Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोगा : 'माझ्या मुलीने बलात्काराला विरोध केला, तर तिला स्टेडिअमच्या छतावरून फेकलं'

Webdunia
गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (20:31 IST)
सुरिंदर मान आणि गुरमिंदर गरेवाल
12 वीत शिकणाऱ्या एका मुलीने बलात्काराचा विरोध केला म्हणून तिला छतावरून फेकण्याची एक घटना समोर आली आहे.
 
ही घटना पंजाबच्या मोगा येथील आहे. पीडित मुलीचं कुटुंब उत्तर प्रदेशातील आहे. या घटनेमध्ये मुलीचा जबडा आणि दोन्ही पाय तुटले.
 
स्थानिक पोलिसांच्या मते 12 ऑगस्टच्या संध्याकाळी मोगा शहरातल्या इनडोअर स्टेडिअमच्या गच्चीजवळ ही घटना झाली. 16 ऑगस्टला या प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला.
 
पोलिसांच्या मते आधी मुलीचा रस्त्यात अपघात झाल्याची बातमी आली.
 
मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, ही मुलगी बास्केटबॉल खेळाडू आहे आणि ती स्टेडिअमला प्रशिक्षणासाठी जात असे.
 
पीडित मुलीला गंभीर अवस्थेत मोगाच्या डॉ. मथुरा दास पाहवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
 
त्यानंतर तिची अवस्था पाहता तिला डॉक्टरांनी तिला लुधियाना येथील दयानंद मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं.
 
अज्ञात व्यक्तीने कुटुंबियांना दिली माहिती
मोगामधल्या मॉडेल पोलीस स्टेशन SHO दलजित सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, पोलिसांना सुरुवातीला एक मुलगी रस्त्यावर झालेल्या अपघातात जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली.
 
मुलीचे वडील शिवनाथ यांनी पोलिसांना त्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं, असं SHO ने सांगितलं.
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही मुलगी मोगा शहरात एका खासगी शाळेत बारावीत शिकते.
 
"ती रोज संध्याकाळी साडे सहा वाजता ट्यूशनहून घरी यायची. मात्र 12 ऑगस्टला ती आली नाही. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने मला फोन करून सांगितलं की, तुमची मुलगी गोधेवाला येथे झालेल्या स्टेडिअममध्ये गंभीर जखमी अवस्थेत आहे," तिचे वडील सांगत होते.
 
वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी FIR दाखल केला. मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे ही माहिती त्या अज्ञात व्यक्तीने मुलींच्या वडिलांना दिली आणि पोलिसांनी ती ग्राह्य धरली.
 
तिच्या वडिलांनी सांगितलं की, जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या मुलीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचं तसंच तिचा जबडा तुटल्याचं सांगितलं.
 
पोलिसांच्या मते जेव्हा ते 14 ऑगस्टला पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी गेले तेव्हा डॉक्टरांनी ती बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलं.
 
या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलिसांना एक वेगळीच कहाणी ऐकवली आहे.
 
मोगा शहरातल्याच जतिन कंडा नावाच्या मुलाशी तिची मैत्री होती अशी माहिती वडिलांनी FIR मध्ये दिली आहे.
 
पीडित मुलगी बोलण्याच्या स्थितीत नाही
पोलीस अधिकारी दलजित सिंह यांनी सांगितलं की, जतिन कांडाने कथितपणे फोन करून मुलीला स्टेडिअममध्ये बोलावलं असा आरोप पीडितेच्या आईवडिलांनी केला आहे.
 
"जेव्हा माझी मुलगी स्टेडिअमला पोहोचली तेव्हा जतिन कंडा बरोबर आणखी दोन अज्ञात व्यक्ती होत्या. जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा त्यांनी मुलीला धक्का मारणं चालू केलं आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीला खाली फेकलं."
 
या मुलीला सध्या लुधियाना येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जेव्हा ती बोलू शकेल तेव्हा तिचा जबाब नोंदवला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
 
मोगा पोलिसांनी जतिन कांडा आणि दोन अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या 307,376,511 आणि 34 या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
 
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असं दलजित सिंह यांनी सांगितलं.
 
आरोपीचा फोन ऑफ आणि नातेवाईक घरी नाहीत
पोलिसांनी या प्रकरणी आरोप ठेवलेल्या जतिन कांडाच्या घरी जाऊन त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात एक वयस्कर व्यक्ती होती.
 
त्यांनी म्हटलं, "मी आजारी आहे."
 
त्या वृद्ध व्यक्तीशिवाय घरात दुसरं कोणीच नव्हतं.
 
या कुटुंबाबद्दल जेव्हा आजूबाजूच्या घरांमध्ये विचारलं तेव्हा कोणी काहीच सांगितलं नाही. जतिन कांडा आणि त्याच्या वडिलांचा मोबाईलही बंद लागत होता.
 
'माझी मुलगी खेळाचं मैदान गाजवेल अशी मला आशा होती'
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एक एसआयटी गठित करण्यात आली आहे. आरोपीला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
 
मुलगी जेव्हा बोलू शकेल तेव्हा तिचा जबाबही नोंदवला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
दरम्यान, या मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, "माझ्या मुलीच्या उपचारासाठी कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाहीये. मला तीन मुलं आहेत. मुलगी थोरली आहे आणि दोन धाकटे मुलगे आहेत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments