Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकातले तरुण रशियाच्या सैन्यात कसे पोहोचले? त्यांच्यासोबत काय घडलं?

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (18:32 IST)
-अमरेंद्र येरलगड्डा
रशियाला जाऊन लाखो रुपये कमावू अशा विचाराने देश सोडलेले काही भारतीय तरुण आता अडचणीत आलेत.
 
काही एजंट्सनी आम्हाला नोकरी देतो असं म्हणत बोलावलं आणि रशियन सैन्यात भरती व्हायला लावल्याचं या तरुणांनी सांगितलं.
 
कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि तेलंगणातील 16 तरुण रशियाला गेले आहेत.
 
यासंबंधीच्या बातम्या अलीकडच्या काही दिवसांत माध्यमांमध्ये येऊ लागल्या आहेत. हे तरुण रशियन सैनिकांसोबतच रशिया-युक्रेन युद्धभूमीवर तैनात असल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलंय.
 
रशियात अडकलेल्या या तरुणांच्या म्हणण्यानुसार, एजंटांनी त्यांना सांगितलं होतं की, त्यांना सैन्यात नव्हे तर रशियामध्ये मदतनीस आणि सुरक्षा संबंधित नोकऱ्या दिल्या जातील.
 
यातले दोन एजंट रशियात आणि दोन भारतातून काम करत होते.
 
फैसल खान नावाचा दुसरा एक एजंट दुबईत राहून या चार एजंटांचा समन्वयक म्हणून काम करत होता.
 
फैसल खान 'बाबा व्लॉग्स' नावाचं यूट्यूब चॅनल चालवतो. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये त्याने दावा केलाय की, रशियामध्ये मदतनीस म्हणून काम करून चांगले पैसे कमावता येतात.
 
अशा प्रकारे तो तरुणांना या नोकऱ्यांकडे आकर्षित करतो. नोकरीच्या शोधात असलेले तरुण देखील व्हिडिओखाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधतात.
 
या तरुणांना काय आश्वासन दिलं होतं ?
या एजंटांनी एकूण 35 जणांना रशियात पाठवण्याची योजना आखली होती. 9 नोव्हेंबर 2023 रोजी, पहिल्या तुकडीत तीन जणांना चेन्नईहून शारजाला पाठवण्यात आलं.
 
शारजाहून त्यांना 12 नोव्हेंबरला रशियाची राजधानी मॉस्कोकडे पाठविण्यात आलं. 16 नोव्हेंबर रोजी फैसल खानच्या टीमने सहा आणि नंतर सात भारतीयांना रशियाला नेले. त्यांना सैनिक म्हणून नव्हे तर मदतनीस म्हणून काम करावं लागेल, असं सांगण्यात आलं होतं.
 
या भारतीयांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांना काही दिवस प्रशिक्षण दिलं गेलं. त्यानंतर त्यांना 24 डिसेंबर 2023 रोजी सैन्यात सामील करून घेतलं.
 
फैसल खानने बीबीसीशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितलं की, मी ज्या नोकऱ्यांबद्दल सांगितलं होतं, त्या सैन्यात मदतनीसाच्या नोकऱ्या होत्या.
 
त्याने पुढे सांगितलं की, "मी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सांगितलं होतं की, ही सैन्यात मदतनीसाची नोकरी आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आधी पोस्ट केलेला व्हिडिओ पाहू शकता. आम्ही रशियन अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवलं होतं. मी सुमारे सात वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय. आतापर्यंत मी दोन हजार लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या आहेत."
 
रशियात नोकरीसाठी गेलेल्या काही लोकांची नावं बीबीसीने शोधून काढली आहेत.
 
यामध्ये हैदराबादमधील मोहम्मद अफसान, तेलंगणातील नारायणपेठ येथील सुफियान, उत्तरप्रदेशातील अरबान अहमद, काश्मीरमधील जहूर अहमद, गुजरातमधील हमील आणि कर्नाटक गुलबर्गा येथील सय्यद हुसैन, समीर अहमद आणि अब्दुल नईम यांचा समावेश आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
 
रशियन सैन्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत काही तरूण असल्याचं वृत्त अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
अशाप्रकारची प्रत्येक केस जी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या निदर्शनास आणून दिली होती, ती रशियन अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आली. मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिलेली प्रकरणं ही नवी दिल्लीतील रशियन दूतावासासोबत चर्चिली गेली. त्याचाच परिणाम म्हणून अनेक भारतीयांना सोडण्यात आलं आहे.
 
रशियन सैन्यातून प्रत्येक भारतीयाला बाहेर पडण्यास मदत करणं याला आमचं सर्वाधिक प्राधान्य असेल आणि आम्ही त्यासाठी कटीबद्ध आहोत, असंही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
काही भारतीय नागरिकांनी रशियन लष्करात मदतनीस म्हणून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांसाठी करार केले असल्याची आम्हाला कल्पना आहे. भारतीय दूतावासाने त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी नियमितपणे हा मुद्दा संबंधित रशियन अधिकाऱ्यांकडे मांडला आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
 
हे प्रकरण उघडकीस कसं आलं?
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं जेव्हा रशियाला गेलेले भारतीय तरुण बराच काळ त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाहीत. अलीकडच्या काळात त्यांचे काही व्हीडिओही समोर आले ज्यात हे तरुण हताश होऊन मदत मागताना दिसत आहेत.
 
हे दोन्ही व्हीडिओ व्हायरल झाले असून एका व्हीडिओमध्ये, तेलंगणातील सुफियान, कर्नाटकातील सय्यद इलियास हुसैन आणि मोहम्मद समीर अहमद म्हणतात की, "आम्हाला सुरक्षा मदतनीस म्हणून नोकरी देण्यात येणार होती. पण इथे तर आम्हाला रशियन सैन्यात सामील करण्यात आलंय.
 
रशियन अधिकाऱ्यांनी आम्हाला युद्ध आघाडीवर आणलंय. आम्हाला इथे रणांगणावर तैनात केलं आहे. बाबा व्लॉगच्या एजंटने आमचा विश्वासघात केलाय."
 
दुसऱ्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशचा रहिवासी अरबाज हुसैन आपलं म्हणणं मांडताना दिसतोय. व्हिडिओमध्ये त्याने आपल्या हाताला दुखापत झाल्याचं सांगितलं.
 
तो म्हणाला की, त्याला युद्धभूमीवर तैनात करण्यात आलंय आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर तो तेथून निसटला. त्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवावं अशी विनंती त्याने केलीय.
 
'बॉन्ड पेपरवर सही केली आहे'
रशियाला गेलेल्या भारतीय तरुणांचं म्हणणं आहे की, रशियाला पोहोचल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षणापूर्वी बाँडपेपरवर सही करायला लावली. हा बाँड पेपर रशियन भाषेत लिहिला होता.
 
नामपल्ली येथील मोहम्मद इम्रान सांगतात की, हा बाँड पेपर रशियन भाषेत होता. एजंटवर विश्वास असल्याने सर्वांनी बाँड पेपरवर सह्या केल्या.
 
रशियाला गेलेल्या मोहम्मद अफसानचे मोठे भाऊ मोहम्मद इम्रान सांगतात की, अफसानच्या मागे त्याची पत्नी, पदरात दोन वर्षांचा मुलगा आणि आठ महिन्यांची मुलगी आहे.
 
रशियाला जाण्यापूर्वी मोहम्मद अफसान हैदराबादमधील एका कापड दुकानात क्लस्टर मॅनेजर म्हणून काम करत होता. यूट्यूबवर फैसल खानचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चांगल्या पगाराच्या आशेने त्याने त्याच्याशी संपर्क साधला.
 
मोहम्मद इम्रान सांगतात की, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा भाऊ कोणाच्याच संपर्कात नाहीये. त्यांचा भाऊ कुठे आहे आणि तो काय करतोय याबाबत काहीच माहिती नाहीये. त्यांना त्याच्या भावाची काळजी वाटते.
 
"31 डिसेंबरला अफसान आमच्याशी शेवटचं बोलला होता. तेव्हापासून तो आमच्या संपर्कात नाही. त्याला मिळतंय ते प्रशिक्षण वेगळं असल्याचं त्याने सांगितलं होतं. हे प्रशिक्षण सैन्यातील मदतनीसासाठी आहे असं वाटतं नव्हतं."
 
इम्रान पुढे म्हणाले, "जेव्हा आम्ही एजंट्सशी बोललो तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं की, हा प्रशिक्षणाचा एक भाग आहे. यात इतकी काळजी करण्याची गरज नाही. ते एक दिवस परत येतील."
 
"उत्तरप्रदेशातील एका तरुणाने सांगितलं की, माझ्या भावाच्या पायात दोन गोळ्या लागल्या आहेत. त्याला लवकरात लवकर तिथून परत आणलं पाहिजे."
 
तेलंगणातील नारायणपेठ येथील रहिवासी सय्यद सुफियानची आई नसीब बानो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 18 जानेवारीपासून त्यांचा त्यांच्या मुलाशी संपर्क होऊ शकलेला नाही.
 
आपल्या मुलाची आठवण काढून त्या रडल्या. त्या सांगतात की, जेव्हा त्यांचं त्यांच्या मुलाशी शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्याने सांगितलं होतं की, त्याच्याकडे कोणताही फोन नाहीये. जेव्हा त्याला फोन मिळेल तेव्हा तो फोन करेल.
 
माझ्या मुलाला देशात परत आणा असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलंय.
 
नसीम बानो दोन लहान खोल्यांच्या घरात राहतात. 24 वर्षीय सुफियान गेल्या दोन वर्षांपासून दुबईत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याला एक बहीण आणि एक मोठा भाऊ आहे.
 
सुफियान 16 नोव्हेंबर 2023 रोजी इतर पाच लोकांसह रशियाला गेला होता. गेल्या महिनाभरापासून तो कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हता.
 
'आठवड्यातून एकदाच फोन करण्याची परवानगी'
फैसल खानने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "तुम्ही युद्धभूमीवरून फोनवर कोणाशी बोलत असाल तर युक्रेनचे सैन्य तुमचे सिग्नल ट्रेस करून रशियन सैनिकांचा ठावठिकाणा शोधते. फोन सिग्नल ओळखून ड्रोन हल्ले केले जातात. त्यामुळे युद्धात फोन वापरता येत नाही."
 
फैसल खान सांगतो की, रशियाला गेलेल्या 16 भारतीय तरुणांपैकी 10 जणांचा ठावठिकाणा लागला आहे, मात्र अद्याप सहा जण बेपत्ता आहेत.
 
त्याने बीबीसीला सांगितलं की, "व्हायरल व्हिडिओ पाठवणाऱ्या उत्तरप्रदेशातील अरबाज हुसेनने माझ्याशी संपर्क साधला. आम्ही त्याला मार्गदर्शन करून मॉस्कोला आणण्यात यशस्वी झालो. आता तो सुरक्षित आहे."
 
"ज्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही रशियन सैन्य आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत."
 
हे भारतीय वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहेत का?
या भारतीयांना वॅग्नर ग्रुपमध्ये सामील करण्यात आलंय. हा गट म्हणजे खाजगी आर्मी आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
 
हे लोक रशियन सैन्यासाठी काम करत होते, असा दावा केला जातोय. मात्र तसं काही नव्हतं.
 
बीबीसीने या संदर्भात फैसल खानला प्रश्न विचारला. सुरुवातीला त्याने सांगितलं की या तरुणांना वॅग्नर ग्रुपमध्ये पाठवलं होतं. नंतर त्याने सांगितलं की, या तरुणांना रशियन सैन्यात सामील करून घेण्यात आलंय.
 
मोहम्मद इम्रान सांगतात, "बॉन्ड पेपर रशियन भाषेत होता. माझ्या भावाने मला त्या बाँड पेपरचे तपशील पाठवले होते जे मी भाषांतरित करून वाचले. त्यावर वॅगनर ग्रुपमध्ये नव्हे तर रशियन सैन्यात सामील करण्यात आल्याचं लिहिलं होतं."
 
या संपूर्ण प्रकरणात अनेक एजंट सामील असल्याचं बीबीसीच्या तपासात आढळून आलंय. हे सर्व भारतीय नागरिक असले तरी वेगवेगळ्या देशात राहतात.
 
राजस्थानचा मोईन आणि तामिळनाडूचा पलनीसामी रमेश कुमार रशियात काम करतात. फैसल खान दुबईमध्ये राहतो आणि बाबा व्लॉग नावाचे यूट्यूब चॅनल चालवतो.
 
या व्हिडिओंचा ते जाहिराती म्हणून वापर करतात आणि याद्वारे तरुणांना आकर्षित करतात. सुफियान आणि पूजा मुंबईत एजंट म्हणून काम करतात.
 
नुकत्याच आलेल्या बातम्यांनंतर मुंबईतील एजंटांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
 
बीबीसीने रशियातील मोईनशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आमच्याशी संपर्क करू असं सांगून त्याने फोन कट केला मात्र त्यानंतर त्याच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.
 
'सर्वांकडून तीन- तीन लाख रुपये घेतले'
नोकरीच्या आशेने रशियाला गेलेल्यांना एक लाख ते दीड लाख रुपये दरमहा पगार मिळू शकतो, असं एजंटांनी सांगितलं होतं.
 
रशियात पोहोचल्यानंतर या लोकांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 40 ते 50 हजार रुपये दिले जात होते. नंतर पगार वाढणार असल्याचं फैसल खानने सांगितलं होतं.
 
फैसल खानने या तरुणांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले होते.
 
सुफियानचा मोठे भाऊ सय्यद सलमान नारायणपेठ मध्ये राहतात.
 
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "माझा धाकटा भाऊ दुबईत असताना खूप पैसे पाठवायचा. एखाद्या महिन्यात त्याला पैसे पाठवता आले नाहीत तर तो दुसऱ्या महिन्यात पाठवायचा. पण या वर्षात त्याने मला पैसेच पाठवले नाहीत."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "त्याने पैसे साठवून एजंटला दिले. त्याला वाटलं की रशियाला जाऊन त्याला चांगले पैसे मिळतील आणि नंतरच्या आयुष्यात तो स्थिर होऊ शकेल. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे."
 
फैसल खान म्हणतो, "मी तीन लाख रुपये घेतले होते हे खरं आहे, हे पैसे या प्रक्रियेचा एक भाग होते. पण मी त्यातील फक्त 50 हजार घेतले आणि बाकीचे रशियातील एजंटना हस्तांतरित केले."
 
कुटुंबीयांनी केली असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय नागरिकांच्या कथित तैनातीबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली आहे की काही भारतीय नागरिक रशियन सैन्यात सपोर्ट स्टाफ म्हणून काम करत आहेत. त्यांना तेथून लवकर बाहेर काढता यावं यासाठी भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे."
 
ते म्हणाले की, रशियन सैन्याला मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भारताने रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
 
भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन रणधीर जैस्वाल यांनी यावेळी केलं आहे.
 
बीबीसीने या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रशियातील भारतीय दूतावास आणि भारतातील रशियन दूतावासाशी ईमेलद्वारे संपर्क साधला. दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
मोहम्मद इम्रान यांनी हैदराबादमधील नामपल्ली पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आपला भाऊ बेपत्ता असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय.
 
या प्रकरणी फैसल खानवरही कारवाई करण्यात यावी असं त्यांनी या तक्रारीत म्हटलंय. नामपल्ली पोलिसांनी फैसल खान विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments