Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीरमध्येही 'उडता पंजाब', ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2019 (15:56 IST)
माजिद जहांगीर
"जवळपास आठ महिन्यांपूर्वी माझं जग बदललं. त्या दिवशी मी पहिल्यांदा ड्रग्ज घेतले. ड्रग्ज घेतल्यानंतर मी बदलून जाईन, मला उत्साही वाटेल, असं मला माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं. म्हणून मी ड्रग्ज घेतले. मी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली आणि माझा आनंद नाहीसा झाला. तणाव कमी होण्याऐवजी उलट वाढलाच."
 
श्रीनगरमधील श्री महाराजा हरी सिंह हॉस्पिटलमधल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल झालेल्या 25 वर्षांच्या मुश्ताक अहमदची (नाव बदलण्यात आलं आहे) ही कहाणी. काश्मीरमध्ये ड्रग्जचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
 
मुश्ताक सांगतो, "सुरुवातीला मी गांजा घेतला. काही दिवसांनंतर माझ्या मित्रांनी मला हेरॉईन दिलं. दुसऱ्याच दिवसापासून मला हेरॉईनची अशी काही चटक लागली, की मी रोजच ते घ्यायला लागलो."
 
गेल्या चार दिवसांपासून मुश्ताकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मित्रांनी ड्रग्ज सवय लावल्याचं त्याचं म्हणणं आहे.
 
तो म्हणतो, "ड्रग्ज घेतल्यावनर मी थेट माझ्या खोलीत जायचो. गेल्या आठ महिन्यांत मी ड्रग्जवर तीन लाखांपेक्षा जास्त पैसे उधळले आहेत. ड्रग्ज नाही घेतले तर माझं पोट दुखायचं, अंग दुखायचं. माझ्या घरच्यांना हे कळल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणंच सोडलं.
 
घरचं कोणीही माझ्याशी बोलू लागलं, की मला वाटायचं की ती व्यक्ती माझ्यासोबत भांडत आहे. त्यानंतर मी घरच्यांना मला व्यसन मुक्ती केंद्रात सोडायला सांगितलं. तेव्हापासून मी इथे आहे."
 
ड्रग्ज सहज उपलब्ध होतात का?
मुश्ताकला हे विचारल्यानंतर तो म्हणतो, "मी दक्षिण काश्मीरमध्ये संगमावर जायचो. तिथे हेरॉईन मिळणं अवघड नाही. तिथले काही तस्कर हेरॉईन विकतात."
 
"आता मी ठीक आहे. इथे येण्याआधी मला ड्रग्जशिवाय राहताच यायचं नाही. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. मी झोपू शकतो. नशा करणाऱ्या सर्वांना मी सांगेन, की ही सवय सोडा. यामुळे सगळं नष्टं होतं. घर-कुटुंब, पैसे, आयुष्य - सगळंच वाया जातं."
 
ड्रग्जमुळे थांबतो मेंदुचा विकास
याच व्यसन मुक्ती केंद्रात दाखल झालेल्या दुसऱ्या एका मुलानंही त्याची कहाणी सांगितली.
 
आपल्याला एका मित्रानं ही सवय कशी लावली आणि आपलं आयुष्य कसं नष्ट झालं, हे तो सांगतो.
 
त्यानं सांगितलं, की गेली दोन वर्षं तो एसपी गोळ्या आणि हेरॉईन घेत होता.
 
"मला यातून सुरुवातीला आनंद मिळायचा. मग ती सवयच लागली. ड्रग्सपायी मी सर्व गमावलं. घरच्यांना माझ्याबद्दल आदर नव्हता. ड्रग्जपायी मी पाच ते दहा लाख रुपये गमावले. एका ग्रॅमसाठी तीन हजार लागतात आणि मी दररोज दोन ते तीन ग्रॅम हेरॉईन घ्यायचो. या हेरॉईनसाठी मी माझी मोटरसायकलही विकली."
 
तो सांगतो, "ड्रग्ज घेतल्यानंतर आपण दुसरंच कोणीतरी आहोत, असं वाटायला लागायचं. सकाळी नशा उतरल्यानंतर मी कोणीच नसायचो. माझं आयुष्य म्हणजे नरकवास होता. ड्रग्सच्या सवयीमुळे तुम्ही कोणतंच काम चांगल्याप्रकारे करू शकत नाही. माझ्याकडेच पाहा ना. यामुळे तुमची मती खुंटते."
 
तो पुढे सांगतो, "माझ्या सवयीविषयी आई-बहिणीला कळल्यावर त्या रडायला लागल्या. मी माझ्या आईला आणि बहिणीला पुन्हा ड्रग्ज न घेण्याचं वचन दिलं आहे. माझे अनेक मित्र व्यसनी होते आणि त्यापायी त्यांचा मृत्यू झाला. या जाळ्यात पुन्हा न अडकण्याची मी शपथ घेतली आहे.
झपाट्याने पसरणारं व्यसन
या तरुणानं दक्षिण काश्मीरमधल्या अशा जागांविषयी सांगितलं जिथं सहजपणे हेरॉईन मिळू शकतं. श्रीनगर शहरातल्या 16 ते 25 वयोगटातल्या हेरॉईन घेणाऱ्या अनेक मुलांना आपण ओळखत असल्याचं त्यानं सांगितलं.
 
गेल्या दोन वर्षात काश्मीरमध्ये व्यसनाधीनता जितक्या वेगाने पसरली आहे. यापूर्वी हे प्रमाण इतकं नव्हतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
एका व्यसनाधीन व्यक्तिच्या भावानं बीबीसीला सांगितलं, की घरातल्या कोणालाही ड्रग्जचं व्यसन लागलं तर त्याचा त्रास इतरांना होतो. त्याच्या भावाला व्यसनामुळेच एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 
तो सांगतो, "सगळं कुटुंबच काळजीत होतं. माझ्या भावाला नशा करण्याचं व्यसन लागल्याचं समजलं तेव्हा मला धक्काच बसला. तो घरातल्या एका खोलीत गप्प बसून रहायचा. कुटुंबातल्या इतरांसोबत बसून जेवायचाही नाही. पूर्ण वेळ रागावलेला असायचा. त्याच्या व्यसनासाठी त्यानं भरपूर पैसे उधळले होते. त्याच्या वागण्याविषयी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तो नशा करत असल्याचं समजलं. सध्या तो श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत."
 
तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की गेल्या दोन वर्षात व्यसनाधीन तरूणांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या व्यसनानं धोक्याची पातळी गाठलेली आहे. एसएमएचएस हॉस्पिटलच्या डॉक्टर्सचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांमध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे ते या समाजासाठीही धोक्याचं आहे.
 
फक्त 10 टक्के जण करून घेतात उपचार
डॉ. यासिर अहमद रहतर हे एसएमएचएस हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत.
 
ते म्हणतात, " मी याला आजार असंच म्हणेन. काश्मीररमध्ये हे लोण एखाद्या आजारासारखं पसरतंय. आमच्या हॉस्पिटलचं रेकॉर्ड पाहिलं तर लक्षात येईल, की ओपीडी आणि आयपीडीमध्ये येणाऱ्या या प्रकारच्या केसेस वाढलेल्या आहेत. पण व्यसनाधीन झालेल्यांपैकी केवळ 10 टक्के लोकच उपचार करून घेतात, असं आमच्या पाहणीवरून लक्षात आलंय. इतर 90 टक्के तर येतही नाहीत."
 
साधारणपणे कोणत्या प्रकारच्या नशेचं प्रमाण सर्वात जास्त आहे असं विचारल्यावर ते सांगतात, "ते वयावर अवलंबून असतं. प्रत्येक वयोगटात हे वेगवेगळं आहे. 8 ते 10 वयातील व्यसनाधीन झालेल्या मुलांचीही प्रकरणं आमच्याकडे येतात. ही मुलं इन्हेलर औषधं, बूट पॉलिश आणि फेव्हिकॉलची नशा करतात. या प्रकारच्या वस्तूंना 'गेट-अवे' ड्रग्ज म्हणतात.
 
सगळ्याच तरुणांमध्ये नशेच्या सवयीबाबत एक वेगळी गोष्ट आढळली आहे. आता हे तरूण हेरॉईन आणि ब्राऊन शुगर सारखे हार्ड ड्रग्ज घेऊ लागले आहेत. या वर्षी आम्ही जेवढे रुग्ण तपासले आहेत त्यातल्या 90 टक्के जणांना हेरॉईन आणि ब्राऊनशुगरची सवय होती. हा ट्रेंड भयानक आहे. तीन वर्षांपूर्वी असं होत नव्हतं."
 
महिलाही घेतात ड्रग्स
ते म्हणतात, "महिलांनी ड्रग्ज घेण्याची काही प्रकरणं आढळली आहेत. काळजीची बाब म्हणजे हार्ड ड्रग्ज घेणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे."
 
नशा करण्याची सवय लागलेली एक महिला उपचारासाठी नुकतीच आल्याचं त्यांनी सांगितलं. ती हेरॉईनचं सेवन करायची. ती ग्रुपमध्ये नशा करत असे. तिच्या गटातल्या एका महिलेचा नशेमुळे मृत्यू झाल्यानं ती चिंतेत होती.
 
डॉक्टर रहतर सांगतात, की ड्रग्ज घेण्याकडे सामाजिक कलंक असल्यासारखं पाहिलं जातं. त्यामुळे लोकांना कळू नये म्हणून महिला व्यसन मुक्ती केंद्रामध्ये येणं टाळतात.
 
गेल्या चार वर्षांतल्या आकडेवारीवरून डॉ. रहतर सांगतात, "मी तुम्हाला गेल्या चार वर्षांतली आकडेवारी सांगतो. 2016 मध्ये आमच्याकडे ओपीडीच्या 500 आणि आयपीडीच्या 200 केसेस आल्या होत्या. 2016 सालात काश्मीर सहा महिने बंद होतं. म्हणूनच त्या दरम्यान एवढी प्रकरणं आली नाहीत. पण 2017मध्ये अचानक ही संख्या वाढून 3500 झाली.
 
आम्ही एकाचवेळी 350 लोकांना अॅडमिट केलं होतं. 2018मध्ये जास्त रुग्ण यायला लागले. एकट्या ओपीडीचीच संख्या 5000च्या पुढे गेली. 2019च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत आमच्याकडे ओपीडीमध्ये 1500 प्रकरणं आली आणि आयपीडीमध्ये 150. रुग्णांची संख्या वाढतीये हे तुमच्याही लक्षात येईल."
 
पण व्यसनाधीन लोकांची संख्या वाढत आहे, असं पोलिसांना वाटत नाही. पोलिसांसाठी व्यसनाच्या वाढणाऱ्या प्रमाणापेक्षा पाकिस्तानातून भारतामध्ये होणारं ड्रग्जचं स्मगलिंग अधिक काळजी वाढवणारं आहे.
 
पोलिस काय म्हणतात?
काश्मीर रेंजचे पोलिस आयजी स्वयं पणी प्रकाश सांगतात, "तुम्ही तज्ज्ञांच्या हवाल्यानं रुग्णांची जी संख्या सांगत आहात ती योग्य नाही."
 
ते म्हणतात, "सिंथेटिक ड्रग्ज उपलब्ध असणं ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. पाकिस्तानातून याचं स्मगलिंग होतं. हे स्मगलिंग ड्रग्ज पेडलर्स आणि स्मगलर्स मार्फत केलं जातं. हे लोक इथून ड्रग्स दुसरीकडे पाठवण्याचा प्रयत्न करतात. काश्मीर खोऱ्यामध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन आणि तेंगडार भागामधून ड्रग्सची तस्करी होते. काश्मिरच्या बाहेर ज्या ड्रग पेडलर्स आणि तस्करांना पकडण्यात आलं आहे त्यापैकी बहुतेकांनी या भागाशी संबंध असल्याचं स्वीकारलं आहे."
 
"या लोकांचं जाळं असतं आणि आम्ही ते मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय असंही आढळलं आहे की नशा करण्याची सवय लागल्यानंतर ती व्यक्ती स्वतः देखील ड्रग पेडलरचं (लहान प्रमाणात विक्री) काम करू लागते. यापूर्वी आम्ही एनडीपीएस खाली प्रकरण नोंदवायचो. याशिवाय आम्ही अनेकांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालीही ताब्यात घेतलं आहे. ड्रग्सच्या बाबतीत आम्ही आमच्याकडून सर्व पावलं उचलत आहोत," असं पणी प्रकाश यांनी सांगितलं.
 
सीमेपलीकडून होणाऱ्या व्यापाराच्या आडून ड्रग्जचं स्मगलिंग होतं का, असं विचारल्यावर अशी काही प्रकरणं आढळल्याचं प्रकाश यांनी सांगितलं. बारामुल्लामध्ये अशी मोठी कारवाई करण्यात आली होती.
 
सिंथेटिक ड्रग्जचं वाढलेलं सेवन ही चिंतेची बाब असल्याचं प्रकाश म्हणतात.
 
पाकिस्तानवर आरोप
पाकिस्तान ड्रग्सच्या माध्यमातून तरुणांना टार्गेट करत आहे का हे विचारल्यावर ते सांगतात, "आम्ही इथे ज्या परिस्थितीचा सामना करतोय ते कोणापासून लपलेलं नाही. पाकिस्तानच्या पाठिंब्याने अनेक अतिरेकी संघटना इथे सक्रिय आहेत आणि त्यांना अडचणी वाढवण्यात रस आहे. त्यांना इथल्या युवकांना आपल्या कह्यात घ्यायचं आहे यात शंकाच नाही."
 
फुटीरतावादी नेते मीरवाईज उमर फारूख यांनी व्यसनांचे धोके सांगण्यासाठी एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यामध्ये धार्मिक वक्ते, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वक्त्यांनी भाग घेतला.
 
पूर्ण जम्मू -काश्मिरमध्ये हेरॉईन सेवनाचं प्रमाण वाढलेलं असल्याचं काश्मिरचे माजी आयजी (क्राईम) सैय्यद अहफदुल मुजतबा यांनी काही दिवसांपूर्वी मीडियासोबत बोलताना म्हटलं होतं.
 
पोलिसांनी 2008-2009मध्ये त्यांचं व्यसन मुक्ती केंद्र सुरू केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

पुढील लेख
Show comments