Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र विधानसभा : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची कोंडी झाली आहे का?

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2019 (09:48 IST)
सुहास पळशीकर
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
२०१४ ते २०१८ या काळात जी नवी राज्यं भाजपनं जिंकली ती टिकवण्याचं आव्हान भाजपपुढे नजीकच्या काळात असणार आहे.
 
अशा राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य असणार आहे. ही निवडणूक आपण जिंकलेली आहेच अशा आविर्भावात सध्या भाजप नेते आहेत.
 
लोकसभेच्या पाठोपाठ निवडणूक झाली की लोकसभेचा फायदा विधानसभेच्या निवडणुकीत मिळतो हे २००४ पासूनच्या तीन निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे. त्यातच २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकूण देशात झालेला विजय जास्त प्रभावी राहिला आहे.
 
त्यामुळे महाराष्ट्रात पक्षाला येती निवडणूक सोपी जाईल अशीच चिन्हं जास्त आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील निवडणुकीचा वेध घ्यायचा झाला तर तो कोणत्या चौकटीत घेता येईल?
 
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जर राजकीय रंगमंचाकडे पहिले तर येत्या निवडणुकीत चार घटक महत्त्वाचे ठरतील असं दिसतं.
 
भाजपला सत्तेचा फायदा की तोटा?
पहिला घटक म्हणजे सत्ताधारी असण्याचा भाजपला काही तोटा होईल का? ज्याला सत्ताधार्‍यांच्या विरोधातील कल (अॅंटी-इन्कम्बन्सी) असं म्हणतात तो घटक महाराष्ट्रात किती प्रभावी ठरेल?
 
२०१४च्या तुलनेत २०१९च्या निवडणुकीला भाजपच्या दृष्टीने थोडी वेगळी पार्श्वभूमी आहे. एक म्हणजे २०१४ मध्ये भाजप हा राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हान देणारा पक्ष होता. आता तो स्वतः (शिवसेनेसह) सत्ताधारी पक्ष आहे. सत्ताधारी असण्याचे फायदे पक्षाला मिळतील की सत्ताधारी पक्षाविरोधात असणारी नाराजी त्याला भोवेल?
 
सत्ताधारी पक्षाला जनतेची नाराजी भोवते असं काही सरसकट दिसत नाही हे गेल्या वीस वर्षांत म्हणजे १९९९-२००० नंतर अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रातही दिसलं आहे. म्हणजे सरसकट सत्ताधार्‍यांना चाप लावण्याचा १९९०च्या दशकातला प्रघात नंतरच्या काळात बराच सौम्य झाला.
 
उलट अनेक वेळा मतदारांनी फारसे काम न करणार्‍या सरकारांना उदारपणे पुन्हा संधी दिली असल्याचं दिसतं. त्यामुळे राज्यात 'आपोआपच' नाराज जनता आपल्याला मत देईल अशी आळशी आशा जर विरोधी पक्ष बाळगून बसले तर त्यांची फसगत होण्याची शक्यताच जास्त आहे.
 
त्यात सध्या भाजपाच्या सार्वत्रिक लोकप्रियतेचा टप्पा आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे मोदी-शहा-भाजप यांच्या लाटेत राज्यातील भाजपचं घोडं लोकप्रियतेच्या गंगेत न्हाऊन निघालं तर आश्चर्य वाटायला नको.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात (संदर्भ: लोकनीतीने केलेला राष्ट्रीय निवडणूक अभ्यास, २०१९—सौजन्य सीएसडीएस डेटा युनिट) असं दिसून आलं होतं की केंद्रातील सरकारच्या कामगिरीबद्दल जितके लोक 'पुरेसे समाधानी' होते (२३ टक्के), त्याहून थोडे अधिक लोक (२५ टक्के) राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल पुरेशा प्रमाणात समाधानी होते. केंद्रातील सरकारबद्दल अगदीच असमाधानी असणार्‍यांच्या पेक्षा (१८ टक्के) राज्य सरकारबद्दल खूप किंवा पूर्णपणे असमाधानी असणार्‍यांचे प्रमाण देखील थोडे जास्त (२१ टक्के) होते.
 
एकंदरीने, राज्य सरकारबद्दल मोठ्या प्रमाणात असमाधान नव्हतं. किंबहुना, सत्ताधारी असताना लोक फार असमाधानी नसणे ही फडणवीस सरकारची मोठीच जमेची बाजू म्हणावी लागेल.
 
एप्रिल-मे महिन्यात मतदानानंतर झालेल्या या सर्वेक्षणात असाही प्रश्न विचारला होता की तेव्हाच विधानसभा निवडणूक झाली असती तर लोकांनी कोणाला मत दिलं असतं. त्यावेळी भाजपाला राज्यातही मत देऊ, असं म्हणणार्‍या लोकांचं प्रमाण २९ टक्के एवढे होतं तर शिवसेनेला मत देणार्‍यांचं १२ टक्के आणि कॉंग्रेस १५ टक्के तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मत देऊ म्हणार्‍यांचं प्रमाण ९ टक्के होतं.
 
म्हणजे भाजप आणि कॉंग्रेस दोघांनाही साधारणपणे लोकसभेएवढाच पाठिंबा विधानसभेसाठी होता, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना विधानसभेसाठी थोडा कमी पाठिंबा होता.
 
अर्थात ही झाली मे महिन्यातली गोष्ट. आता ऑक्टोबर महिन्यात या परिस्थितीत बदल होऊ शकतो, पण निवडणुकीला सामोरं जाताना भाजपची स्थिती जास्त मजबूत असेल एवढा मात्र याचा अर्थ नक्कीच होतो.
 
देश पादाक्रांत करण्याची घाई
दुसरी बाब आघाड्यांच्या राजकारणाशी संबंधित आहे.
 
२०१४ आणि २०१९ मध्ये एक फरक आहे. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर अचानकपणे राज्यातील पक्षीय स्पर्धेची चौकट बदलली होती. दोन्ही आघाड्या मोडल्या आणि मुख्यतः चौरंगी लढती झाल्या. आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे आणि त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही एकमेकांशी जुळवून घ्यायचं ठरवलं आहे.
शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील असं चित्र सध्या तरी दिसतं आहे. याचा फायदा काय हे पाहायचं झालं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा युतीला किती विधानसभा क्षेत्रांमध्ये आघाडी मिळाली हे पाहता येईल.
 
अशा मतदारसंघांची संख्या सव्वादोनशेच्या पलीकडे जाते. म्हणजे स्वतंत्र लढून या दोघा पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या (१८८) त्यापेक्षा जास्त यश त्यांना एकत्र येऊन मिळू शकतं.
 
अर्थात हे झालं कागदावरचं चित्र. जागावाटप आणि सगळा देश पादाक्रांत करण्याची भाजपला झालेली घाई या गोष्टी हे चित्र बदलण्यास करणीभूत ठरू शकतात. म्हणजे, भाजप आघाडीवर असल्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्या संबंधांचं गणित बदलू शकतं.
 
जिथे जिथे आपली मर्यादित ताकद आहे तिथे प्रादेशिक पक्षांशी आघाडी करायची हे धोरण भाजपने १९९०च्या दशकात स्वीकारलं. पण त्या धोरणामागे दोन सूत्रे होती. एक म्हणजे केंद्रात सत्ता मिळवायची (आणि त्यासाठी जागावाटपात लोकसभेच्या जास्त जागा मिळवायच्या आणि विधानसभेसाठी प्रादेशिक पक्षाला जास्त जागा द्यायच्या). दुसरं सूत्र असं होतं की त्या-त्या राज्यात हातपाय पसरायचे आणि शक्य तिथे प्रादेशिक पक्षाला बाजूला सारायचे.
 
या दुसर्‍या सूत्राची चाहूल लागली म्हणूनच नवीन, नितीश किंवा चंद्राबाबू यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर भाजपापासून अलग होण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकात एका टप्प्यावर जनता दलाबरोबर जाऊन पुढे भाजपाने स्वतःची ताकद निर्माण केली हे इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे.
 
शिवसेनेची कोंडी
जसजसा भाजप हा जास्त खर्‍या अर्थाने राष्ट्रीय पक्ष बनला, तसे त्याचे प्रादेशिक पक्षांच्या बरोबरचे संबंध बदलले. महाराष्ट्रात हे नाट्य २०१४ पासून उलगडत गेलं. शिवसेनेऐवजी छोट्या स्थानिक पक्षांच्या बरोबर जाऊन आपला कार्यभाग साधण्यावर भाजपचा भर राहिला आणि संकुचित राजकीय स्वार्थावर गुजराण करणार्‍या नव्या-जुन्या छोट्या पक्षांची त्याला साथ देखील मिळाली.
 
पण विरोधी पक्ष म्हणून बसायला संकोच वाटून शिवसेनेने तडजोड पत्करली आणि आता अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाशी तह करून टाकला. आधी तडजोड, नंतर तह आणि अखेरीस मनसबदारी असा सेनेचा प्रवास चालू असल्याचं दिसतं.
 
त्यांच्या आताच्या आघाडीतून जसा दोघांचाही फायदा होईल अशी शक्यता आहे तशीच या आघाडीत जोखीमसुद्धा आहे. लोकसभेच्या यशानंतर दोन्हीकडून मुख्यमंत्रिपदाची बाशिंगं बांधून दिवसागणिक दावे-प्रतिदावे चालले आहेत.
 
ते जरी आपण लटकं भांडण म्हणून सोडून द्यायचं ठरवलं तरी भाजपच्या दृष्टीनं त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मर्यादित उमेदवारच निवडून येणे हे चित्र सर्वाधिक सोयीचं असेल तर शिवसेनेच्या दृष्टीने, भाजपचे गेल्या खेपेपेक्षा कमी आणि त्यांचे स्वतःचे मागच्या पेक्षा जास्त उमेदवार निवडून यायला हवेत! म्हणजे त्यांची अंतिम उद्दिष्टं एकमेकांच्या पेक्षा भिन्न असणार.
 
वर ज्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला त्यानुसार एक गमतीशीर बाब पुढे येते : कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही मत देणार्‍या दर तीन मतदारांपैकी दोघे जण (म्हणजे ६५-६६ टक्के) पुन्हा त्याच पक्षाला मत देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत ही शक्यता ५० टक्के एवढीच आहे - म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या मतदारांपैकी निम्मेच त्यांना विधानसभेत मत देऊ असे म्हणाले.
 
पण शिवसेनेच्या बाबतीत हे प्रमाण सर्वात कमी आहे. शिवसेनेला लोकसभेसाठी मत देणार्‍या मतदारांपैकी फक्त चाळीस टक्के एवढेच मतदार विधानसभेसाठी त्याच पक्षाला मत देऊ असे म्हणाले! शिवसेनेचे तब्बल ३५ टक्के मतदार विधानसभेसाठी भाजपकडे जाणार असे म्हणाले आहेत. ही बाब त्या दोन पक्षांमधली 'तुझे नि माझे जमेना' या प्रकारच्या तणावपूर्ण संबंधांची चुणूक दाखवणारी आहे.
 
याचा अर्थ या निवडणुकीत भाजपशी युती करण्याच्या बाबतीत शिवसेनेची कोंडी झालेली दिसते. युती केली नाही तर नुकसान आणि युती केली तरी नुकसान अशी ही विचित्र कोंडी आहे. गेली पाच वर्षं धरसोड करीत राहून, सत्तेची सोयरीक तर हवी पण संसाराची बंधनं मात्र नकोत अशा तोर्‍यात राहून शिवसेनेनं ही कोंडी ओढवून घेतली आहे.
 
या कोंडीमुळे आता येत्या निवडणुकीत पक्षांतर्गत (म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर) आणि युतीच्या अंतर्गत (सेना-भाजपा संबंधांवर) काय परिणाम होतील हे जसं महत्त्वाचे आहे, तसंच त्याचा राज्यातील एकूण राजकीय स्पर्धेच्या चौकटीवर काय परिणाम होईल हेही अनिश्चित असणार आहे.
 
मनसे शिवसेनेचं नुकसान करू शकेल?
येत्या निवडणुकीचं चित्र साकार होताना तिसरा मुद्दा असेल तो अर्थातच छोट्या पक्षांचा. तामिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रात हळूहळू दोन मोठ्या आघाड्या आणि त्यांचा अनेक लहान पक्ष आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न असा आकृतिबंध साकारताना दिसतो आहे.
 
खरं तर त्याची सुरुवात १९९०च्या दशकातच झाली. आता स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी पक्ष, यांच्यासारखे अनेक पक्ष राज्यातील बहुपक्षीय आणि आघाडीच्या राजकारणाचा फायदा घेऊन सत्तेत वाटा मागू पाहात आहेत.
 
कोणती आघाडी किती पक्षांना आकर्षित करू शकेल हा त्यामुळेच एक रंजक-रोचक असा मुद्दा आहे.
 
सत्तेच्या जवळ असणारा पक्ष अशा छोट्या पक्षांना चटकन काहीतरी देऊ शकतो आणि त्यामुळे त्यांचा स्वाभाविक कल मजबूत असणार्‍या पक्षाकडे असेल; पण भाजप आणि शिवसेना यांच्या युतीत आधीच बरीच दाटीवाटी झालेली आहे आणि धक्काबुक्की चालली आहे.
 
त्यामुळे तिथे गेलं तर एकीकडे सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता आणि दुसरीकडे मोठ्या पक्षांच्या वाटमारीत कोपर्‍यात बसून राहावं लागण्याची शक्यता या पेचात हे पक्ष अडकतील. अर्थात त्यातले बरेच एव्हाना भाजपच्या संघात बदली आणि राखीव खेळाडू म्हणून सामील झालेच आहेत.
 
पण तरीही दोन खेळाडूंकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील. दोघेही मनस्वी, आपआपल्या गोटात ताकद असलेले आणि त्या ताकदीबद्दल अवच्या सव्वा कल्पना असलेले. एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि दुसरा भारिप-बहुजन महासंघ (त्याचा अलिकडचा अवतार म्हणजे वंचित बहुजन आघाडी). या दोघांनीही अलिकडची लोकसभा गाजवली. एकाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं गेलं तर दुसर्‍याने त्यांचं नुकसान केलं असा त्यांच्यावर आरोप आहे.
 
आता विधानसभेला मनसे निवडणूक लढवेल असं गृहित धरलं तर त्यांचं आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं किती जमणार यावर शिवसेनेचं यश अवलंबून राहील. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा ठिकठिकाणी वेगळी चूल मांडून लढली तर अनेक मतदारसंघांमधली अनिश्चितता आणखी वाढेल हे नक्की. पण त्यांना दलित-ओबीसी मतं मिळतील असं मानलं तर त्यामुळे भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्याशिवाय राहणार नाहीत.
 
म्हणूनच सरतेशेवटी येत्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काय करणार हा पक्षीय स्पर्धेच्या संदर्भातला चौथा निर्णायक घटक असेल.
 
आशाळभूत बोक्यांची बालकथा
आत्ता तरी या दोन्ही पक्षांपुढे असणारं मुख्य आव्हान आपल्या कार्यकर्त्यांचे गळके कालवे दुरुस्त करून गळती थांबवण्याचं असेल. अर्थात, सगळी गळती होऊ देऊन नवी भरती करण्याचा धाडसी मार्ग त्यांना उपलब्ध आहे.
 
पण स्थानिक लाग्याबांध्यांच्या राजकारणात आकंठ अडकल्यामुळे त्यांना यातून मार्ग काढण्यात अजूनपर्यंत तरी अपयश आलं आहे. ठिकठिकाणची स्थानिक बडी प्रस्थं हीच या पक्षांची ताकद राहिली आहे. त्यामुळे त्यांना जपणे तर भाग आहे. त्या बड्या प्रस्थांना भाजपचे वेध लागले आहेत, पण त्यांना जाऊ देऊन नवीन कार्यकर्त्यांना वाव देण्याचं धाडस दोन्ही कॉंग्रेस पक्षांमध्ये नाही-कॉंग्रेस पक्षात तर अजिबातच नाही.
 
हा पेच ते कसा सोडवणार यावर खरेतर भाजप-सेना आघाडीच्या समोर नेमकं कशाप्रकारचं आव्हान उभं राहील हे अवलंबून आहे. जर तो पेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडवू शकले नाहीत तर येती निवडणूक म्हणजे एक तर लोकसभेची पुनरावृत्ती असेल.
 
शिवसेना आणि भाजप यांचातील ताण-तणावावर विसंबण्याचा मोह त्यांना नक्कीच होईल. पण सरतेशेवटी, निवडणूक म्हणजे काही दोघांच्या भांडणात लोणी मिळेल म्हणून वाट पाहणार्‍या आशाळभूत बोक्यांची बालकथा नाही, हेही त्यांना लक्षात ठेवावे लागेलच!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments