Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2020 : एकाच हंगामात चमकून विस्मृतीत गेलेले 9 खेळाडू

Webdunia
बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (12:57 IST)
पराग फाटक 
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा हे क्रिकेटच्या बरोबरीने स्वप्नांचं, महत्वाकांक्षेचं व्यासपीठ आहे. परिस्थितीशी संघर्ष करत, संधीच्या शोधात हजारो क्रिकेटपटू असतात. आयपीएलच्या माध्यमातून दिग्गज खेळाडूंच्या साक्षीने आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तरुण क्रिकेटपटू आतूर असतात.
 
 दीड महिन्यात वर्षभराची पुंजी मिळवण्याची शक्यता, प्रसिद्धी, टीम इंडियासाठी निवड होण्याची शक्यता मोठ्या खेळाडूंचं मार्गदर्शन, सपोर्ट स्टाफकडून मिळणारा पाठिंबा असं सगळं डोक्यात असतं. काहींना संधी मिळते. त्या संधीचं ते सोनं करतात. काहीजण चमकू लागतात आणि मग एकदम लुप्त होतात. वन सीझन वंडर्स झालेल्या अशा खेळाडूंविषयी...
 
1. स्वप्नील असनोडकर (राजस्थान रॉयल्स)
आयपीएलचा पहिला हंगाम परिकथेसारखा होता. राजस्थान रॉयल्सने पहिल्यावहिल्या हंगामाचं जेतेपद पटकावलं. जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्नच्या जादूई नेतृत्वाखाली खेळणाऱ्या असंख्य बिनचेहऱ्याच्या खेळाडूंनी एकत्र येत जेतेपद साकारलं. त्यापैकीच एक होता गोव्याचा छोट्या चणीचा सलामीवीर स्वप्नील असनोडकर.
 
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन ग्रॅमी स्मिथच्या साथीने स्वप्नील सलामीला येऊ लागला. वय, भाषा, संस्कृती यांची बंधनं दूर सारत या जोडीने राजस्थानच्या डावाचा नियमितपणे पाया रचला. स्वप्नीलने या हंगामात 9 मॅचेसमध्ये 311 रन्स केले. पुढच्या हंगामांमध्ये स्वप्नील नियमित दिसेल असा तज्ज्ञांचा होरा होता. स्वप्नील दिसलाही पण त्याची बॅट तळपली नाही.
 
तीन हंगांमात मिळून त्याने जेमतेम शंभरी गाठली. कामगिरी नसल्याने मिळणाऱ्या संधी कमी झाल्या. आयपीएलच्या पटावरून 2011 मध्ये स्वप्नील जो गायब झाला तो आजतागायत. गोव्यासाठी खेळताना दिसतो. पण आयपीएलशी नातं तुटलं ते तुटलंच.
 
2. पॉल वल्थाटी (किंग्ज इलेव्हन पंजाब)
मूळचा मुंबईकर परंतु चमकला किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी. पॉलने आयपीएल पदार्पण केलं राजस्थानसाठी पण त्याचं नाव देशाला कळलं जेव्हा त्याने 2011मध्ये पंजाबसाठी खेळताना चेन्नईविरुद्ध शतक झळकावलं तेव्हा. त्या हंगामात पॉलने दोन अर्धशतकंही झळकावली. स्वप्नवत अशा हंगामात पॉलने 14 मॅचेसमध्ये 463 रन्स केले. सात विकेट्सही पटकावल्या.
 
पंजाब संघात पॉलचं स्थान पक्कं झालं असं वाटू लागलं. मात्र 2012च्या हंगामात पॉलच्या खेळातल्या उणीवा प्रतिस्पर्ध्यांनी हेरल्या. त्याला फक्त 30 रन्स करता आले. पुढच्या वर्षी खेळला पण चमकला नाहीच. पॉल नंतर एअर इंडियासाठी खेळू लागला. मुंबईत अकादमीत लहान मुलांना क्रिकेट शिकवण्याचं काम तो करतो.
 
3. मनप्रीत गोणी (चेन्नई सुपर किंग्स)
प्रतिभा हेरणं आणि त्या प्रतिभाकौशल्याला पैलू पाडणं यात महेंद्रसिंग धोनी वाकबगार आहे. धोनीने पंजाबच्या या हट्टाकट्या उंचपुऱ्या फास्ट बॉलरला पाहिलं. त्याची साधीसोपी अॅक्शन पाहिली.
 
पहिल्याच हंगामात धोनीने गोणीच्या बॉलिंगवर विश्वास ठेवला. कॅप्टनच्या विश्वासाला सार्थ ठरवत गोणीने 17 विकेट्स घेतल्या. फोर-सिक्स हाणू शकेल अशी बॅटिंगही करू शकत असल्याने गोणीची उपयुक्तता वाढली. नशीब म्हणजे त्याच वर्षी त्याने टीम इंडियासाठी पदार्पण केलं. पण पहिल्या हंगामात गोणीने जो करिश्मा दाखवला तो त्याला नंतर दाखवता आला नाही.
 
चेन्नईने वगळल्यानंतर पंजाबने त्याला संघात घेतलं. 18 बॉलमध्ये 43 रन्ससाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार सोडला तर उल्लेखनीय नोंद नाही. दुखापती आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे गोणी आयपीएल चाहत्यांच्या विस्मृतीत गेला तो गेलाच.
 
4. कामरान खान (राजस्थान रॉयल्स)
टॅलेंट हुडकून त्याला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध शेन वॉर्नने तुमची दखल घ्यावी, तुम्हाला चार गोष्टी शिकवाव्यात यापेक्षा तरुण क्रिकेटरला काय हवं असू शकतं? मूळच्या उत्तर प्रदेशातील फास्ट बॉलर कामरान खानला शेन वॉर्नसारखा मेन्टॉर लाभला. डावखुऱ्या आणि वेगवान कामरानने क्रिकेटचाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. सौरव गांगुलीसारखा महान बॅट्समन समोर असताना त्याने सात रन्सचा बचाव केला.
 
आयपीएलची पहिली सुपर ओव्हर टाकण्याचा मान कामरानच्या नावे आहे. त्या मॅचनंतर कामरानची सगळीकडे चर्चा होऊ लागली. त्याची अॅक्शन सदोष ठरली. त्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अॅक्शनमध्ये बदल केले. तो पुण्याकडून खेळला, परंतु त्याच्या बॉलिंगवर बॅट्समननी रन्सची खिरापत लुटली.
 
2011 नंतर त्याला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळू शकलं नाही. तो शेतीकडे वळला. मध्यंतरी शेतात काम करतानाचा कामरानचा फोटो शेन वॉर्नने पाहिला. कामरान क्रिकेटऐवजी शेती करत असल्याने वॉर्नने खंत व्यक्त केली.
 
5. राहुल शर्मा (पुणे वॉरियर्स)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आऊट करणं हा कोणत्याही बॉलरच्या आयुष्यातला सुवर्णक्षण असू शकतो. राहुल शर्माने आयपीएलमध्ये खेळताना दोनदा हा क्षण अनुभवला. परंतु इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
 
2010 हंगामाच्या काही दिवस आधीच राहुलच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला वेदना होऊ लागल्या. त्याची दृष्टी अंधूक होऊ लागली. डॉक्टरांनी त्याला तूर्तास खेळू शकणार नाहीस असं सांगितलं.
 
मात्र डेक्कनचा कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट त्याच्या पाठिशी उभा राहिला. राहुलला डोळे बंद करताना त्रास होत असे. 2011 मध्ये राहुलला पुण्याने समाविष्ट केलं. आय ड्रॉप टाकूनच त्याला बॉलिंग करावी लागते. फिल्डिंग करतानाही त्रास होतो. पण राहुलने त्या हंगामात मोठमोठ्या बॅट्समनना तंबूचा रस्ता दाखवत प्रभावित केलं.
 
टीम इंडियासाठीही त्याची निवड झाली. परंतु मुंबईतल्या एका पार्टीत ड्रग सेवनाच्या आरोपांसाठी त्याला अटक करण्यात आली. तो चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. त्या प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर 2015 मध्ये चेन्नईने राहुलला संघात घेतलं. मात्र त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही.
 
6. टी. सुमन (डेक्कन चार्जर्स)
खणखणीत फटके लगावणारा तिरुमलासेट्टी सुमनने डेक्कन चार्जर्ससाठी अल्पावधीत नाव कमावलं. 2009 हंगामात सुमनने 12 मॅचेसमध्ये 237 रन्स केले. डेक्कनने या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं. त्यामध्ये सुमनचाही वाटा होता.
 
संघात गिलख्रिस्ट, रोहित शर्मा, अँड्यू सायमंड्स, शाहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरिस असे हिटर असतानाही सुमनने आपल्या फटक्यांनी चाहत्यांना जिंकून घेतलं.
 
पुढच्या हंगामात कामगिरी सुधारत सुमनने 307 रन्स काढले. पण त्यानंतर सुमनची आयपीएल कारकीर्द भरकटली. मुंबई, पुणे, हैदराबाद अशा तीन संघांसाठी तो खेळला पण पूर्वीचा सुमन चाहत्यांना दिसलाच नाही.
 
7. सौरभ तिवारी (मुंबई इंडियन्स)
धष्टपुष्ट बांधा, लांब केस आणि ताकदवान फटके ही सौरभ तिवाराची ओळख. पुढचा धोनी अशी त्याची ओळख करून देण्यात येत असे.
 
2010च्या हंगामात सौरभने 419 रन्स काढले. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामातील त्याच्या खेळाने अपेक्षा उंचावल्या. परंतु पुढच्या कोणत्याच हंगामात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
 
8. यो महेश (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या यो महेशने आपल्या बॉलिंगने सगळ्यांना आकर्षून घेतलं. इनस्विंग आणि आऊटस्विंग अशी बॉलची करामत करू शकणाऱ्या महेशने त्या हंगामात 16 विकेट्स घेतल्या.
 
दिल्लीसाठी महेश नियमित बॉलर असं चित्र होतं मात्र पुढच्या हंगामात महेशला केवळ दोन मॅचेस खेळायला मिळाल्या. त्यानंतर दिल्लीने त्याला संघातून वगळलं.
 
चेन्नईने त्याला संघात घेतलं. 2012 मध्ये त्याला 5 मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. तो अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे चेन्नईनेही त्याला वगळलं. पहिल्या हंगामात प्रदर्शनाच्या बळावर अपेक्षा उंचावणारा महेश गायबच झाला.
 
9. शिविल कौशिक (गुजरात लायन्स)
चायनामन बॉलर्स ही स्पिन बॉलर्सची प्रजात दुर्मीळ होत चालली आहे. गुजरात लायन्सने डोमेस्टिक क्रिकेटचा अनुभव नसणाऱ्या शिविल कौशिकला संधी दिली तेव्हा सगळे चक्रावून गेले.
 
दक्षिण आफ्रिकेच्या पॉल अडम्सच्या अॅक्शनची आठवण शिविलने करून दिली. बॉलिंग टाकताना संपूर्ण अंग घुसळवून निघणाऱ्या कौशिकच्या बॉलिंगपेक्षाही चर्चा अॅक्शनची झाली.
 
कर्नाटकात झालेल्या स्पिन स्टार्स काँटेस्टमध्ये शिविलची बॉलिंग भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांना आवडली. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या ट्रायलसाठीही बोलावलं मात्र त्याची संघात निवड होऊ शकली नाही. परंतु काही वर्षातच आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.
 
कौशिक मूळचा पंजाबचा परंतु त्याचे कुटुंबीय बेंगळुरूला शिफ्ट झाले. सदानंद विश्वनाथ यांच्या अकादमीत त्याने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. 2016 आयपीएलमध्ये खेळताना कौशिकने स्टीव्हन स्मिथला आऊट केलं. आनंद साजराही केला पण त्यानंतर बॉल नोबॉल असल्याचं अंपायर्सनी जाहीर केलं आणि कौशिकचा आनंद मावळला.
 
कर्नाटक प्रीमिअर लीग, आयपीएलनंतर कौशिकला यॉर्कशायर प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र गुजरात लायन्सने दिलेल्या संधीनंतर कौशिक आयपीएलमध्ये दिसलेला नाही.
 
आयपीएलमध्ये दरवर्षी नवनवे खेळाडू येत राहतात. बहुतांशजण असेच विरून जातात. काहीजण दोन-तीन हंगाम खेळून बाजूला पडतात. काहींच्या नशिबी एकच हंगाम असतो, मग ते विजनवासात जातात. आयपीएलमध्ये चमकणारे पण नंतर कॉन्ट्रॅक्ट हाती न लागलेले डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहतात. प्रकाशझोतात येणाऱ्या ताऱ्यांपेक्षा लुकलूकून अंधुक झालेल्यांची संख्या प्रचंड आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments