या भारत किंवा आफ्रिकेतील देशांसाठी औषध बनवतात तेव्हा त्यांची मानकं वेगळी असतात.
 
फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाचे महासंचालक उदय भास्कर हे या आरोपांशी सहमत नाहीत.
 
ते म्हणतात, "आफ्रिका ही आमची तिसरी सर्वांत मोठी निर्यात बाजारपेठ आहे. दक्षिण आफ्रिका, घाना, नायजेरिया असे अनेक देश आहेत, जिथं नियामक संस्था खूप मजबूत आहेत."
 
वाचलेल्या मुलांची गोष्ट...
रामनगरमध्ये अशीही कुटुंबे आहेत ज्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलांनीही कथित विषारी कफ सिरप पिलं आणि ते वाचले.
 
पवन कुमारच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो 15 महिन्यांचा होता तेव्हा त्याला तेच कथित विषारी कफ सिरप देण्यात आलं होतं.
 
पवनला 3 महिन्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
 
पवनचे वडील शंभूराम हे मजुरीतून दिवसाला 400 ते 500 रुपये कमावतात.
 
शंभूराम सांगतात, "सध्या पनवची दृष्टीही कमी आहे आणि त्याचा एक कान पूर्णपणे निकामी झाला आहे. डॉक्टर सांगतात की, तो मोठा झाला तरी त्याला कोणतेही काम करता येणार नाही. त्याला धावताही येणार नाही, तो चालणार नाही. कोणतेही वजन उचलू शकणार नाही."
 
6 वर्षांचा प्रणव 30 दिवसांहून अधिक काळ कोमात होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो आता पाहू किंवा ऐकू शकत नाही.
 
त्याची आई प्रिया वर्मा म्हणाली, "डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्याचे मेंदू, डोळे, कान यांच्या ज्या नसा आहेत त्यांना इजा झाली आहे. तो परत येईल की नाही याची खात्री नाही. आम्ही आता सगळं देवावर सोडलं आहे."
 
प्रणव एकटा राहू शकत नाही. त्याच्याबरोबर नेहमी कोणीत असणं आवश्यक असतं. नाहीतर तो एकटाच असल्याची भीती त्याला वाटते.
 
या कुटुंबांना मुलांच्या उपचारासाठी सरकारी मदत हवी आहे. जेणेकरून उद्या पालक नसले, तरी मुलांना स्वतःची काळजी घेता येईल.
 
2 वर्षांची बन्ना, 3 वर्षांची अंकिता, 11 महिन्यांची जान्हवी, 10 महिन्यांची आईसतु, 1 वर्ष 7 महिन्यांचा मुसा आणि आणखी बरीच नावं....
 
कायद्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी या कुटुंबांची मागणी आहे. ही दीर्घकाळ चाललेली लढाई सोपी नसणार आहे, हे त्यांना माहिती आहे.
 
जफरुद्दीन यांनी आपला 2 महिन्यांचा मुलगा इफान गमावलाय. ते म्हणतात,"न्याय मिळालाच पाहिजे."
 
गांबिया असो की जम्मू , खोकल्याच्या सिरपमुळे मोठ्या प्रमाणात मुलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहेत.
 
अद्याप अनेक प्रकरणांमध्ये तपास पूर्ण झालेला नाहीये, तर इतर प्रकरणांमध्ये कारवाई झालेली नाहीये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments