Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गजानन मारणेसाठी मेढा पोलिसांनी असा रचला सापळा

Webdunia
सोमवार, 8 मार्च 2021 (16:56 IST)
स्वाती पाटील
तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची खूप चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, गर्दी जमवणे असे आरोप त्याच्यावर झाले. त्या प्रकरणात त्याला जामीन मिळाला आणि गजानन मारणे फरार झाला.
 
गजानन मारणे फरार झाल्यापासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांना चकवा देऊन तो कुठे फरार झाला याची कुणालाच कल्पना नव्हती. शेवटी बातमी आली की गजानन मारणे सातारा पोलिसांच्या ताब्यात.
गजानन मारणे कसा सापडला याची सर्वत्र चर्चा झाली. तुरुंगातून सुटका झाल्यावर तीनशे-साडे तीनशे एसयुव्ही घेऊन फिरणारा गजा मारणे पोलिसांच्या तावडीत कसा सापडला याचं औत्सुकदेखील शिगेला पोहोचलं होतं. सातारा पोलिसांनी 7 मार्चला रात्री गजानन मारणेला पुणे पोलिसांच्या हवाली केलं. त्यानंतर लगेचच गजानन मारणेची रवानगी येरवाडा तुरुंगात करण्यात आली.
 
कसा अडकला गजानन मारणे पोलिसांच्या जाळ्यात
गजानन मारणेला कसं पकडण्यात आलं याविषयीची सविस्तर माहिती साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी बीबीसी मराठीला दिली. ते सांगतात "गजा मारणेला पकडण्यासाठी आम्हाला केवळ खात्रीलायक टिपची गरज होती. गजा मारणे सातारा परिसरात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी सातारा पोलिसांना देखील कळले की गजा मारणे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातारा परिसरात कुठे फिरत आहे."
 
त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी परिसरातील पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या महाबळेश्वर, पाचगणी, मेढा या भागात नाकाबंदी सुरू केली होती.
 
साताऱ्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील तसेच उप-पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांनी आपल्या टीम्स सज्ज केल्या.
 
गजानन मारणेला अटक करणाऱ्या टीमचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अशोक माने यांनी बीबीसी मराठीला सांगितले की "6 मार्चला गजानन क्रेटा या वाहनातून फिरत आहे ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्या वाहनाच्या मागावर होतो. डोंगरावरूनच गजानन मारणेची गाडी आम्ही स्पॉट केली. नंतर आमच्या दोन पोलीस गाड्यांनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला योग्य वेळ साधून एका गाडीने त्याच्या गाडीला ओव्हरटेक केले. पाठीमागे दुसरी गाडी असल्यामुळे तो ब्लॉक झाला."
 
"नंतर मी गाडीची चावी काढली. पण तरीही समोरचे लोक ओळख सांगत नव्हते. अशा परिस्थितीत गर्दीचा होण्याची शक्यता असल्याने पुढचा धोका ओळखून गजानन मारणे याला पोलिस गाडीत बसवलं आणि काही मिनिटात त्याला पोलिस ठाण्यात आणलं. त्यानंतर एलसीबी आणि शस्त्रास्त्रधारी क्यू आर पथक मेढा पोलीस ठाण्यात पोहोचले," माने यांनी सांगितले.
 
गजानन मारणेच्या झाडाझडतीत त्याच्याजवळ 6 मोबाईल आणि दीड लाख रुपये रोख रक्कम सापडली. विशेष म्हणजे हे मोबाईल साधे बटणवाले होते. पोलिसांना त्याच्या ठिकाणाची माहिती मिळू नये म्हणून असं करण्याचा त्याचा प्रयत्न होता. सतत ठिकाण बदलत होता.
आता सध्या गजानन मारणे येरवडा कारागृहात आहे.
 
गजानन मारणे कोण आहे?
जमीन मालक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यातील मिडल मॅन म्हणून या टोळ्या काम करू लागल्या. त्यासाठी त्यांनी टक्केवारी ठरवली होती. या व्यवहारांमधील वर्चस्वातूनच पुढे निलेश घायवळ आणि गजानान मारणे यांची टोळी निर्माण झाली. या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यातून अनेक संघर्ष झाले. त्यातूनच खुनाची अनेक प्रकरणं समोर आली.
 
पप्पू गावडे आणि अमोल बधेच्या खूनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. परंतु त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि साक्षीदार उभे करु न शकल्याने न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.
 
पप्पू गावडे याच्या खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या अन्य साथीदारांवर पौड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुराव्यांअभावी पुण्यातील विशेष मोक्का न्यायालयाने 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.
 
2014 साली मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.
 
3 नोव्हेंबर 2014 रोजी लवाळे गावाच्या हद्दीतील गावडे वस्तीजवळ पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता.
 
गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळ्यांमध्ये पूर्वीपासून कोथरुड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्रीचे जुने वाद आहेत. या वादातून त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत.
 
याआधी देखील 2008 साली नीलेश घायवळ आणि संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे, पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करुन व कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
 
पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात साक्ष दिल्यास संपवून टाकण्याची धमकी पप्पू गावडे याला दिली होती. त्यातूनच पप्पू गावडेचा खून करण्यात आला होता.
 
2 फेब्रुवारीला देखील पुण्यातील मोक्का न्यायालयाने अमोल बधेच्या खून प्रकरणातून गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची पुराव्याअभावी मुक्तता केली. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कांबळे आणि खून झालेला बधे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघेही निलेश घायावळ टोळीचे सदस्य आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments