देशात सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. पण मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते हे जाणून घ्या.
सगळ्यांत आधी, तुमचं वय काय आहे? मतदानासाठी तुमचं वय किमान 18 वर्षं पूर्ण असलं पाहिजे. मतदार म्हणून तुमची नोंदणी झाली की त्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात जाऊ शकता.
मतदान केंद्रात गेलात की तुम्हाला लहान-लहान गटांमध्ये आत सोडलं जाईल.
तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून पाहील.
त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच न पुसली जाणारी शाई लावेल.
त्यानंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील.
त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल.
आता तुम्ही मतदान करायला तयार आहात.
तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठीच्या कप्प्याकडे जायला सांगतील. तिथं तुम्हाला मतदान ईव्हीएमचे बॅलेटिंग युनिट दिसेल, यावर तुमचे मत नोंदवले जाईल.
अरे हो, पण थांबा! हे इलेक्ट्रोनिक व्होटिंग मशीन म्हणजे आहे तरी काय?
या मशीनवर उमेदवारांची नावं आणि त्यापुढे त्यांचं निवडणूक चिन्ह असतं. तिथेच एक बटण असतं.
उमेदवारांची नावं त्या मतदारसंघातली प्रचलित भाषा आणि लिप्यांमध्ये लिहिलेली असतात.
अशिक्षित मतदारांना कळावं यासाठी प्रत्येक उमेदवारापुढे त्याचं निवडणूक चिन्हं असतं.
आता ज्या उमेदवाराला मत द्यायचं असेल त्याच्या नावासमोरील निळं बटण दाबा.
पण बटण काही वेळ तसंच दाबून ठेवा... अजून तुमचं मत नोंदवलं गेलेलं नसतं.
ज्यावेळेस तुम्हाला एक बीप ऐकू येते आणि कंट्रोल युनिटमधला लाईट बंद होतो, तेव्हा तुमचं मत नोंदवलं जातं.
तुम्ही यशस्वीरीत्या मतदान केलं आहे.
मतदान अधिकाऱ्यांनी EVMवरील "Close" बटण दाबलं की मशीन पुढे नवीन मतं नोंदवणं थांबवेल.
मतदान यंत्राशी छेडछाड होऊ नये म्हणून ते जुन्या पद्धतीने म्हणजे मेणाने सील केलं जातं. त्यानंतर त्यावर निवडणूक आयोगाकडून आलेली एक सुरक्षा पट्टी लावून सीरियल नंबर लिहिला जातो. मतमोजणीच्या वेळीच ते उघडलं जातं.
मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यापूर्वी कर्मचारी आणि एजंट्स स्वतः प्रत्येक ईव्हीएम तपासणी करतात.
ही सर्व प्रक्रिया 'रिटर्निंग अधिकाऱ्याच्या' निरीक्षणाखाली सुरू असते.
मतदान यंत्राशी काहीही छेडछाड झालेली नाही, याची खात्री पटली की रिटर्निंग अधिकारी 'रिझल्ट' बटण दाबतो.
कंट्रोल युनिटमध्ये दाखवलेल्या प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या सर्व मतांची बेरीज केली जाते.
पूर्ण समाधान झाल्यावर ते निकालपत्रावर स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करतात.
त्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निकाल त्यांच्या वेबसाईटवर रिअल टाईम प्रसिद्ध करतं.
महाराष्ट्रातल्या मतदानाच्या तारखा
महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. 18 एप्रिलला दुसरा टप्पा आहे. महाराष्ट्रातले कोणते मतदारसंघ कोणत्या टप्प्यात आहेत हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.
आज महाराष्ट्रात 10 जागांवर मतदान होत आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे. या मतदारसंघाविषयी आणि नेत्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी वाचा.
भारतात सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान होईल.
लोकसभा निवडणुकीचे निकाल केव्हा जाहीर होणार
23 मे रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी पूर्ण होऊन निकाल लागतील.
मतदार यादीत नाव कसं शोधाल?
निवडणुकीच्या काळात सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक घटक असतो तो म्हणजे मतदार. पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल?
तुम्हाला वाटू शकतं गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत नाव नोंदणी झाली तेव्हा तुमचं नाव होतं मग यावेळी करायची गरज आहे की नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की दरवेळी निवडणूक आयोगाकडून आपल्या याद्या अद्ययावत केल्या जातात. मतदार यादीत नाव कसं शोधायचं हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.
महाराष्ट्रातल्या मतदानासाठी मतदान कसं कराल?
मतदानासाठी तुमचं वय किमान 18 वर्षं पूर्ण असलं पाहिजे. मतदार म्हणून तुमची नोंदणी झाली की त्यानंतर तुम्ही मतदान केंद्रात जाऊ शकता.
मतदान केंद्रात गेलात की तुम्हाला लहान-लहान गटांमध्ये आत सोडलं जाईल.
तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून पाहील.
त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच न पुसली जाणारी शाई लावेल.
त्यानंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील.
त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल.
आता तुम्ही मतदान करायला तयार आहात.
VVPAT मशीन म्हणजे काय?
मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी VVPAT वापरलं जातं.
'Voter Verifiable Paper Audit Trail' म्हणजे VVPAT. EVM मशीनद्वारे मतदान होतं. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाऊ शकते. या मशीन विषयी जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी वाचा.
NOTA (नोटा) म्हणजे काय ?
लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. 11 एप्रिलपासून ते 12 मेपर्यंत एकूण सात टप्प्यांमध्ये देशात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
हे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. नोटा म्हणजे काय आणि या पर्यायाचा वापर कसा केला जातो हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.
तुमचं मतदान केंद्र कुठे आहे हे कसं ओळखाल?
मतदारांची यादी National voters service portal या मतदार यादीमध्ये देत असतं. या मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते या लिंकवर क्लिक करून पाहा. मतदार यादीत नाव जेव्हा दिसतं त्याचं वेळी आपल्या मतदान केंद्राचं नाव देखील दिलेलं असतं.
महाराष्ट्रातल्या मतदारसंघाची यादी
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या ठिकाणी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी मतदान होईल. तर चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या ठिकाणी मतदान होईल.
महाराष्ट्रातले प्रमुख उमेदवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, नुकत्याच काँग्रेसमध्ये आलेल्या उर्मिला मांतोडकर, शिवसेना नेते अनंत गीते, चंद्रकांत खैरे, सुप्रिया सुळे हे या निवडणुकीतले चर्चेतले चेहरे आहेत.