Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर पीडितेचं शेवटचं संभाषण सांगताना आई-वडिलांना अश्रू अनावर

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (14:37 IST)
आज वयाच्या 62 व्या वर्षी आमचं सगळं आयुष्य धुळीला मिळालंय. आता आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, इतकी किमान अपेक्षा आहे.”

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कोलकाता दुर्घटनेतील 31 वर्षीय मृत पीडितेच्या वडिलांचे हे शब्द.
कोलकात्यातील अगदी सामान्य कुटुंबाच्या या घराभोवती पत्रकारांचा अक्षरशः गराडा पडलेला आहे.
त्यांच्या घरी जाऊन बीबीसीच्या टीमने पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला.

बलात्कार पीडित आणि तिच्या कुटुंबीयांच्या ओळखीबाबत गोपनीयता बाळगणे हे कायदेशीररीत्या बंधनकारक असल्याने सदरील बातमीतून नाव आणि इतर वैयक्तिक संदर्भ वगळण्यात आलेले आहेत.)
“आमचं राज्य, आपला देश इतकंच काय संपूर्ण जग आज माझ्या मुलीला न्याय देण्याची मागणी करतंय,” पीडितेचे वडील म्हणाले. दरम्यान पीडितेची आई धीरगंभीर मुद्रेत त्यांच्या बाजूला शून्यात नजर लावून बसली होती.
पूर्व कोलकात्याच्या भागातील आर. जी. कर सरकारी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून रात्रपाळीत काम करत असतानाच या मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली.

आपल्या सलग 36 तासांच्या कामातून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी रूग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पहुडली असताना तिच्यावर हे अनन्वित अत्याचार करण्यात आले. नंतर तिची तितक्याच निघृणपणे हत्या करण्यात आली.

या दुर्घटनेच्या काही तास आधीच म्हणजेच रात्री सुमारे 11 वाजता पीडित मुलीने मोबाईल वरून तिच्या आईशी संवाद साधला होता.या दुर्घटनेच्या काही तास आधीच म्हणजेच रात्री सुमारे 11 वाजता पीडित मुलीने मोबाईल वरून तिच्या आईशी संवाद साधला होता. आपल्या मुलीशी झालेला शेवटचा संवाद ती आई सांगत होती. “पप्पा वेळेवर गोळ्या घेत आहेत का? हे नक्की बघ. माझी काही काळजी करू नकोस.”

“हे आमचं शेवटचं बोलणं होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी फोन लावत राहिलो. पण कोणी उचलला नाही.”मृत पीडित मुलीच्या वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यासाठी वेळेवर औषधं घेणं त्यांना गरजेचं आहे.
“माझी औषधं कधीच चुकणार नाहीत, याची ती पुरेपूर काळजी घेत होती. मला आठवतंय एकदा माझी औषधं रात्रीच संपली. मी विचार केला की एका दिवसाने काय फरक पडतो? उद्या सकाळी जाऊन औषधं घेईल. पण माझ्या मुलीला हे माहीत झालं तेव्हा रात्रीचे 11 वाजलेले होते.
 
"सगळ्यांची जेवणं थांबवून ‘पप्पांची औषधं आल्याशिवाय कोणी जेवणार नाही,’ असा सज्जड दमच तिने आम्हाला दिला. आणि इतक्या उशिरा माझ्या औषधांची व्यवस्था लावून दिली,” वडील आपल्या मृत मुलीच्या आठवणीत व्याकूळ होऊन आमच्याशी कसेबसे बोलत होते.“अशीच होती माझी मुलगी. तिने मला कधीही कुठल्याही गोष्टीची चिंता अथवा कमतरता भासू दिली नाही.”

निर्भयाच्या आठवणी झाल्या जागी
या घटनेनं देशात 2012 च्या निर्भया प्रकरणाच्या काळ्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 2012 ला दिल्लीत 22 वर्षीय मुलीवर चालत्या बसमध्ये निघृण सामूहिक बलात्कार केला गेला होता.
तिला झालेला इजा इतकी गंभीर होती की यानंतर काहीच दिवसांत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दिल्ली दुर्घटनेनंतर देशातील लैंगिक अत्याचार विरोधातील कायदे आणखी कठोर करण्यात आले. मागच्या काही काळात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवले जाण्याचे प्रमाण वाढलेलं असलं तरी तितक्या प्रमाणात आरोपींना शिक्षा होऊन न्याय मिळवणं आजही शक्य झालेलं नाही.
 
नुकत्याच घडलेल्या या कोलकाता दुर्घटनेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरील वाढत्या आव्हानांना पुन्हा वाचा फुटली आहे. या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. शिवाय महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचं संरक्षण पुरवण्यासाठी विशेष कायदा बनवला जावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे.कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती सगळी पावलं उचलली जातील, असं आश्वासन भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिलं आहे.
 
नॅशनल मेडिकल कमिशन ही देशातील वैद्यकीय शिक्षणावर नजर ठेवणारी सरकारी संस्था आहे. या आयोगाने सुद्धा एक परिपत्रक काढून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षा पुरवण्यासाठी एक विशेष सल्लागार समिती नियुक्त केली आहे.
 
माध्यमांचा घराभोवती गराडा
आम्ही मृत पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. गजबजलेल्या कोलकाता शहरातीलच एका अरुंद बोळीत त्यांचं साधं घर आहे. या घराभोवती पोलीसांनी चहूबाजूंनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. शेकडो टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी आपले कॅमेरे घेऊन इथला प्रत्येक क्षण कैद करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत.
या माध्यमकर्मींच्या पुढे अगदी घराजवळ 10 - 12 पोलीस अधिकारी भर उन्हात पांढऱ्या गणवेशात उभा राहिलेले दिसतात. कोणालाही खास करून पत्रकारांना हे बॅरिकेड्स ओलांडून आत येऊ न देणे व पीडित कुटुंबाला सुरक्षितता आणि एकांत देणं, हा यामागचा पोलिसांचा उद्देश आहे.

9 ऑगस्ट च्या रात्री ही घटना घडली तेव्हा पीडित डॉक्टर सलग 36 तास चालणाऱ्या रात्रपाळीच्या कामावर होती. थकल्यावर कामातून थोडी विश्रांती घेण्यासाठी ती इथल्या सेमिनार हॉलमध्ये गेली असता तिच्यावर हे अत्याचार झाले. रात्री घडलेल्या या घटनेची चाहूल कोणाला लागली नाही. सकाळी तिचं शरीर अर्ध नग्न अवस्थेत पडलेलं दिसलं, तेव्हा हा प्रकार समोर आला. ही घटना इतकी भयानक होती की संपूर्ण देशभरातून यावर संताप अजूनही व्यक्त केला जात आहे. देशभरात वेगवेगळ्या शहरात आंदोलन आणि निषेध मोर्चे अजूनही सुरू आहे.
 
देशभरात विशेषतः रात्रपाळीत काम कराव्या लागणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी कोलकत्तामध्ये रिक्लेम द नाईट हा मोर्चा काढला गेला.
“ती जिथे काम करत होती त्या रुग्णालयातच तिच्यासोबत इतकी भयंकर घटना घडली. किमान कामाच्या ठिकाणी तरी मुली सुरक्षित असायला हव्यात,’’ हतबल अवस्थेतील वडिलांंना बोलताना आपली निराशा लपवता आली नाही.
 
तिचे अखेरचे शब्द आठवताना..
आपल्या मुलीचा अशा प्रकारे करुण अंत झाल्यामुळे हे कुटुंब अक्षरश: कोलमडून पडलं आहे. आपल्या मृत मुलीची आठवण जागी करत असताना तिच्या वडिलांना गहिवरून आलं.
“तिचं लग्न आता ठरणारंच होतं. पण ती म्हणाली की पप्पा तुम्ही लग्नासाठी इतके पैसे कुठून जमवणार? तुम्ही याची चिंता करत बसू नका. मी सगळं सांभाळून घेईल.”

वडील बोलत असतानाच बाजूला बसलेल्या तिच्या आईला हुंदके आवरत नव्हते.
घरातील समोरची खोली वडिलांच्या टेलर कामाच्या साहित्यांनी भरलेली होती. शिवण यंत्र, धागे, इस्त्री आणि कपडे खोलीच्या फरशीवर अस्ताव्यस्त विखुरलेले होते.
समोरच्या खोलीतून पुढील पायऱ्या चढल्यानंतर मृत मुलीची बेडरूम लागते. ही दुर्घटना घडून आता 11 दिवस होऊन गेले. तिच्या घरच्यांनी 10 ऑगस्ट पासून या खोलीत पाऊलही टाकलेलं नाही.
 
डॉक्टर होऊन चांगलं आयुष्य जगायचं स्वप्न
“माझी मुलगी लहान असताना आमची आर्थिक परिस्थिती फार बेताची होती. ती फक्त पाच वर्षांची असेल. तिला डाळिंब फार आवडत असे. पण ती स्वतःसाठी कधीच काही मागायची नाही. बाहेर फळ बघितल्यानंतरही ते फक्त पूजेसाठीच विकत घ्यायला सांगायची माझी समजदार मुलगी,” बोलणं पूर्ण करण्यासाठीच तिचे वडील अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागले.
“कृपया रडू नका. कणखर व्हा,” आजूबाजूचे नातेवाईक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते.
दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना मन खंबीर करण्यासाठी या कुटुंबाची पराकाष्ठा सुरू आहे.
 
“माझी एकुलती एक पोरगी होती. लहानपणापासून तिला अभ्यासाची आवड होती. त्यामुळे शाळेत शिक्षकांचीही ती मोठी लाडकी होती. लहानपणी शिक्षक स्वतः तिला आपल्या सोबत शाळेत घेऊन जायचे. सगळेजण म्हणायचे की गरीब असल्यामुळे तू काय मुलीला डॉक्टर बनवू शकणार नाहीस. पण माझ्या जिद्दी मुलीने सगळ्यांना चुकीचं ठरवलं आणि स्वतःच्या बळावर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. ती डॉक्टर झाली,” मुलीची आठवण काढताना तिचे वडील स्वतः जुन्या आठवणीत रमून गेले होते.

डिलांचं सगळं बोलणं तिच्या आई स्तब्ध होऊन ऐकत होती. तिचे हात वारंवार हातातील सोन्याच्या बांगडीकडे जात होते. तिच्या मुलीने स्वतःच्या पैशातून आईला या बांगड्या घेऊन दिल्या होत्या.
“माझी मुलगी रोज झोपण्याआधी डायरी लिहीत असे. 'गोल्ड मेडल'सह पहिला क्रमांक मिळवून डॉक्टर व्हायचंय, असं तिने लिहून ठेवलं होतं. तिला मोठी डॉक्टर होऊन चांगलं आयुष्य जगायचं होतं. आमचीही काळजी घ्यायची होती. हेच तिचं स्वप्न होतं. पण आता सगळंच संपलं,” एक दीर्घ सुस्कारा सोडत तिची आई थांबली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments